शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By BBC|
Last Modified: सोमवार, 28 नोव्हेंबर 2022 (15:54 IST)

महात्मा फुलेंना भेटलेली माणसं आणि त्यांनी सांगितलेले 7 किस्से

phule
- नामदेव काटकर
‘ज्याप्रमाणे ख्रिस्ती धर्मातील धर्माधिकाऱ्यांचा अंधेर मार्टीन लुथरने नाहीसा केला, तद्वतच हिंदू धर्मातील ब्राह्मणी अंधेर जोतीरावांनी मोडला. यांस हिंदीय मार्टीन लुथर म्हणणे योग्य होईल.’
 
जेकब बी. इस्राएल यांचं हे महात्मा जोतीराव फुलेंबाबतचं मत. जेकब हे फुल्यांच्या समाजसुधारणेच्या काळात तरूण वयात होते. त्यांनी आपल्या आठवणींमध्ये फुल्यांबाबत हे मत व्यक्त केलंय.
 
महात्मा फुले यांना जाऊन आज 132 वर्षे पूर्ण झाली. 28 नोव्हेंबर 1890 रोजी फुल्यांचं निधन झालं. शोषित-वंचितांसाठी आयुष्य वेचलेल्या या महान समाजसुधारकाचा शरीररूपी अंत झाला, मात्र विचारांनी ते आजही अनेकांना प्रेरणा देत आहेत.
 
फुल्यांचं लेखन, फोटो उपलब्ध आहे, मात्र आवाज किंवा दृश्य रुपात काही उपलब्ध नसल्याची उणीव फुल्यांच्या वैचारिक अनुयायांना ही कमी कायम जाणवत राहते.
 
मात्र, ही उणीव थोड्या वेगळ्या रूपात महाराष्ट्र सरकारच्या महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समितीने भरून काढली. फुल्यांना पाहिलेल्या, भेटलेल्या व्यक्तींचे लेख संपादित करून, आपल्यासमोर फुले उभे केले आहेत.
 
ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत प्रा. हरी नरके यांनी हे ‘आम्ही पाहिलेले महात्मा फुले’ पुस्तक संपादित केलं आहे.
 
शोषित-वंचितांसाठी तळमळीने लढलेला हा समाजसुधारक नेमका होता कसा, याचा अंदाज बांधायला त्यांना पाहिलेल्या माणसांचे हे अनुभव उपयोगी पडतात.
 
1) ‘महाराष्ट्राचा मार्टीन लुथर’
पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी महात्मा फुलेंचं पहिलं चरित्र लिहिलं. नंतर त्यांनीच फुल्यांच्या निकटवर्तीयांकडून लेख गोळा करून ठेवले होते.
 
हे पंढरीनाथ पाटील फुल्यांच्या चरित्राच्या प्रस्तावनेत राजर्षी शाहू छत्रपती आणि श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुल्यांप्रति काढलेल्या गौरोद्गाराची आठवण नमूद करतात.
 
राजर्षी शाहू छत्रपती हे महात्मा फुल्यांना ‘महाराष्ट्राचा मार्टीन लुथर’, तर श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी फुल्यांना ‘हिंदुस्तानचा वॉशिंग्ट’ म्हणून गौरवलं होतं.
 
पुढे 1935 मध्ये महात्मा गांधींजींनी येरवाड्यात असताना महात्मा फुलेंचं लेखन वाचलं, त्यानंतर गांधी म्हणाले होते, “जोतीराव फुले हेच खरे महात्मा आहेत.”
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तर फुल्यांना गुरुस्थानी मानलं आणि त्यांच्या विचारांचा पुरस्कार केला.
 
असे महात्मा फुले त्यांच्या विद्यार्थी, सहकारी आणि नात्यातील लोकांना कसे दिसले, हे आपण पुढच्या काही आठवणीतून जाणून घेऊ.
 
2) दत्तक पुत्र यशवंताच्या लग्नाचा किस्सा
ग्यानोबा कृष्णाजी ससाणे हे तसे फुल्यांच्या नात्यातले. फुले आणि ग्यानोबा हे मावभाऊ. तसंच, या दोघांचं आणखी एक नातं आहे. ते म्हणजे फुल्यांचे दत्तक पुत्र यशवंत यांचं लग्न ग्यानोबा ससाणेंच्या मुलीशी झालं.
 
मात्र, यामागेही एक गोष्ट आहे आणि ती गोष्ट फुल्यांच्या चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाची. स्वत: ग्यानोबा ससाणेंही ही गोष्ट लिहून ठेवलीय.
 
झालं असं की, यशवंत हा काशीबाई नामक ब्राह्मण स्त्रीचा मुलगा. काशीबाई मूळच्या ठाण्याच्या. विधवा असताना त्यांना यशवंत झाल्यानं मोठा हल्लकल्लोळ झाला.
 
मग ब्राह्णण समाजातून संभाव्य विरोध लक्षात घेऊन ठाण्यातील डॉ. लाड यांनी काशीबाईंच्या या मुलाला फुल्यांकडे आणून सोडले. तेव्हापासून यशवंताला जोतीराव आणि सावित्रीबाईंनी पोटच्या मुलासारखं सांभाळलं, किंबहुना दत्तकच घेतलं.
 
ब्राह्मण स्त्रीचा मुलगा म्हणून यशवंताला पुढे कुणी मुलगी देईना. खरंतर यशवंताला फुल्यांनी उत्तम शिक्षण दिलं होतं, सगळी इस्टेटही त्याच्याच नावे केली होती.
 
मग फुल्यांच्या सांगण्यावरून ग्यानोबा ससाणेंनी त्यांची मुलगी यशवंताला दिली. या कारणाने ग्योनाबांना लोकांनी वाळीत टाकले होतं. मात्र, फुले त्यांच्या पाठी ठामपणे उभे राहिले आणि लोकांना द्यायाचा संदेश त्यातूनच दिला.
 
3) ड्यूक ऑफ कनॉटला ‘असूड’ वाचून दाखवला...
व्हिक्टोरिया राणीचा मुलगा ड्यूक ऑफ कनॉट फौजेवर अधिकारी असताना पुण्यास आला होता. हरीरावजी चिपळूणकर यांनी त्याला मेजवानी दिली. या मेजवानीला महात्मा फुलेंना आमंत्रण होतं.
 
यावेळी फुल्यांनी इंग्रजांना भारतीय गरिबांची स्थिती लक्षात आणून देण्यासाठी केलेल्या क्लृप्तीची त्या काळात आणि नंतरही फार चर्चा झाली होती.
 
झालं असं की, या मेजवानीला जाताना फुल्यांनी फाटके पागोटे, खांद्यावर घोंगडी, गुडघ्यापर्यंत नेसलेले आखूड धोतर, कमरेला विळा आणि पायात दोरींनी बांधलेला नि ठिकठिकाणी फाटलेला जोडा असा पोशाख केला होता.
 
मेजवानीच्या ठिकाणी जाताना फुल्यांना उशीर झाला होता. उशिरा पोहोचलेल्या फुल्यांचा पेहराव पाहून पहारेदार असलेला माणूस त्यांना आत सोडेना. शेवटी हरीरावजी चिपळूणकर बाहेर आले आणि त्यांनी फुल्यांना आत नेलं.
 
हरीरावजींना फुल्यांचं कार्य माहित होतं, त्यामुळे त्यांनी ड्यूक ऑफ कनॉटच्या बाजूच्याच खुर्चीवर फुल्यांना बसवलं.
 
मेजवानी संपल्यावर ड्यूक ऑफ कनॉटचे आभार मानायची वेळ आली, तेव्हा हरीरावजींनी फुल्यांनाच ते करायला सांगितलं. त्यावेळी फुले म्हणाले की, मी बोलायला लागल्यास अर्धा तास तरी लागेल आणि या साहेबांकडे वेळ नसेल, त्यामुळे राहूद्या.
 
ड्यूक ऑफ कनॉटने ही गुणगुण ऐकली आणि काय म्हणणं आहे विचारलं, हरीरावजींनी फुल्यांची तक्रार सांगितली. मग ड्यूक ऑफ कनॉटना वाटलं की, हा जंगली मनुष्य काय म्हणेल, म्हणून त्यांनी बोलण्यास सांगितलं.
 
तिथं फुल्यांनी ‘असूड’ नावाचा निबंध वाचून दाखवला आणि मधून मधून त्याचा अर्थ इंग्रजीतही सांगितला.
 
“गोऱ्या अधिकाऱ्यांना इथल्या शेतकऱ्यांची भाषा कळत नसल्याने रयतेच्या अडचणी सरकारला कळत नाही आणि ब्राह्मण कारकुनास लाच दिल्याशिवाय ते शेतकऱ्याची कामं करत नाही आणि लाच न दिल्यास साहेबांस ब्राह्मण काही भलतेच सांगून शेतकऱ्यांवर अन्याय करवतात.
 
इथं शाळा नाहीत, खेड्यांमध्ये लोक खितपत पडलेत. त्यामुळे सक्तीचे शिक्षण हिंदुस्थानात सुरू करा, असं राणीबाईस माझा निरोप सांगा,” असं फुल्यांनी यावेळी सांगितलं आणि ‘जंगली मनुष्य’ वाटलेल्या फुल्यांचं भाषण ऐकून आवाक् झालेल्या ड्यूक ऑफ कनॉटनंही ते मान्य केलं.
 
4) विचारांना कृतीची जोड देणारा समाजसुधारक
महात्मा फुले विचारांना कृतीची जोड देत, हे आणखी ठळकपणे सांगणारे दोन प्रसंग ग्यानोबा सासणेंनी सांगितलेत.
 
पहिला प्रसंग फुल्यांच्या शेतीतलाच. सासणे सांगतात की, एकदा मी तात्याबरोबर (फुल्यांबरोबर) सकाळी मळ्यात गेलो असता मजूर काम बंद ठेवून न्याहरीस बसले होते. त्यावेळी तात्यांनी स्वत: मोट हाकली आणि मला पाणी धरण्यास सांगितलं.
 
तिथल्या मजुरांना त्यांनी शेतकरी म्हणून पूर्वी करत असलेल्या कामांचे अनुभव सांगितले.
 
असाच दुसरा प्रसंग म्हणजे, 1877 सालच्या दुष्काळातला.
 
गोऱ्हे येथील दगडाच्या खाणीतून दगड काढण्याचे कंत्राट महात्मा फुल्यांकडे होते. तेथील एक मजूर मुलगा पुण्यात काही कामानिमित आला होता. ग्यानोबा ससाणेंनी त्या मुलाला घराबाहेर चप्पल आणि घोंगडीवर लक्ष ठेवून बसायला सांगितलं आणि ते आत जेवायला गेले.
 
महात्मा फुल्यांनी हे पाहिलं आणि ते ग्यानोबांना ओरडले. स्वत: जेवणावरून उठले आणि बाहेर जाऊन त्या मुलाला घरात बोलवलं आणि बाजूला बसवून जेवायला दिलं.
 
हे निवडक दोन प्रसंग, खरंतर महात्मा फुल्यांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग सापडतात, जिथे त्यांच्यातील माणुसकीचा झरा किती वाहता होता, हे दिसून येतं.
 
5) फुल्यांचा मित्र – रेव्हरंड मरे मिचेल
रेव्हरंड मरे मिचेल हे महात्मा फुल्यांनी पुण्यात मुलींसाठी आणि महार-मांगांसाठी काढलेल्या शाळेला, तसंच एकूणच फुल्यांच्या कामाला मदत करणारे ख्रिश्चम मिशनरी होते.
 
या रे. मरे. मिचेल यांनी ते चालवत असलेल्या शाळेतला एक प्रसंग सांगितलाय. त्यावरून त्यावेळची स्थिती आणि मिचेल यांचं फुल्यांबाबतचं गौरवोद्गार लक्षात घेण्यासारखे आहेत.
 
रे. मरे मिचेल लिहितात, ‘माझे स्नेही जोतीराव गोविंदराव फुले ही एक मोठी उल्लेखनीय अशी व्यक्ती होती. महारांचे हीत व्हावे म्हणून ते अत्यंत परिश्रम घेत असत. महार हे हीन जातीचे. जोतीरावांनी एकदा त्या जातीचा मुलगा आमच्याकडे पाठवला. त्याला इंग्रजीच्या प्रारंभीच्या वर्गात घालण्याइतका त्याचा देशी अभ्यास झालेला होता.
 
त्याला शाळेत घेताच ब्राह्मण मुलांचे एक शिष्टमंडळ माझ्याकडे आले आणि म्हणाले की, तुमच्या शाळेत महार मुले असल्यामुळे आम्ही शाळा सोडणार आहोत.’
 
विटाळ होईल म्हणून ब्राह्मण मुले महार मुलाला शाळेत घेण्यास तयार नव्हते. रे. मरे. मिचेल यांनी ब्राह्मण मुलांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले. मात्र, ते फलदायी ठरले नाहीत. अखरे या साऱ्याल कंटाळून तो महार मुलगाच शाळेकडे फिरकला नाही.
 
या प्रसंगावर रे. मरे मिचेल यांनी लिहिलंय की, “ब्राह्मणी धर्म हा किती विघातक नि अमानुष आहे पाहा. वर्गशिक्षक ख्रिस्ती असताना ब्राह्मण मुलांना त्याचा विटाळ वाटत नसे. आपल्या क्षुद्र स्वार्थासाठी ते आपले धर्मनियम, चालीरिती आणि तत्त्वे यांचा भंग करण्यास तयार असत. परंतु, आपल्या अन्याय्य व निर्दय चालीरितींचे पालन आपल्या धर्मबांधवांनी मात्र कठोरपणे केले पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा असे.”
 
‘यमुना पर्यटन’ ही मराठीतली पहिली स्वतंत्र कादंबरी लिहिणाऱ्या बाबा पदमनजी यांनीही फुल्यांबाबतच्या आठवणी 1895 च्या सुमारास लिहून ठेवल्या आहेत.
 
बाबा पदमनजी हे ख्रिस्त धर्मप्रसारकही होते. ते लिहितात, फुल्यांनाही ख्रिस्ती धर्माबद्दल बरीचशी माहिती होती. रे. जेम्स मिचेल आणि डॉ. मरे. मिचेल या त्यांच्या मित्रांपासून त्यांना ही माहिती मिळाली असावी.
 
हे रेव्हरंड मरे मिचेल पुढे जेव्हा भारतातून स्कॉटलंडला परतले, तेव्हा ते तिथूनही महात्मा फुल्यांना पत्र लिहून त्यांच्या सामाजिक कार्याबाबत आस्थेनं विचारपूस करत, असंही बाबा पदमनजींनी त्यांच्या आठवणींमध्ये लिहून ठेवलं आहे.
 
6) जेव्हा फुल्यांनी धर्मांतर रोखलं...
तात्याराव धोंडिबा रोडे हे महात्मा फुल्याच्या मित्राचे पुत्र. फुल्यांची अनेक व्याख्यानं आपण ऐकल्याची तात्यारावांनी आपल्या आठवणीत सांगितलंय. अशीच एक आठवण धर्मांतराबाबत सांगितलीय.
 
जोतीरावांनी भोकरवाडीत महारामांगाची शाळा सुरू केली होती. त्यावेळी शाळेवर एक महार पट्टेवाला ठेवला होता.
 
तो गरिबीने फार गांजला म्हणून धर्मांतर करणार होता. ही बातमी कळताच जोतीरावांनी त्यास सदुपदेश करून त्याचे धर्मांतरापासून मन वळवले आणि त्याला रा. जगन्नाथ सदाशिवजी यांच्याकडून काही मदत करून त्याच्या पगारातही दोन रुपयांची वाढ केली होती.
 
मात्र, धर्मांतर रोखलं म्हणजे फुल्यांना कुठल्या धर्माबद्दल आस्था होती असं नव्हे. कारण फुल्यांना सत्यशोधक धर्माच्या स्थापनेची गरजच या धर्मांच्या जाच नि गुलामीमुळे वाटली.
 
असेच आर. एस. घाडगे नामक गृहस्थ होते. तेही फुल्यांची व्याख्यानं ऐकायचे. त्यांनी फुल्यांचे धर्माबाबतचे विचार लिहून ठेवलेत.
 
घाडगेंनी लिहिलंय की, ‘वरिष्ठ जातीच्या जाचामुळे महार मांग लोक मुसलमान अथवा ख्रिस्ती धर्म स्वीकारतात तरी हे बरे नव्हे, असे ते नेहमी म्हणत. परधर्मातही धर्मगुरूंचा थोडा फार जुलूम आहेच. करिता परधर्मात न शिरता मी स्थापन केलेल्या सत्यशोधक मताप्रमाणे वागा म्हणजे सर्व जातिभेद मोडून समता स्थापन होईल, असे ते म्हणत असत.’
 
याच घाडगेंनी हिंदू धर्मात फुल्यांचा झालेला छळही सांगितलाय. ते पुढे लिहितात की, ‘अस्पृश्यांचा कैवार घेतला म्हणून जोतीरावांचा वरिष्ठ हिंदूंनी जो छळ केला, त्याचा इतिहास जोतीराव आज हयात असते तर त्यांनीच सांगितला असता.’
 
7) श्रीमंत सयाजीराव गायकवाड आणि फुल्यांचे संबंध
महात्मा फुल्यांनी पुण्यातील महारवाड्यातील गंजपेठेत जेव्हा नवीन घर बांधले, तेव्हा त्यांनी श्रीमंत सयाजीराव गायकवाडांना पत्र लिहून कळवलं की तुमचा फोटो पाठवा. तो फोटो घराच्या हॉलमध्ये लावण्याचा फुल्यांचा मानस होता.
 
सयाजीरावांनी ऐश्वर्यसंपन्न असा फोटो पाठवला, तेव्हा फुल्यांनी पुन्हा कळवलं की, साध्या पोशाखातील फोटो पाठवा. तेव्हा मग सयाजीरावांनी घोड्यावर बसून साध्या पोशाखातील फोटो पाठवला. मग तो फोटो फुल्यांनी हॉलमध्ये लावला.
 
लक्ष्मणराव देवराव ठोसर या फुल्यांच्या सहकाऱ्याचा मुलाने ही आठवण सांगताना असंही नमूद केलंय की, फुल्यांच्या या प्रसंगानंतरच सयाजीरावांनी आपलं रहाणीमान बदललं आणि शक्य तितकं साधं केलं.
 
अशीच सयाजीराव गायकवाडांशी संबंधित फुल्यांची आणखी एक आठवण नातेवाईक ग्यानोबा ससाणेंनी लिहून ठेवलीय.
 
ससाणे लिहितात की, श्रीमंत सयाजीराव गायकवाड हे तात्यांचे (महात्मा जोतीराव फुले) शिष्य होते. मी तात्यांबरोबर लोणावळ्यात गेलो असता मला दिसून आले की सयाजीराव महाराज जोतीरावांचा फार मान राखतात. ते जोतीरावांची सल्लामसलत घेऊन समाजसुधारणा करीत असत.
 
पुढे महात्मा फुलेंचं निधन झाल्यानंतर सयाजीरावांनीच सावित्रीबाईंना आर्थिक मदत दिली. मग तेच पैसे बँकेत ठेवून त्यावरील व्याजावर सावित्रीबाई आणि यशवंतानं पुढेच काही दिवस काढले.
 
मात्र, यशवंताला पुढे चांगली नोकरी लागल्यावर आर्थिक प्रश्न सुटला. मात्र, दोघेही – सावित्रीबाई आणि यशवंत – प्लेगच्या साथीत मृत्युमुखी पडले.