शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 6 जानेवारी 2020 (10:26 IST)

JNU attack: जेएनयूत विद्यार्थ्यांवर हल्ला, मुंबई आणि पुण्यातही पडसाद

दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटायला सुरुवात झाली असून या हल्ल्याविरोधात मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियावर अनेक महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी निदर्शनं केली.
 
मुंबईबरोबर पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनीही पुण्यात निदर्शनं केली.
 
काल झालेल्या हल्ल्यानंतर दिल्लीत पोलीस मुख्यालयाच्या बाहेर निदर्शनं करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या एका गटाने दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते एम.एस. रंधावा यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. जखमी विद्यार्थ्यांना मदत मिळावी, हल्लेखोरांना अटक करावी आणि विद्यापीठ परिसरातली परिस्थिती पूर्ववत व्हावी अशा त्यांच्या मागण्या आहेत.
 
जखमी विद्यार्थी सध्या AIIMS मध्ये दाखल करण्यात आलं असून विद्यार्थ्यांच्या या गटाला तिथे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
 
हिंसेवर जेएनयू प्रशासनाचं काय म्हणणं आहे?
जेएनयू प्रशासनाने काल झालेल्या घटनेचा प्रशासनाने निषेध केला आहे. ही संपूर्ण घटनाक्रमावर जेएनयूच्या कुलसचिवांनी एक निवेदन जारी केलं. एक जानेवारी 2020 ला विद्यापीठाचं हिवाळी सत्र सुरू झालं होतं. त्यानंतर विद्यार्थ्यांची नोंदणीची प्रक्रिया सुरू होती.
 
मात्र 3 तारखेला या प्रक्रियेला विरोध करणारा एका गट कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस परिसरात घुसला आणि इंटरनेट सर्व्हर निकामी केलं. निदर्शनं करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटाने अनेक विभागांच्या इमारतीला टाळं ठोकलं. त्या विद्यार्थ्यांची ओळख पटवल्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली.
 
त्यानंतर 4 जानेवारीला ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या एका गटाने इंटरनेट बरोबर वीज पुरवठाही बंद करण्यात आला. निदर्शनं करणाऱ्या एका विद्यार्थ्यांच्या गटाने विभागाचा फोनही बंद करून टाकला.
 
जेएनयू प्रशासन पुढे म्हणतं की पाच जानेवारीला नोंदणी केलेले विद्यार्थी विभागाच्या इमारतीत जात होते. त्यांना थांबवण्यात आलं. त्यानंतर पाच जानेवारीच्या दुपारी विभागाबरोबर हॉस्टेलच्या परिसरातही नोंदणीचा विरोध करणाऱ्या आणि आधीच नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली.
 
प्रशासनाच्या मते दुपारी 4.30 वाजता नोंदणी प्रक्रियेचा विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटाने नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. त्यानंतर तोंड झाकून काही गुंड पेरियार हॉस्टेलच्या खोलीत घुसले आणि विद्यार्थ्यांवर हल्ला केला.
 
जे विद्यार्थी शांततापूर्ण पद्धतीने अभ्यास करू इच्छितात त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. त्याचप्रमाणे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि शैक्षणिक वातावरण तयार करणाऱ्या लोकांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. जेएनयूच्या मते गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
काल नक्की काय घडलं?
दिल्लीस्थित जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष आयशे घोष यांना बेदम मारहाण झाली.
 
"मास्क परिधान केलेल्या गुंडांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. माझ्या शरीरावरील जखमांमधून रक्त वाहत आहे. मला बेदम मारहाण करण्यात आली," असं आयशे घोष यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
 
जेएनयू टीचर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या जाहीर सभेदरम्यान हा प्रकार घडल्याचं सूत्रांनी सांगितलं.हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या लोकांनी केल्याचा आरोप जेएनयूमधील विद्यार्थ्यांनी केला आहे.
 
बुरखाधारी अज्ञात व्यक्तींनी हॉस्टेलमध्ये धुमाकूळ घातल्याचं सोशल मीडियावरील व्हीडिओंमधून स्पष्ट होतं आहे.
 
जेएनयूमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅंपसमध्ये पन्नासच्या आसपास लोक घुसले. त्यांच्या हातात काठ्या आणि दंडुके होते. बहुतेकांनी आपला चेहरा झाकून घेतला होता. कॅंपसमध्ये आल्या आल्या त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण करायला सुरुवात केली. या हल्लेखोरांनी कॅंपसमधल्या गाड्यांच्या काचाही तोडल्या.
 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि समाजातील सर्व स्तरातून या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.
 
जेएनयू कॅंपसमध्ये झालेल्या हिंसाचाराचा आम्ही निषेध करतो. अनागोंदी माजवण्याचा उद्देश असलेल्या गटांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अस्थिरता पसरवून राजकीय फायदा उठवण्याचा हा प्रयत्न आहे. विद्यापीठं ही शिक्षणाचं आणि शिकण्याचं केंद्र असावं असं भाजपने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
 
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेसंदर्भात दिल्ली पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. जेएनयू कॅंपसमध्ये हिंसाचार रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. याप्रकरणाची चौकशी सहआयुक्त पदावरील अधिकाऱ्याने करावी आणि त्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा असे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत.