प्रदीप शर्मांप्रमाणे मुंबईतले हे 5 एन्काऊंटर स्पेशालिस्ट तुम्हाला माहिती आहेत का?

pradeep sharma
Last Modified गुरूवार, 17 जून 2021 (18:02 IST)
- मयांक भागवत
अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या मुंबईतील घरावर गुरूवारी (17 जून) राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) छापे टाकले आहेत. त्यांच्या अंधेरी येथील घरावर सकाळी साधारण सहा वाजता एनआयएने छापा टाकला.
प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सीआरपीएफच्या 8-9 तुकड्या याठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. यापूर्वी एप्रिल महिन्यात सलग दोन दिवस प्रदीप शर्मा यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली होती.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणातील गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा काही महिन्यांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट राहिलेल्या सचिन वाझे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं होतं.

मुंबई पोलिसाचे हे एन्काउंटर स्पेशालिस्ट नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. एक नजर टाकूया मुंबई पोलिसांच्या या एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि त्यांच्या वादांवर..

मुंबई आणि एन्काउंटर
1990 च्या दशकात मुंबईत गॅंगवॅार सुरू झालं. दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अरूण गवळी, नाईक गॅंग मुंबईत रक्तपात करत होते. धमकी, खंडणी, खून यामुळे मुंबई शहर हादरून गेलं होतं. दिवसाढवळ्या मुंबईत शार्प शूटर्स कोणाचीही हत्या करत होते.
मुंबईत वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी 1997 च्या आसपास सरकारने पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. गुन्हेगारांवर दहशत निर्माण करण्यासाठी पोलिसांनी आपली आता पिस्तुलं बाहेर काढली आणि मुंबईत एन्काउंटर सुरू झाले.

यातूनच जन्म झाला मुंबईतील एन्काउंटर स्पेशालिस्टचा. मुंबई शहरात गुंडांचं वर्चस्व हळूहळू कमी होऊ लागलं आणि मुंबईचे एन्काउंटर स्पेशलिस्ट चर्चेत आले.
महाराष्ट्र पोलिसांची 1983 ची बॅच एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखली जायची.

प्रदीप शर्मा, प्रफुल्ल भोसले, दया नायक, रवींद्र आंग्रें, विजय साळस्कर आणि सचिन वाझे यांसारखे एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकारी मुंबईत नावारूपाला आले. पण, एन्काउंटरमुळे चर्चेत असणारे हे पोलीस अधिकारी त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे सतत चर्चेत राहीले.

1. प्रदीप शर्मा
महाराष्ट्र पोलिसांच्या 1983 च्या बॅचचे अधिकारी आहेत. शर्मा यांनी 100 पेक्षा जास्त एन्काउंटर केल्याचं बोललं जातं.
2006 मध्ये अंधेरीत लखन भैय्या नावाच्या छोटा राजनच्या शूटरचं मुंबई पोलिसांनी एन्काउंटर केलं. पण, या एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. लखन भैय्याला फेक एन्काउंटरमध्ये ठार केल्याचा आरोप करण्यात आला.

राममारायण गुप्ता उर्फ लखन भैय्याच्या भावाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

मुंबई पोलियांच्या चौकशीत प्रदीप शर्मा यांच्या टीमने लखन भैय्याचा एन्काउंटर केल्याचं समोर आलं. प्रदीप शर्मा यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना फेक एन्काउंटर प्रकरणी अटक करण्यात आली. 2013 मध्ये कोर्टाने प्रदीप शर्मा यांची निर्देोष मुक्तता
केली. 13 पोलीस अधिकार्यांसह 21 जणांना शिक्षा करण्यात आली.

प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेच्या तिकिटावर 2014 मध्ये निवडणूक लढवली होती.

2. दया नायक
1995 मध्ये दया नायक यांनी महाराष्ट्र पोलीस फोर्समध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली.

प्रदीप शर्मासोबत दया नायकने क्राइम ब्रांचमध्ये काम सुरू केलं. नायक शर्मा यांच्या एन्काउंटर स्कॉडमध्ये होते. 1998-99 पासून एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले.
1996 साली दया नायक यांनी पहिला एन्काउंटर केला होता.

पण दया नायक यांच्यावर अनेक आरोपही झाले. 2004 मध्ये दया नायक यांची चौकशी करण्यात आली होती.

बेहिेशेबी मालमत्ता आणि अंडरवर्ल्डसोबत लिंक असल्याच्या आरोपावरून त्यांना पोलीस सेवेतून 2006 साली निलंबित करण्यात आलं. महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB ने त्यांना अटक केली होती.

2012 साली दया नायक यांना सेवेत परत येण्यात आलं. त्यानंतर त्यांची पोस्टिंग मुंबईत झाली. 2014 मध्ये नायक यांना नागपूरला पोस्टिंग मिळाली. पण ते नागपूरला गेले नाहीत. त्यामुळे त्यांना 2014 मध्ये पुन्हा निलंबित करण्यात आलं होतं.
त्यानंतर पुन्हा नायक यांना 2016 मध्ये सेवेत घेण्यात आलं. सध्या दया नायक मुंबई एटीएसच्या चंदनचौकी युनिटचे प्रमुख आहेत.

3. रवींद्र आंग्रे
रवींद्र आंग्रे प्रदीप शर्मा यांच्यासोबतचे 1983 बॅचचे पीएसआय होते.

सुरेश मंचेकर आणि अमर नाईक गॅंगला संपवण्याचं श्रेय आंग्रे यांना दिलं जातं.

2008 साली ठाण्यात एका बिल्डरकडून खंडणी मागितल्याचा आरोप रवींद्र आंग्रे यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी आंग्रे यांची चौकशी करण्यात आली. त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
कोर्टाने रवींद्र आंग्रे यांची या प्रकरणी मुक्तता केली. आंग्रे यांना पुन्हा सेवेत घेऊन त्यांची गडचिरोलीला बदली करण्यात आली होती.

पण आंग्रे गडचिरोलीला गेले नाहीत. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं.

रवींद्र आंग्रे यांनी भाजप आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

4. सचिन वाझे
सचिव वाझे क्राइम ब्रँचमध्ये असताना, डिसेंबर 2002 मध्ये मुंबई पोलीस घाटकोपर स्फोटाची चौकशी करत होते. पोलिसांनी चौकशीसाठी ख्वाजा युनूसला ताब्यात घेतलं होतं. पण, 2003 मध्ये ख्वाजा पोलीस कोठडीतून फरार झाल्याचा दावा पोलिसांनी केला.
पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान ख्वाजा यूनूसचा मृत्यू झाल्याचा आरोप मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांवर झाला. काही अधिकाऱ्यांवर ख्वाजा मृत्यूप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. सचिन वाझे या अधिकाऱ्यांपैकीच एक होते.

ख्वाजा मृत्यू प्रकऱणी मे 2004 मध्ये राज्य सरकारने सचिन वाझेंना पोलीस दलातून निलंबित केलं.

साल 2008 मध्ये सचिन वाझे आणि इतरांवर ख्वाजा मृत्यूप्रकरणी 1000 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं.
5. प्रफुल्ल भोसले
ख्वाजा यूनूस प्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रफुल्ल भोसले यांना अटक करण्यात आली होती.

या प्रकरणात सुटका झाल्यानंतर भोसले यांनी पुन्हा मुंबई पोलीस दलात काम केलं. एसीपी म्हणून प्रफुल्ल भोसले निवृत्त झाले.

यावर अधिक वाचा :

नव्या वर्षीच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणार

नव्या वर्षीच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणार
येत्या ३१ डिसेंबर पर्यंत प्रवाशांना लोकलने प्रवास करता येणार नाही. नव्या वर्षीच ...

सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार

सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार
राज्यात शनिवार १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार ...

जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द

जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द ...

आयएमएकडून आज राष्ट्रव्यापी बंद, रुग्णांची मोठी गैरसोय ...

आयएमएकडून आज  राष्ट्रव्यापी बंद, रुग्णांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता
केंद्र सरकारने आयुर्वेदाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची ...

जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द

जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द
जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी १०जुलै २०२०ची अधिसूचना रद्द करण्याच्या ...