शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

चक्रीवादळ : तुमच्या मनातले 13 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

cyclone
नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून साधारणतः एक जूनपर्यंत भारतात दाखल होत असतो. पण यंदा मान्सून केरळमध्ये उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे.
 
दुसरीकडे, मान्सून सुरू होताच अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी एक जूनला मान्सूनने अरबी समुद्रात प्रगती केली आहे. मालदीवसह दक्षिण भारत आणि पश्चिम श्रीलंकेलगत असलेल्या कोमोरीन भागात मान्सून दाखल झाला आहे.
 
तसंच, येत्या एक-दोन दिवसांत मान्सून आणखी पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यापूर्वी भारतीय हवामान विभागाने आपल्या अंदाजात मान्सून वेळेपेक्षा उशिरा दाखल होण्याची शक्यता वर्तविली होती.
 
पण आता अरबी समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. येत्या आठवडाभरात ही ते तयार होण्याची शक्यता आहे.
 
याच अनुषंगाने चक्रीवादळासंदर्भातील तुमच्या 13 प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत.
 
1) चक्रीवादळ कसं तयार होतं?
गेल्या दोन वर्षांमध्ये चक्रीवादळं मुंबईजवळून गेल्याच्या बातम्या आपण वाचल्या असतील. 2020 साली निसर्ग या चक्रीवादळाचा तडाखा कोकणाला बसला होता. त्यापूर्वी 2009 साली कोकणात फयान नावाचं चक्रीवादळ आदळलं होतं.
 
आपल्या कोकण-मुंबईजवळ येणारी ही चक्रीवादळं तयार कुठे आणि कशी होतात?.
 
पृथ्वीच्या मध्यभागी विषुववृत्त आहे. म्हणजे इक्वेटर. त्याच्या उत्तरेला 23.5 अंशांवर कर्कवृत्त आणि दक्षिणेला मकरवृत्त आहे हे तुम्हाला माहिती आहे. शाळेतलं भूगोलाचं पुस्तक आठवतंय? विषुवृत्ताच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या या भागाला उष्णकटीबंधीय प्रदेश म्हणतात. म्हणजेच ट्रॉपिकल रीजन.
 
इथं सूर्याची किरणं थेट पडत असल्यामुळं इथल्या समुद्राचं पाणी जास्त तापतं. आता पाणी जास्त तापलं की त्याची वाफ होते. गरम हवा, वाफ ही आपली जागा सोडून वरवर जाते हे तुम्हाला माहीत आहेच. आता ही हवा वर गेल्यामुळे समुद्राजवळ दाब कमी होतो.
 
हा कमी दाबाचा प्रदेश तयार झाल्यावर आजूबाजूच्या प्रदेशातली हवा ती पोकळी जागा भरण्यासाठी येते.
 
ही प्रक्रिया सतत सुरू असते. म्हणजे कमी दाबाच्या केंद्राभोवती जास्त दाबाच्या प्रदेशातले वारे पिंगा घालू लागतात. हळुहळू या वाऱ्यांचा वेग आणि गती वाढत जाते आणि एक चक्र तयार होतं.
 
2) चक्रीवादळाची दिशा कशी बदलते?
पृथ्वी स्वतःभोवती 24 तासात एकदा फिरते. याला परिवलन म्हणतात. यामुळे पृथ्वीच्या फिरण्यामुळे आणि वाऱ्याच्या दिशेनुसार चक्रीवादळाचा प्रवास सुरू होतो.
 
ही वादळं अनेक दिवस आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास करू शकतात. त्यांच्या जन्माची ठिकाणं आणि नेमका प्रवास सांगता येणं कठीण असलं तरी अंदाज बांधता येऊ शकतो.
 
जसं दरवर्षी हिवाळ्यात आंध्र-ओडिशाच्या दिशेने एक तरी चक्रीवादळ येतंच. किंवा अमेरिकेत फ्लोरिडामध्ये ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मोठं चक्रीवादळ येतंच येतं.
 
3) चक्रीवादळांची नावं नेमकी कशी ठेवली जातात?
जागतिक हवामानशास्त्र संघटनेने वादळांची नावं ठेवण्यासाठी एक पद्धत ठरवली आहे. त्यानुसार विविध देश त्यांच्यातर्फे नावं सूचवतात.
 
वादळांची नावं देशांकडून आणि सुचवलेल्या नावांमधूनच सुचवली जातात.
 
1953पासून मायामी नॅशनल हरिकेन सेंटर आणि वर्ल्ड मेटिरिओलॉजिकल ऑर्गनायजेशन (डब्ल्यूएमओ चक्रीवादळं आणि उष्णकटीबंधीय चक्रीवादळांची नावं ठेवत आला आहे.
 
डब्ल्यूएमओ ही जिनिवास्थित संयुक्त राष्ट्राची एक संघटना आहे.
 
परंतु उत्तर हिंदी महासागरातील चक्रीवादळांची नावं ठेवली गेली नव्हती. कारण या वादळांची नावं ठेवणं एक वादग्रस्त काम होतं.
 
चक्रीवादळ सूचना केंद्रातील अधिकारी डॉ. एम महापात्रा यांच्यामते, धार्मिक, जातीय विविधता असणाऱ्या या प्रदेशात लोकांच्या भावना दुखावू नयेत यासाठी त्यांना नावं देण्यात आली नाही.
 
वर्ष 2004 मध्ये ही स्थिती बदलली. डब्ल्यूएमओच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय पॅनेल रद्द करण्यात आलं आणि संबंधित देशांनाच आपापल्या क्षेत्रात येणाऱ्या चक्रीवादळाची नावं ठेवायला सांगितलं.
 
यानंतर भारत, पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, श्रीलंका आणि थायलंड अशा देशांनी मिळून एक बैठक घेतली. या देशांनी 64 नावांची एक यादी सोपवली. त्यात प्रत्येक देशात येणाऱ्या चक्रीवादळासाठी 8 नावं सूचवण्यात आली. उत्तर हिंदी महासागरातील क्षेत्रात येणाऱ्या वादळांची नावं या सूचीतून ठेवली जातात.
 
या सूचीमध्ये प्रत्येक देशाच्या अद्याक्षरानुसार क्रम लावण्यात आला आहे. या हिंदी महासागराच्या प्रदेशात 2014मध्ये आलेल्या चक्रीवादळाचं नाव नानुक हे नाव म्यानमारने ठेवलं होतं.
 
इतर सदस्य देशांचे लोकही याचं नाव सुचवू शकतात. नावं लहान असावं, ते समजण्यासारखे असावं, ते सांस्कृतीकदृष्ट्या संवेदनशील आणि भडकाऊ असू नये ही अट ठेवून भारत सरकार नावं मागवते.
 
गेल्या वर्षी तितली वादळाचं नाव पाकिस्ताननं ठेवलं होतं. 2013 मध्ये भारताच्या आग्नेयेस आलेल्या फायलीन वादळाचं नाव थायलंडने ठेवलं होतं. तसेच निलोफर वादलाचं नाव पाकिस्तानने ठेवलं होतं. 2014मध्ये आलेल्या हुडहुड वादळाचं नाव या यादीत 34 व्या क्रमांकावर होतं असं डॉ. महापात्रा सांगतात.
 
4) भारतानं दिलेली नावं कोणती आहेत?
भारतानं या यादीत दिलेली नाव मेघ, सागर, वायूसारखी सामान्य नावं दिली आहेत.
 
चक्रीवादळासंदर्भातील पॅनल दरवर्षी एकत्र येऊन चर्चा करतं आणि गरज पडली तर सूचीमध्ये बदल करतं.
 
या 64 नावांच्या यादीमुळे कधी वाद झालाच नाही असं नाही.
 
2013मध्ये श्रीलंकेने महासेन नावाला श्रीलंकेतील राष्ट्रवादी विचारांचे लोक आणि अधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर त्या वादळाला वियारू नाव देण्यात आलं. महासेन राजानं श्रीलंकेत शांतता आणि समृद्धीचं युग आणलं असं त्यांचं मत होतं. त्यामुळे अशा आपत्तीला त्यांचं नाव देणं त्यांना चुकीचं वाटलं.
 
यंदा मात्र आलेल्या या चक्रिवादळाला भारताच्या यादीतलं वायू हे नाव देण्यात आलं आहे.
 
5) अशी नावं का?
उष्णकटिबंधीय सायक्लोन ही हवामानशास्त्रज्ञांद्वारे वापरली जाणारी सामान्य संज्ञा आहे.
 
उष्णकटिबंधीय पाण्यावर उगम पावणारे ढग आणि झंझावात यांचं मिश्रण जेव्हा चक्राप्रमाणे फिरतं, त्याला सायक्लोन म्हणतात, असं USच्या National Oceanic and Atmospheric Administrationचं म्हणणं आहे.
 
हे सायक्लोन कमीत कमी ताशी 119 किमी वेगानं येऊन धडकत असेल तर त्याच्या उगमानुसार त्याला हरिकेन किंवा टायफून असं संबोधलं जातं.
 
वाऱ्याच्या गतीनुसार हरिकेनचे वर्गीकरण हरिकन 1 ते हरिकन 5 अशा गटांमध्ये केलं जातं.
 
6) ही वादळं केव्हा येतात?
अटलांटिक महासागरात ही वादळं सामान्यतः 1 जून ते 30 नोव्हेंबरदरम्यान येतात. या प्रदेशातील 95 टक्क्यांपेक्षा अधिक वादळं याच कालावधीत येतात.
 
वायव्य पॅसिफिक महासागरातील टायफून मे ते ऑक्टोबरदरम्यान येतात. असं असलं तरी ही वादळं वर्षात कधीही तयार होऊ शकतात.
 
तर दक्षिण पॅसिफिक महासागरात सायक्लोन नोव्हेंबर ते एप्रिलदरम्यान येतं.
 
7) सायक्लोन आणि हरिकेनमध्ये नेमका फरक काय?
संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक हवामान संघटना हे जगभरातल्या वादळांच्या नावाची यादी बनवत असते.
 
टायफून हैयान किंवा हरिकेन कॅटरिना यांसारख्या अत्यंत धोकादायक वादळांची नावं बदलण्यात आली आहेत.
 
अमेरिकेत जी चक्रीवादळं येतात त्यांना हरिकेन म्हणतात आणि आपल्याकडच्या वादळांना सायक्लोन म्हणतात. असं का? उत्तर एकदम सोप्पंय. अटलांटिक महासागरात येणाऱ्या चक्रीवादळांना हरिकेन म्हणतात.
 
तर आपल्याकडे म्हणजे हिंदी महासागरातल्या चक्रीवादळांना सायक्लोन म्हणतात. तर प्रशांत महासागरातल्या चक्रीवादळांना टायफून म्हणतात.
 
8) हरिकेन, टायफून, सायक्लोन - या तिघांमध्ये नेमका फरक काय?
अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येणाऱ्या वादळाचं चक्रीवादळात रुपांतर होऊन ते राज्याच्या काही भागात धडकण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच वादळाची शक्यता असल्याने राज्यावर दुहेरी संकटाचा धोका आहे.
 
वादळामुळे झाडं पडणं, भूस्खलन, जोरदार पाऊस यांची शक्यता आहे. या चक्रीवादळला निसर्ग असं नाव देण्यात आलं असून, वादळाचा मुकाबला करण्यासाठी NDRFच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
 
काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांना अम्फन वादळाचा तडाखा बसला होता. चक्रीवादळामुळे या दोन राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं होतं.
 
चक्रीवादळ नेमकी काय असतात? म्हणजे एकाला हरिकेन म्हटलं तर मग दुसऱ्याला टायफून का म्हणतात?
 
ही सर्व वादळं उष्णकटिबंधीय म्हणजे ट्रॉपिकल असतात. पण जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं.
 
उत्तर अटलांटिक आणि पूर्वोत्तर पॅसिफिक महासागरात त्यांना हरिकेन असं संबोधलं जातं.
 
वायव्य पॅसिफिक महासागरात अशा प्रकारची वादळं टायफून म्हणून ओळखली जातात, तर दक्षिण पॅसिफिक आणि हिंदी महासागरात या वादळांना सायक्लोन म्हटलं जातं.
 
9) अरबी समुद्रात चक्रीवादळं का वाढली?
चक्रीवादळाची निर्मिती दोन गोष्टींवर अवलंबून असते. समुद्राच्या पाण्याचं विशेषतः पृष्ठभागाचं तापमान आणि वाऱ्यांची दिशा.
 
थोडक्यात सांगायचं, तर पाण्याच्या वरच्या भागाचं तापमान वाढलं, की त्याची वाफ होऊन ती वर सरकते. त्यामुळे तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. मग आसपासच्या वातावरणातली थंड हवा या दिशेनं चक्राकार वाहू लागते.
 
भारतीय उपखंडाचा विचार केला, तर बंगालचा उपसागर अनेक ठिकाणी उथळ आहे. "बंगालच्या उपसागरात पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान जास्त असतं. तो गरम समुद्र आहे. त्यामुळे तिथे अतिशय शक्तिशाली चक्रीवादळं येतात," असं भारतीय हवामान विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय महापात्रा सांगतात.
 
अरबी सुमद्र तुलनेनं खोल असून, त्यातलं पाणी तुलनेने थंड आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरापेक्षा अरबी समुद्रात कमी चक्रीवादळं जन्माला येतात आणि त्यांची तीव्रता कमी असते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
 
पण गेल्या तीन-चार वर्षांत हे चित्र बदलेलं दिसलं आहे.
 
गेल्या तीन वर्षांत अरबी समुद्रात तयार झालेलं तौक्ते हे अकरावं चक्रीवादळ ठरलं आहे. तसंच ते गेल्या तीन वर्षांत अरबी समुद्रात तयार झालेलं दुसरं अत्यंत तीव्र चक्रीवादळ (Extremely Severe Cyclonic Storm) ठरलं आहे.
 
2018 साली सागर, मेकानू, लुबान ही तीन चक्रीवादळं अरबी समुद्रात तयार झाली होती. पण तिन्ही वादळं पश्चिमेला येमेन आणि ओमानच्या दिशेनं वळली होती.
 
2019 साली अरबी समुद्रात वादळांचा विक्रम रचला गेला, आणि एकाच मोसमात इथे वायू, हिक्का, क्यार, माहा, पवन या पाच चक्रीवादळांची नोंद झाली. त्यातली दोन चक्रीवादळं, म्हणजे वायू आणि माहा उत्तरेला म्हणजे गुजरात-पाकिस्तानच्या प्रदेशात सरकली होती.
 
2020 साली जूनच्या सुरुवातीला निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन-दिवेआगरच्या किनाऱ्यावर येऊन थडकलं. तर नोव्हेंबरमध्ये गती हे चक्रीवादळ सोमालियाला जाऊन धडकलं.
 
निसर्गनंतर वर्षभरातच तौक्ते चक्रीवादळानं कोकण किनाऱ्याला झोडपून काढलं होतं.
 
10) अरबी समुद्र इतका खवळतो?
अरबी समुद्रातल्या या वाढत्या चक्रीवादळांनी जगाचंही लक्ष वेधून घेतलं आहे. तज्ज्ञांच्या मते अरबी समुद्राचं तापमान वाढत आहे, आणि त्यामुळेच तिथे चक्रीवादळांची संख्या आणि तीव्रता वाढते आहे.
 
2019 साली भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेल्या अहवालानुसार अरबी समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात गेल्या दशकात लक्षणीय वाढ झाली आहे. 1981-2010 च्या तुलनेत गेल्या 2019 साली अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान 0.36 अंश सेल्सियसनं वाढल्याचं हा अहवाल सांगतो.
 
चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी एरवी समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान 27 अंश सेल्सियस एवढं असावं लागतं. निसर्ग चक्रीवादळ आलं, तेव्हा अरबी समुद्रात हे तापमान 32 अंशांपर्यंत गेलं होतं, असं हवामान विभागाचे रेकॉर्ड्स सांगतात.
 
खरं तर हवामान बदलांमुळे जगभरातच वादळांची संख्या आणि स्वरुप बदलत असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इथे एक विरोधाभासही आहे.
 
चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान जास्त असावं लागतं. पण जागतिक तापमानवाढीमुळे संपूर्ण समुद्राचं तापमानच वाढत आहे. तसंच काही ठिकाणी वितळेल्या हिमनद्या समुद्रात मिसळत असल्यानं पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान कमी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे चक्रीवादळांची संख्या कमी होऊ शकते, असं काही शास्त्रज्ञांना वाटतं.
 
उदाहरणार्थ एकीकडे अरबी समुद्राचं तापमान वाढत असताना, बंगालच्या उपसागरात पृष्ठभागावरचं तापमान कमी होऊ शकतं. त्यामुळेच बंगालच्या उपसागराऐवजी अरबी समुद्रात वादळांची तीव्रता वाढू शकते.
 
जपानमधले संशोधक एच. मुराकामी, एम. सुगी आणि ए. किटोह यांनी 2012 सालच्या शोधनिबंधात म्हटलं आहे, की अरबी समुद्रात चक्रीवादळांची वारंवारता 46 टक्के इतकी वाढेल, तर बंगालच्या उपसागरमध्ये ही वारंवारिता 31 टक्क्यांनी कमी होईल.
 
भवताल मासिकाचे संपादक आणि पर्यावरण अभ्यासक अभिजीत घोरपडे सांगतात, की "येत्या काळात नेमकं कसं चित्र असेल याचं निश्चित भाकित केवळ तीन वर्षांच्या परिस्थितीकडे पाहून करणं योग्य ठरणार नाही. पण अरबी समुद्रात चक्रीवादळांचं स्वरूप बदलतं आहे हे लक्षात ठेवून पुढची पावलं उचलायला हवीत."
 
चक्रीवादळांच्या वाढत्या तीव्रतेविषयी मात्र शास्त्रज्ञांमध्ये अजिबात दुमत दिसत नाही.
 
11) मुंबई आणि कोकणाला चक्रीवादळांचा धोका वाढलाय का?
अरबी समुद्रात चक्रीवादळ आलं तरी ते थेट मुंबईवर येऊन धडकण्याची शक्यता फार कमी असते.
 
"उत्तर गोलार्धातले विषुववृत्तीय वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे, म्हणजेच मुंबईकडून समुद्राकडे वाहतात. त्यामुळे आलेलं चक्रीवादळ पुढे सरकून गुजरातच्या किनारपट्टीवर आदळतं. त्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली तरी अशी वादळं मुंबईपासून अनेकदा दूर जातात," असं अभिजीत घोरपडे सांगतात.
 
पृथ्वीवरच्या कुठल्याही समुद्रातील वादळांचा विचार केला, तर साधारण हेच चित्र दिसतं. पण अरबी समुद्रातलं वादळ मुंबईवर थेट आदळलं नाही, तरी मुंबईत आणि कोकणात मोठं नुकसान करू शकतं, हे 2009 साली फयान आणि यंदा तौक्ते या चक्रीवादळांनी दाखवून दिलं आहे.
 
सागरी उधाण आणि जागतिक तापमान वाढ या कारणांमुळे या शतकभरात मुंबईत समुद्राची पातळी 1.8 मीटर इतकी वाढेल, असाही संशोधकांचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर कमी तीव्रतेचं चक्रीवादळही शहरात आणि कोकण किनारपट्टीवर मोठं नुकसान करू शकतं.
 
पर्यावरणाविषयी व्यापक लिखाण करणारे लेखक आणि कादंबरीकार अमिताव घोष बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत आठवण करून देतात की, "1998 ते 2001 या कालावधीत तीन चक्रीवादळं भारतीय उपखंडात आली होती आणि त्यात 17,000 जणांचा जीव गेला होता."
 
त्यानंतरच्या वीस वर्षांत हवामान विभाग आणि प्रशासकीय यंत्रणांमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे आता मोठी वादळं येऊनही तुलनेनं नुकासन कमी होताना दिसतं. पण थेट मुंबईला एखादं वादळ येऊन धडकलं, तर मोठं नुकसान होण्याची भीती कायम आहे.
 
12) मुंबईत सहसा चक्रीवादळ का येत नाही महितीये?
ज्या देशांमध्ये हरिकेन, टायफून, सायक्लोन वादळं येतात, त्या देशांकडून जागतिक बैठकीदरम्यान वादळांची नावं सुचवली जातात.
 
"2000च्या दशकात बंगालचा उपसागर आणि अरबी समु्द्र यांत येणाऱ्या आठ देशांनी अशा नावांची शिफारस जागतिक हवामान संघटनेला केलं होतं," असं भारतीय हवामान विभागातल्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञानं बीबीसीला सांगितलं.
 
"त्यातली 50 टक्के नावं आधीच वापरली गेली आहेत. देशातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावणार नाही, अशी आशयाचं नाव वादळाला देण्याचा संबंधित देश प्रयत्न करतात," असं त्यांनी पुढे सांगितलं.
 
13) चक्रीवादळाबाबत विज्ञान काय सांगतं?
उबदार समुद्राच्या पाण्यामुळे हवा वेगात वाहू लागते. जसंजसं उबदारपणा कमी होत जाते, तसतशी हवेतील उष्णता कमी होते.
 
यामुळे एक चक्र तयार होतं. उष्णकटिबंधीय वादळांचा वेग ताशी 119 किलोमीटर असतो.
 
वादळादरम्यान प्रचंड लाटा तयार होतात. ज्यावेळेस या लाटा किनाऱ्यावर पोहोचतात तेव्हा त्यांच्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते.
 
वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे हानी होऊ शकते. यामुळे घरं पडू शकतात, झाडं पडू शकतात.
 
समुद्रातील पाण्याचं तापमान वाढत असल्यानं त्यामुळे भविष्यात हरिकेनची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
 
उष्ण वातावरणामुळे अधिक पाणी थांबवलं जातं आणि यामुळे हरिकेनची व्याप्ती वाढण्याची शक्यता असते.
 
पण हवामान बदल आणि हरिकेन यांच्यातील संबंध अनेक घटकांवर अवलंबून असतात.