बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By BBC|
Last Updated : सोमवार, 28 नोव्हेंबर 2022 (16:01 IST)

महात्मा फुले: ताराबाई शिंदे यांनी ‘स्त्री-पुरुष तुलना’ पुस्तक लिहिलं आणि गदारोळ झाला...

jyotiba phule
महात्मा जोतिबा फुले यांचा 28 नोव्हेंबर हा स्मृतीदिवस. यानिमित्ताने त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या ताराबाई शिंदे यांची आणि त्यांनी लिहिलेल्या ‘स्त्री-पुरुष तुलना’ या पुस्तकाची ही ओळख.
ताराबाई शिंदे यांचं लेखन इंग्रजीत भाषांतरित झालंय. स्त्री-हक्क विषयक चळवळीत त्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं.
या पुस्तकावर आणि ताराबाईंवर सनातनी विचारांच्या लोकांनी टिकेची झोड उठवली. महात्मा फुलेंनी या टीकेला सडेतोड उत्तर दिलं होतं.
 
भारतात स्त्रीप्रश्नांना वाचा फोडण्याचं काम सुरुवातीला पुरुष समाजसुधारकांनी केलं. बालविवाह, सती प्रथा, पुनर्विवाहाला बंदी, स्त्रीशिक्षणाला विरोध अशा परंपरांचं जोखड दूर होऊ लागलं.
 
मोकळा श्वास घेणाऱ्या स्त्रियां बोलत्या आणि लिहित्या झाल्या. आपलं म्हणणं आपल्या भाषेत मांडू लागल्या. स्त्री-पुरुष भेदभावाला आव्हान देऊ लागल्या. अशा स्त्रियातील एक अग्रणी नाव ताराबाई शिंदे.
 
महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचाराचं बाळकडू ताराबाईंना घरातून मिळालं. फुले म्हणायचे, ‘हिंदू धर्म ब्राह्मणांना वरचे आणि शुद्रातितूशुद्रांना हीन मानतो, कारण तो ब्राह्मणांनी रचलेला धर्म आहे’.
 
हाच विचारांचा धागा पुढे नेत ताराबाई म्हणतात की, ‘हा धर्म स्त्रियांना कमी लेखतो, त्यांची दडपणूक करतो, कारण तो पुरुषांनी लिहिलेला आहे.’
 
याच पुरुषजातीला प्रश्न विचारण्याचं काम त्यांनी ‘स्त्री पुरुष तुलना’ या आपल्या पुस्तकातून केलं. हे पुस्तक 1882 साली प्रकाशित झालं. पण हे साल झाकून वा बदलून आज पुस्तक प्रकाशित झालं तरी चालेल, इतके हे विचार आजही समर्पक आहेत.
 
ताराबाई इंग्रजी शिकू लागल्या...
साल 1850. भारत स्वतंत्र व्हायच्या आधी जवळपास 100 वर्षे आधीचा काळ. महाराष्ट्रातल्या बुलढाणा गावात बापूजी हरि शिंदे यांच्या घरात मुलगी जन्माला आली. चार मुलग्यांच्या पाठीवर झालेली मुलगी, ताराबाई. बापूजी शिंदे सधन जमीनदार आणि सरकारी कार्यालयात हेडक्लार्क होते.
 
महात्मा फुलेंचे सुधारणावादी विचार त्यांना पटायचे. म्हणूनच त्यांनी ताराबाईंना मुलगी म्हणून वेगळं मानलं नाही. मुलांच्या बरोबरीनं वाढवलं. त्या काळी मुलींसाठी शाळा नव्हत्या. बापूजींनी ताराबाईंना घरी शिकवलं. मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेची ओळख करून दिली. वाचायला आणि नव्या गोष्टी शिकायला प्रोत्साहन दिलं.
 
‘चूल आणि मूल’ हेच बाईचं विश्व आहे, हे समजण्याचा तो काळ होता. ताराबाई मात्र त्याहीपलिकडचं विश्व समजून घेत वाढल्या. घराबाहेरचे व्यवहार सांभाळण्यातही त्या कुशल झाल्या. मग ते घोड्यावर बसून शेतातला कारभार पाहणं असो की कोर्टकचेरीची कामं असो. एरवी पुरुषांच्या मानल्या जाणाऱ्या कामातही त्यांना चांगलीच गती होती. 
जगावेगळं जगणाऱ्या ताराबाईंना जगाचंही भान होतं. आसपासच्या स्त्रियांचं जगणं, त्यांची कुचंबणा त्या पाहात होत्या. त्यामुळे लग्न आणि सांसारिक जबाबदाऱ्यांत अडकून पडायला त्यांचं मन राजी नव्हतं.
 
आपल्याला लग्न करण्याची इच्छा नाही, असं त्यांनी वडिलांना सांगितलं. लाडक्या मुलीचं मन जपायचं की जनरित सांभाळायची अशा कात्रीत सापडलेल्या बापूजी शिंदेंनी मध्यममार्ग सुचवला.
 
ताराबाईंना लग्नानंतर परक्या घरी जायला लागू नये म्हणून त्यांनी घरजावई होईल, असा वर निवडला. हेही ताराबाईंना मान्य नव्हतं, पण नाखुशीने त्यांनी हे लग्न केलं. याची खंत त्यांच्या मनात जरूर राहिली. पण स्त्री म्हणून वाट्याला आलेल्या या स्वानुभवाने त्यांच्या विचारांना आणखी धार आली.
 
ताराबाई शिंदे हे व्यक्तिमत्व आणि त्यांचे विचार समाजासमोर आले ते त्यांनी लिहिलेल्या ‘स्त्री पुरुष तुलना’ या पुस्तकामुळे. हे पुस्तक त्यांनी 1882 मध्ये म्हणजे वयाची तिशी पार केल्यावर लिहिलं. त्यांच्या जीवनकाळात प्रकाशित झालेलं त्यांचं हे एकमेव पुस्तक.
 
ज्यात त्यांनी ‘स्त्री पुरुष नात्यात पुरुषांना झुकतं माप का?’ ‘सर्व दोषांचं खापर स्त्रियांच्या माथी का मारलं जातं?’ ‘स्त्रियांच्या दु:खाला जबाबदार कोण?’ अशा स्त्री-पुरुष समतेच्या मुळाशी असणाऱ्या प्रश्नांची परखडपणे चर्चा केली आहे.
 
विधवा गरोदर महिलेच्या विरोधात खटला
1881 मध्ये घडलेल्या एका घटनेनं व्यथित होऊन ताराबाईंनी ‘स्त्री पुरुष तुलना’ लिहिलं. सुरतमधल्या विजयालक्ष्मी या ब्राह्मण विधवा महिलेशी संबंधित ही घटना होती.
 
ही महिला गर्भवती झाली, समाजाच्या भीतीनं तिने नवजात अर्भकाला मारून टाकलं. तिच्या विरोधात खटला चालला. मॅजिस्ट्रेट कोर्टात तिला फाशीची शिक्षा झाली. ती बदलून मुंबई हायकोर्टानं जन्मठेप ठोठावली.
 
विजयालक्ष्मीनं शिक्षेच्या माफीची याचना केल्यानंतर पाच वर्षं सक्त कैदेची शिक्षा झाली. ही सविस्तर माहिती मे 1881 मध्ये टाईम्स ऑफ इंडियामध्ये छापून आली. ती ताराबाईंनी वाचली. न्यायालयानं शिक्षेत माफी दिल्याच्या विरोधात ‘पुणे वैभव’ आणि त्यासारख्या सनातनी विचारांच्या वृत्तपत्रांनी टीकेची झोड उठवली.
 
अनैतिक संबंध करणाऱ्या स्त्रीला माफी मिळतेच कशी, हे त्यांचं म्हणणं होतं. यावर ताराबाईंचं म्हणणं होतं की अशा संबंधांची शिक्षा एकट्या स्रीलाच का दिली जाते? तिला फशी पाडणाऱ्या पुरुषाची चर्चा कोणीच का करत नाही? ह्या प्रश्नाने ताराबाईंना लिहितं केलं.
 
‘विजयालक्ष्मी खटला’ हे तात्कालिक कारण होतं. ‘स्त्री पुरुष तुलना’ लिहिताना ताराबाई घटनेपेक्षा त्यामागच्या कारणांना पुढे आणतात. पुरुषी वर्चस्व, स्त्रियांप्रती अन्यायकारक आणि पक्षपाती दृष्टीकोन याचा परामर्ष घेतात. 
 
'पुरुषांच्या कुकर्मांची यादी'
ताराबाई आपल्या लेखनाला निबंध म्हणतात. ‘हा निबंध मी माझ्या देशभगिनिंचा अभिमान धरून रचिला आहे’ या भगिनीभावाच्या भावनेनं त्या लिहितात. सत्यशोधक विचारांचं बाळकडू आणि स्त्रीपुरुष समतेचे संस्कार यांच्या मुशीत घडलेल्या ताराबाईंचे विचार स्पष्ट तर आहेतच, त्यांची मांडणीही तर्कशुद्ध आहे.
“स्त्रियांना पुष्कळ तऱ्हेचे दोष दिलेले वाचण्यात येतात. पण जे दोष स्त्रियांचे अंगी आहेत तेच पुरुषांत अजिबात नाहीत काय? जशा बायका लबाडी करितात तसे पुरुष करीत नाहीत काय?” असे विचारून ताराबाई पुरुषांच्या कुकर्मांची यादी देत विचारतात,
 
“चोरी, शिंदळकी, खून, दरोडे, दगाबाजी, सरकारी पैसा, लांच खाणे, खऱ्याचे खोटे, खोट्याचे खरे करणे, यांतून

एकही अवगुण पुरुषांत नाहीं काय?”
स्त्रियांवर अडाणी आणि अविचारी म्हणून शिक्का मारणाऱ्यांना त्या विचारतात, “तुम्ही शहाणे आहात खरे. पण इकडे कारागृहांत जाऊन पहावें तो पाय ठेवण्यास देखील जागा मिळत नाही, इतकी तेथें आपल्या देशबांधवांची दाटी असते….असे किती कारागृह बायकांनी भरलेत दाखवा? जेथें तुमची दोन तीन हजार मंडळी, त्यांत फार झालें तर शंभरदेखील स्त्रिया निघणार नाहींत.”
 
विजयालक्ष्मी सारख्या कोंडीत सापडलेल्या विधवांना दोष देण्याऱ्या ‘पुणे वैभव’ सारख्यांना त्या सुनावतात,  “जशी लांच घेणारास एकपट व देणारास दुप्पट शिक्षा लागू केली आहे, त्याचप्रमाणे या कामांतदेखील त्यांनी सक्त कायदा करावा कीं स्त्रियांना एकपट, तर पुरुषाला दुप्पट सक्तीची शिक्षा होत जाईल, असे कां असू नयें?” त्यांचा हा युक्तिवाद योग्यच आहे.
 
पुनर्विवाहाला संमती असली पाहिजे, विधवांनाही घर, पतीप्रेम मिळाले पाहिजे असे त्या सांगतात.
 
‘पतीने पत्नीला मान दिला पाहिजे’
“दुर्गुणांची उत्पत्ति आधी आपलेपासूनच झाली. प्रथम स्वधर्म सोडून मन मानेल तसें वर्तन करणे, दारू पिऊन रस्त्यात लोळणें, जुवा खेळणें, रांडा ठेवणे इत्यादि वाईट व घाणेरडीं आचारणें तुम्ही करूं लागला. आतां रांडा कोण? यांची कांही सृष्टिविरहित उत्पत्ति झाली का? रांडा या तुम्हींच फसवून घराबाहेर काढलेल्या स्त्रियांपैकी स्त्रिया असतात.”
 
सेक्स वर्कर स्त्रियांबाबतचे ताराबाईंचे दीडशे वर्षांपूर्वीचे हे वक्तव्य आजही अनेकांच्या पचनी पडणार नाही! 
 
स्त्रियांच्या प्रतिष्ठेचा बळी घेणारा विवाह त्यांना अमान्य होता. त्यांना वाटते ‘एकनिष्ठ जर मूल्य म्हणून स्वीकारायचे असेल तर ते उभयपक्षा लावले पाहिजे’. पतीने पत्नीला मान दिला पाहिजे, प्रेम दिले पाहिजे, ही त्यांची भावना होती.
मुलीला उजवायला उतावीळ झालेल्या आणि कोणाच्याही गळ्यात बांधायला निघालेल्या मातापित्यालाही त्या चार खडे बोल सुनावतात. विशेष म्हणजे यात त्या आपला अनुभवही गुंफतात,
 
“कित्येक श्रीमंत गृहस्थ आपल्या लाडक्या लेकीचे फक्त लाडाकरितां व आवडीकरिता एखादे गरीबाचे मुलाबरोबर लग्न करून ते जोडपे जवळच बाळगितात. पुढें जोपर्यंत ती उभयतां अज्ञान व असमंजस असतात तोपर्यंत बरेंच चालतें.
एकदा जरा चांगले समजू लागले म्हणजे ही बया श्रीमंताची, सदा ऐषआरामींत वागलेली चतुर, हुशार, नी बाबा म्हणजे जन्मकरंट्याचे…. तेव्हा तिला तो न आवडून, ते केवळ शालजोडीला रकट्याचें ठिगळ याप्रमाणे होऊन पुढें जे प्रकार होणें ते होतात.”
 
‘स्त्री धर्म म्हणजे जर बायकोला नवराच देव, असे असेल तर नवऱ्याची वागणूक देखील देवाप्रमाणे नकों का’ म्हणजे नवरा नामक देवाने बायकोचे सुख-दु:ख जाणून घ्यायला हवे, असे त्यांना वाटते. पण हे म्हणताना त्यांची तिरकस शैली धर्म आणि देवादिकांचाही समाचार घेते.
 
“अरे तुमचे देवदेखील दगेबाज; मग तुम्ही असालच असाल, यांत नवल काय? इंद्राने गौतमाचे रूपाने जाऊन आहिल्येसारखे साध्विला कलंक लाविला. चंद्रावळ महापतिव्रता होती, तेथे कृष्णमहाराजांनी राहीरूपानें तिचे व्रताचा भंग केला कीं नाही?”
 
सनातन्यांचा विरोध, दुसऱ्या आवृत्तीला आडकाठी
‘स्त्री पुरुष तुलना’ हे पुस्तक विवाह संस्था, पुरुषी वर्चस्व, धार्मिक चालिरिती, कर्मकांडे या सगळ्यांची मुद्देसूद चिरफाड करते. स्त्रीमुक्ती, स्त्रीवाद हे शब्दही तेव्हा अस्तित्वात नव्हते, पण या विचारांची बीजे या पुस्तकात आहेत.   
 
'स्त्री पुरुष तुलना’चे परखड विचार त्यावेळच्या समाजाच्या पचनी पडणे कठीणच होते. या पुस्तकाच्या पहिली 500 प्रतींची आवृत्ती तर प्रकाशित झाली. पण सनातनी, प्रतिगामी लोकांनी त्याला तीव्र विरोध केला. दबाव आणला. त्या काळी लेखन, प्रकाशन हे शिक्षणाची परंपरा असलेल्या वरच्या जातींच्याच हाती होते. दुसरी आवृत्ती येऊ शकली नाही.
 
या विरोधाला महात्मा फुले यांनी प्रत्युत्तर दिले. ऑक्टोबर 1885 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘सत्सार’ या त्यांच्या अनियतकालिकात त्यांनी लिहिले. ‘स्त्री पुरुष तुलना’च्या लेखनाचे मर्म समजून न घेता लेखिकेला टिकेचे लक्ष्य करणाऱ्या पत्रकारांना त्यांनी आपल्या खास उपरोधिक शैलीत समाचार घेतला.
 
फुले लिहितात- “बहुतेक भर्ते आपल्या स्त्रियांसमक्ष पाहिजे त्या चावचेष्टा करून नीच कर्मे आचरूं लागल्यामुळे, कित्येक कुलीन पतिव्रता स्त्रियांस अतिशय विषम वाटून, त्या अज्ञानी व निर्बळ असल्यामुळे अमर्याद कोपातें पावून, त्यांचे मनांत दुष्कर्मरूपी समुद्राच्या अति भयंकर लाटा उद्भवतात, त्याचें निवाग्ण व्हावे याप्रीत्यर्थ त्यांनी (ताराबाईंनी) पुरुष मंडळास बोध केला…. परंतु तो बोध एक आडमूठ वर्तमानपत्रकर्त्यास रूचला नाही. सबब, अथवा सौ. ताराबाईचें पुस्तक खंडन करू लागल्यानें, उलट आपल्याच गळ्यांत त्यांतील सर्व दोषांचे घोंगडें पडेल, या भयास्तव राजश्रींनीं त्या पुस्तकांतील एकंदर सर्व बोधाचा धि:कार करून त्यास कचऱ्याचे पेटींत झोंकून आपलें नाक मुठींत धरून उलटी ताराबाईचीच निंदा करून तिचे उपकार फेडले.”
फुले या टिकाकारांना सल्ला देतात की त्यांनी आपल्या पत्नीला शिकवावे, विद्वान करावे, आणि तिला ताराबाईंच्या विचारांचे खंडन करू द्यावे. “याला स्वत: चि. ताराबाईंसारखे शिस्तवार असून मार्मिक लिहितां तरी येतें काय” असा सवालही ते विचारतात. या लेखनात फुले ताराबाईंना ‘चिरंजिवीनी’ संबोधतात.
पहिल्या प्रकाशनानंतर काही काळ चर्चेत राहिलेलं हे पुस्तक नंतर मागे पडले. सरत्या वर्षात विस्मरणात गेलं.
 
  बिजिंगच्या परिषदेत ताराबाईंचं नाव
1975 साली आंतरराष्ट्रीय महिला वर्ष साजरे झाले. त्यावेळी ‘स्त्री पुरुष तुलना’ पुन्हा समोर आले. त्यानंतर स्त्री अभ्यासकांनीही या पुस्तकाची समीक्षा केली. आपले परखड विचार निर्भिडपणे मांडणाऱ्या ताराबाईंच्या लेखनाला उजाळा मिळाला. त्यांनी पेरलेल्या क्रांतिकारी बीजांना पुन्हा खतपाणी मिळाले.
 
1995 मध्ये बिजिंगमध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषद झाली त्यावेळी प्रवेशद्वाराला ताराबाई शिंदे यांचं नाव दिलं गेलं.आज या पुस्तकाचे हिंदी, इंग्रजी अनुवाद उपलब्ध आहेत. ‘आधुनिक भारताचे जनक’ (मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया) या इतिहास तज्ज्ञ रामचंद्र गुहा संपादित पुस्तकात ताराबाई शिंदेंच्या लेखनाचा समावेश आहे. 
भारतातील स्त्रीवादाची नाळ आता या पुस्तकाशी जोडलेली आहे. 

Published By- Priya Dixit