बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 1 ऑगस्ट 2020 (11:44 IST)

राज ठाकरे यांच्या ‘त्या’ टीकेवर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

बोलणारे खूप लोक आहेत, आम्ही काम करतोय, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या टिकेला उत्तर देणं टाळलं आहे.
 
एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमात बोलताना "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही. त्याबद्दल काही बोलणार नाही," असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं.
 
त्यावर एबीपी माझाच्याच 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज यांच्या टिकेची दखल घेणं टाळलं आहे.
 
पण त्याच वेळी "कोरोना काळात जंबो फॅसिलिटी तयार करा, हे कुणी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यायचा असतो, प्रशासनाची अंमलबजावणी करायची असते," असं मात्र उद्धव यांनी म्हटलं आहे.
 
एक मुख्यमंत्री महाराष्ट्रभर फिरताहेत, एक मुख्यमंत्री घरात बसून आहेत, ही टीका टिकणारी नाही. मला टीकेची पर्वा नाही. आरोप सगळ्यांवर होतात. मी माझं काम करत राहणार. बोलणारे खूप लोक आहेत, असं ते पुढे म्हणालेत.
 
"हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही," असंही राज ठाकरे म्हणाले. जिथे एकोपा नाही, एकमत नाही ते जास्त काळ टिकेल असं वाटत नाही, असं ते म्हणाले होते.
 
यावर उद्धव ठाकरे म्हणाले, जोपर्यंत माझे नवीन सहकारी माझ्यासोबत आहे, तोपर्यंत मला चिंता नाही.
 
"देवेंद्र फडणवीस ही मोठी आसामी आहे. त्यांना लवकरच जागतिक आरोग्य संघटना मार्गदर्शनासाठी बोलावतील," अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
आमचं सरकार सुरळीत चाललंय
देवेंद्र फडणवीस म्हणाले की सरकार चालून दाखवा. आम्ही सरकार चालवूनच दाखवत आहोत. तसं नसतं तर एवढं काम कसं काय उभं राहिल, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत विचारला आहे.
 
"भाजपचे नेते राज्यपालांकडे जात आहे, त्याचा आनंद वाटतो. पण, मी माझ्या स्वार्थासाठी खुर्चीत बसलेलो नाही. जोपर्यंत माझे नवीन सहकारी माझ्यासोबत आहे, तोपर्यंत मला चिंता नाही.
 
आमच्या आघाडीला जनतेचं अनादर करून आलेलं सरकार, असं विरोधक म्हणतात. मग इतर ठिकाणी पाडा सरकार आणि बसवा सरकार, असं जे भाजप करत आहे, ते तसं करा म्हणून जनतेनं भाजपला सांगितलं का," असाही सवाल त्यांनी केला.
कोरोना ठरवतो लॉकडाऊन
"लॉकडाऊन वाढवायचा की नाही, हे प्रशासन ठरवत नसून कोरोना व्हायरस ठरवत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन लॉकडाऊनचा निर्णय घेत आहे, असं म्हणणं चुकीचं आहे," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमात व्यक्त केलं.
 
राम मंदिर लवकर व्हावं
"राम मंदिरावर भाजपला बोलायचा अधिकार किती आहे, ते तपासून बघावं. ज्यावेळेस सगळं प्रकरण घडले, तेव्हा हे सगळे लपून बसले होते. सामसूम होते," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
 
ते म्हणाले, "राम मंदिर हा भावनेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. मी मुख्यमंत्री व्हायच्या आधी आणि नंतरही जाऊन आलो आहे. भूमिपूजन करा आणि लवकरात लवकर राम मंदिर पूर्ण करा."
 
मुंबई लोकल केंद्राच्या हातात
ज्याना ज्यांना राज्यात यायचं किंवा काम असेल तर त्यांना अडवलेलं नाही. आज अनेक उद्योगधंदे परराज्यातील मजुरांअभावी पूर्ण झालेलं नाही, असं स्पष्ट करत लोकलबाबत केंद्र सरकार निर्णय घेईल असं ठाकरे यांनी सांगितलं आहे.
 
"राज्यांतर्गत वाहतूक सुरू आहे. अनावश्यक वाहतूक करू नका, असं सरकारचं म्हणणं आहे.
 
मुंबईची लोकल आज सुद्धा सुरू आहे, ती अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी. मुंबई लोकलची वाहतूक केंद्र सरकारच्या हातात आहे. अत्यावश्यक सेवेच्या वाहतुकीसाठी लोकल गाड्या सुरू करू द्या, अशी केंद्राला चार ते पाच वेळा आपल्याला विनंती करावी लागली, तेव्हा ती सुरू झाली."
 
सुशांत सिंह प्रकरणाचं राजकारण करू नये
सुशांत सिंह प्रकरणी चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम आहे. ते निकम्म नाही. ज्यांचा आमच्या पोलिसांवर विश्वास नाही, त्यांची टीका करण्याचा अधिकार नाही, असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी टिकाकारांना दिलं आहे.
 
"पाच वर्ष हे सत्ते होते. काय केलं यांनी पोलीस दलासाठी? पोलिसांच्या कोणत्या मागण्या मान्य केल्या.
 
सुशांत सिंह प्रकरणी जे काही पुरावे कुणाकडे असतील, त्यांनी ते आम्हाला द्यावेत आणि काम झालं नाही की मग बोलावं. पण, यावर जे लोक राजकारण करत आहे, त्याला बळी पडू नका."
 
सरकारचा ड्रायव्हर कोण?
 
कार आणि सरकार दोन्ही चांगलं चाललंय. सगळे एकमेकांना मदत करत आहेत. उत्तम कारभार सुरू आहे, असं मध्यंतरी व्हायरल झालेल्या फोटोबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणालेत.
 
या कार्यक्रमात राज ठाकरे देखील सहभागी झाले होते.
 
राज ठाकरे यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे -
 
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे? त्याचबरोबर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिणामांचा सरकार कसा सामना करणार आहे? तसेच सरकारला त्यांच्या कार्याची जाण करून देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे?
सरकारकडून लावलेले निर्बंध, टेलिव्हिजनवरील बातम्या आणि व्हॉट्सअॅपवरचे मेसेज यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहेत. काळजी घेणं गरजेचं आहे, पण घाबरून घरात बसणं योग्य नाही. लोकांना मानसिक विवंचनेतून बाहेर काढायला हवं. त्यामुळे सगळ्या गोष्टी पूर्ववत करा. काळजी घ्या, पण शटडाऊन आणि लॉकडाऊन नको.
लोकांना मानसिक विंवचनेतून बाहेर काढण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यासाठी काही गोष्टी सुरू करणं आवश्यक आहे. आज उद्योग बंद आहेत, दुकानं बंद आहेत, सगळे घरात बसून आहेत, नोकरी टिकेल की नाही याचीही खात्री नाही. अनेकांना नोकरीवरून काढलंय. यावर सरकार काय विचार करतंय, या गोष्टी सरकारनं सांगितल्या पाहिजे. त्यामुळे सगळं चालू करा, असं माझं मत आहे.
बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद ठेवायला हवी. ज्या कंपन्यांमध्ये रिकाम्या जागा आहेत, तिथे मराठी मुलांना प्राधान्य द्या.
राम मंदिराचं भूमिपूजन धूमधडाक्यातच व्हायला हवं. राम मंदिराचं भूमिपूजन होत असेल, तर ती अभिमानास्पद गोष्ट आहे. राम मंदिराचं ई-भूमिपूजन मान्य नाही.