suvichar
✕

Solar Eclipse Live: सकाळी 8 वाजता सुरू होणार सूर्यग्रहण

Updated: गुरूवार, 26 डिसेंबर 2019 (08:47 IST)
 
पृथ्वीवरून पाहताना सूर्य पूर्णपणे झाकला जातो त्याला 'खग्रास सूर्यग्रहण' असं म्हणतात. सूर्याचा केवळ काही भाग झाकलेला दिसतो, त्याला 'खंडग्रास सूर्यग्रहण' असं म्हणतात.
 
एरवी चंद्र सूर्यापेक्षा, अगदी पृथ्वीपेक्षाही खूपच लहान आहे. पण तो पृथ्वीपासून जवळ आहे. त्यामुळं पृथ्वीवरून पाहताना आपल्याला सूर्य आणि चंद्र आकारानं एकसारखे दिसतात. आणि म्हणूनच खग्रास स्थितीत चंद्राचं बिंब सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू शकतं.
 
पण पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षा काहीशा लंबगोलाकार आहेत. चंद्र या कक्षेत पृथ्वीपासून दूरच्या बिंदूजवळ असतो, अशा वेळी पृथ्वीवरून चंद्रबिंबाचा आकार सूर्यबिंबापेक्षा लहान दिसतो.
 
याचदरम्यान जेव्हा सूर्यग्रहण होतं, तेव्हा चंद्र सूर्यबिंबाच्या मधोमध येतो; पण सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही, तर एखाद्या कंकणासारखी म्हणजे बांगडीसारखी सूर्याची कडा दिसून येते. त्यालाच 'कंकणाकृती सूर्यग्रहण' म्हणतात. सूर्याच्या या स्थितीला खगोलप्रेमींनी 'Ring of Fire', अग्निवलय, अग्निकंकण अशीही नावं दिली आहेत.
 
यंदाचं ग्रहण वेगळं का आहे?
एका वर्षात संपूर्ण पृथ्वीवरून किमान दोन ते पाचवेळा सूर्यग्रहणं पाहता येतात. त्यातलं एखाद-दुसरंच खग्रास ग्रहण असतं आणि तेही सगळ्याच देशांतून दिसत नाही. आणि कंकणाकृती ग्रहण पाहण्याची संधी त्याहीपेक्षा दुर्मिळ.
 
भारतातून याआधी 15 जानेवारी 2010 रोजी कंकणाकृती ग्रहण दिसलं होतं. दक्षिण भारतातल्या कन्याकुमारीजवळच्या परिसरातून तब्बल सात मिनिटं ग्रहणाची कंकणाकृती स्थिती पाहायला मिळाली होती. तर यानंतरचं कंकणाकृती ग्रहण 21 जून 2020 रोजी उत्तर भारतातून दिसणार आहे. पण त्यानंतर पुढची अनेक वर्ष भारतातून कंकणाकृती ग्रहण दिसणार नाही.
 
यंदाचं कंकणाकृती ग्रहण कुठे पाहायला मिळेल?
 
कंकणाकृती ग्रहणात चंद्राच्या थेट छायेखाली असलेल्या प्रदेशातच 'Ring of Fire' दिसून येते. तर त्याच्या आसपासच्या प्रदेशात खंडग्रास ग्रहण पाहायला मिळतं.
 
26 डिसेंबर 2019 रोजी दक्षिण भारताच्या काही भागातून हे कंकणाकृती ग्रहण दिसणार आहे. कर्नाटकातील मंगळुरू, केरळमधील कालिकत (कोझिकोड) ते तामिळनाडूतील कोईंबतूर, डिंडिगुल आणि श्रीलंकेतील जाफना या पट्ट्यात कंकणाकृती ग्रहण दिसणार आहे. साधारण दोन ते तीन मिनिटं ही कंकणाकृती स्थिती राहील.
 
तर भारताच्या बाकीच्या बहुतांश भागात खंडग्रास स्थितीत ग्रहण पाहायला मिळेल. मुंबईसह महाराष्ट्रातूनही साधारण 80 टक्के सूर्य झाकला गेलेला पाहायला मिळेल.
 
ग्रहण पाहण्याची वेळ काय?
26 डिसेंबरला भारतातून सकाळी 8 ते 11 या वेळेत ग्रहण पाहता येईल. कालिकत ते कोईंबतूरदरम्यान सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी पूर्ण कंकणाकृती स्थिती दिसेल. इतर ठिकाणी स्थानिक वेळेनुसार थोडा फरक पडू शकतो.
 
मुंबईत खंडग्रास ग्रहण दिसणार असून सकाळी 8 वाजून 4 मिनिटांनी ग्रहणाची सुरूवात होईल. ग्रहणाचा मध्य म्हणजे सर्वोच्च खंडग्रास स्थिती 9 वाजून 22 मिनिटांनी दिसेल ग्रहण संपेपर्यंत तर 10 वाजून 55 मिनिटे झालेली असतील.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments