शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019 (11:23 IST)

देवेंद्र फडणवीस भाजप-शिवसेना सत्तासंघर्षात एकटे पडले आहेत काय?

गेल्या चाळीस वर्षांत पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर ज्या देवेंद्र फडणवीसांच्या मुत्सद्देगिरीबद्दल चर्चा होत होती, त्याच फडणवीसांच्या मुत्सद्देगिरीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
 
एवढंच नाही तर राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तानाट्यात मुख्यमंत्री एकटे पडले आहेत का? असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटे पडलेले दिसतायेत, त्यांच्या आजूबाजूला कोणी दिसत नाही असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. त्यातून या चर्चेला तोंड फुटले आहे.
 
'मुख्यमंत्री एकाकी पडले आहेत'
मुख्यमंत्र्यांच्या सध्याच्या अवस्थेविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले आहेत की, "मुख्यमंत्री मला आज एकटे दिसतायेत. राजकारणामध्ये शक्यतो असं होऊ नये. इतका मोठा पक्ष आहे. मोदींबरोबर अमित शाह तरी आहेत. आज येथे दुर्दैवाने यांच्या आजूबाजूला कोणी दिसत नाही. जे आहेत ते अत्यंत शांत बसले आहेत. जे-जे होईल ते पाहत राहावं या भूमिकेतून सगळे पाहत बसले आहेत."
 
"2014 मध्ये भारतीय जनता पक्षाची एक मजबूत फळी होती जी आमच्याशी चर्चा करत होती. त्यामध्ये एकनाथ खडसे होते, विनोद तावडे होते, आशिष शेलार होते. आज मुख्यमंत्र्यांच्या अवतीभोवती ही सर्व प्रमुख माणसं दिसत नाहीत," असंही संजय राऊत म्हणालेत.
 
संजय राऊतांच्या वक्तव्यावर भाजपकडून प्रतिक्रिया देताना पक्षाचे प्रवक्ते गणेश हाके यांनी म्हटलंय की संजय राऊत जे म्हणालेत ते योग्य नाही. "भारतीय जनता पक्षात सामूहिक नेतृत्वाची संकल्पना आहे. धोरणात्मक निर्णय किंवा इतर कुठलेही निर्णय सामूहिकपणे घेतले जातात.
 
"सध्या महाराष्ट्रात जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्यासंदर्भातला निर्णय हा सामूहिक निर्णय असेल. जे काही यश असेल, अपयश असेल या दोन्ही गोष्टी सामूहिकरित्याच घेतल्या जातात. महाराष्ट्रातील ही सर्व परिस्थिती भाजप सामूहिकरित्याच स्वीकारत आहे. देवेंद्र फडणवीस ही एक व्यक्ती नाही तर आमच्या सामूहिक नेतृत्वातील महत्वाचं नेतृत्व आहे. म्हणून त्यांच्यासोबत सगळा पक्ष उभा आहे आणि तो राहील," हाके सांगतात.
 
फडणवीसांच्या मुत्सद्देगिरीची परीक्षा
2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर दिवसेंदिवस त्यांनी राज्यावर आणि सत्तेवर आपली मजबूत पकड निर्माण केली होती. राज्यातील बहुतेक सत्तास्थानं भाजपनं काबिज केली होती. पक्षांतर्गत विरोधक निष्प्रभ होऊन भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांचा शब्द हाच अंतिम शब्द अशी परिस्थिती निर्माण केली होती. विशेष म्हणजे मित्रपक्ष शिवसेनेला त्यांनी यशस्वीपणे हाताळले होते.
 
भाजपला पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेला महसूल, गृह, अर्थ, नगरविकास यांपैकी महत्त्वाचं खातं मिळालं नव्हतं. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला कमी जागा देऊनही त्यांना सोबत ठेवण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला सोबत घेण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरतीलच अशी अपेक्षा होती. मात्र यावेळी शिवसेनेनं अतिशय ताठर भूमिका घेतल्यानं फडणवीसांना अजून सरकार स्थापन करता आलेलं नाही.
 
वरिष्ठ पत्रकार संजय जोग यांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांनी सतत स्वत:ला केंद्रस्थानी ठेवल्यानं आज ते एकाकी पडले आहेत. जोग सांगतात, "2014 मध्ये जेव्हा ते मुख्यमंत्रिपदी आले त्यानंतर त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली की सर्वदूर भाजप. हे करताना नरेंद्र मोदी यांची स्टाईल त्यांनी फॉलो करत पक्षातील प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केलं.
 
"विरोधकांना नियंत्रित केले आणि सतत तेच सगळ्या गोष्टींच्या केंद्रस्थानी राहिले. कुठलाही प्रश्न आला की देवेंद्र फडणवीसच सोडवू शकेल अशी पक्षाच्या पातळीवर भूमिका तयार झाल्यामुळे आणि स्वत:ची प्रतिमा तशी तयार केल्यामुळे ते आज एकाकी पडले आहेत," जोग सांगतात.
 
"शिवसेनेने ज्या पद्धतीने त्यांना खिंडीत पकडले आहे त्याची त्यांना कल्पना नव्हती हे आता जाणवतेय. त्यांनी गृहीत धरलं होतं की सेना काही झालं तरी आपल्यासोबत येणार." असं जोग सांगतात.
 
मुख्यमंत्रिपदी पुन्हा आल्यानंतरही फडणवीसांपुढे आगामी काळात आव्हान असणार आहे असं संजय जोग यांचं म्हणणं आहे. "आता दोन माजी मुख्यमंत्री, दोन माजी उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनुभवी ज्येष्ठ मंडळी आणि रोहित पवार, आदिती तटकरेसारखी तरूण तुर्क अशी मजबूत विरोधी फळी समोर उभी असताना देवेंद्र फडणवीस सेनेच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले तरी गेल्या पाच वर्षांत ज्या खंबीरपणे त्यांनी सरकार चालवलं त्या पद्धतीने त्यांना चालवता येला का? याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे."
 
वरिष्ठ पत्रकार आणि 'आज तक'चे डेप्युटी एडिटर कमलेश सुतार यांचं मात्र म्हणणं आहे की फडणवीसांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय मात्र ते एकटे पडले आहेत असं लगेच म्हणता येणार नाही. "खरं तर देवेंद्र फडणवीस एकटे पडले आहेत असा भासवण्याचा प्रयत्न होतोय. हे प्राप्त परिस्थितीतचं राजकारण आहे आणि सगळे त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत."
 
"हे खरं आहे की देवेंद्र फडणवीसांनी गेली पाच वर्षं आपल्याच पक्षातील प्रस्थापित नेत्यांना अंगावर घेतलं. त्यांनी स्वत:चा गट बनवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये गिरीश महाजन, जयकुमार रावळ, संभाजी पाटील निलंगेकर, संजय कुटे अशा नव्या लोकांनी घेऊन त्यांनी आपला गट मजबूत केला. हे करत असताना प्रस्थापित दुखावत होते. पण आता लगेच या परिस्थितीत देवेंद्र फडणवीस एकटे पडले असं म्हणता येणार नाही," असं सुतार सांगतात.
 
"भाजपच्या जागा कमी झाल्या म्हणून कोणत्याही नेत्यानं जाहीरपणाने देवेंद्र फडणवीसांना जबाबदार धरणारं वक्तव्य केलेलं नाही. पक्षाच्या बैठकीतही असा प्रश्न कोणी उपस्थित केल्याची माहिती नाही. पण त्यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय, पण ते एकटे पडलेत असं लगेच म्हणता येणार नाही." असं सुतार यांचं विश्लेषण आहे.
 
केंद्रीय नेतृत्वाची काय भूमिका आहे?
या सर्व परिस्थितीत देवेंद्र फडणवीसांनी या परिस्थितीतून मार्ग काढण्याबाबत पक्षश्रेष्ठींची काय भूमिका आहे, हेही महत्वाचे आहेत.
 
महाराष्ट्र टाइम्सचे दिल्ली प्रतिनिधी सुनील चावके यांचं म्हणणं आहे की, "देवेंद्र फडणवीसांना जो फ्री-हँड मिळाला होतो त्याच्या अनुरूप विधानसभेचे निकाल लागले नाहीत. तिथेच पक्षश्रेष्ठींचा अपेक्षाभंग झालेला आहे. त्या अपेक्षाभंगातून पक्षश्रेष्ठी या सगळ्या प्रक्रियेपासून दूर राहिले आणि शिवसेना आक्रमक झाल्यामुळे फडणवीसांची अडचण झाल्याचं चित्र आहे. शिवसेनेला मी चांगलं हाताळू शकतो असं देवेंद्र फडणवीसांनी पक्षश्रेष्ठींना सांगितलं असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ती जबाबदारी त्यांच्यावरच आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून हा तिढा सोडवण्यासाठी स्पष्ट प्रयत्न झाल्याचं दिसत नाही."