मंगळवार, 21 मार्च 2023
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (14:14 IST)

MPSC : प्लॅन बी ठरवताना आणि जगताना या 7 गोष्टी लक्षात ठेवा

- रोहन नामजोशी
स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होणं हे अनेकांच्या आयुष्याचं ध्येय असतं.
 
स्पर्धा परीक्षा या नावातच स्पर्धा अंतर्भूत आहे. त्यामुळे लाखो उमेदवार हे स्वप्नं पाहतात मात्र प्रत्येकालाच यश मिळतं असं नाही.
 
मात्र अपयश पदरात पडल्यावर आयुष्य थांबतं असंही नाही. म्हणून प्लॅन बी असणं अत्यावश्यक आहे. कोरोना काळातल्या अनिश्चिततने हे वास्तव आणखीच अधोरेखित झालं आहे.
 
मात्र हा प्लॅन बी ठरवणं वाटतं तितकं सोपं काम नाही. अधिकारी होण्याच्या ध्येयाने भारलेल्या उमेदवारांना प्लॅन बी ठरवणं हे कमकुवत मनोवृत्तीचं लक्षण वाटतं. त्यामुळे त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही.
 
मग अपयशाची मालिका सुरू झाली किंवा काही कारणाने परीक्षा देता आल्या नाहीत की मग प्लॅन बी कडे लक्ष जातं. तेव्हापर्यंत अनेकदा परिस्थिती गुंतागुंतीची होते.
 
आता हे सगळं टाळण्यासाठी काय करायचं?
 
1. विचार करा पक्का
प्लॅन बी ठरवणं हे पराभूत मनोवृत्तीचं लक्षण आहे हा विचार आधी काढून टाका. उलट अशी काही तजवीज असणं हे प्रगल्भपणाचं लक्षण आहे.
 
काही कारणाने अपयश आल्यास आपल्याकडे ठाम पर्याय आहेत आणि ते घेऊन आपण आयुष्य जगू शकतो याचं ते लक्षण आहे. त्यामुळे प्लॅन बी ठरवताना कोणतीही लाज किंवा खंत बाळगू नका.
 
खुल्या मनाने त्यास सामोरे जा. कोणताही अपराधी भाव मनात बाळगू नका. प्लॅन बी खणखणीत असला की प्लॅन ए पण शांत मनाने पार पाडता. न जाणो प्लॅन बी ची गरजच पडणार नाही.
 
2. शुभस्य शीघ्रम
स्पर्धा परीक्षेचं जग अनिश्चित असतं त्यामुळे अर्थाजनासाठी काहीतरी पर्याय हवा हे मनाशी निश्चित करा. परीक्षेची तयारी करण्यााधीच प्लॅन बी तयार करावा.
 
त्यासाठी स्पर्धा परीक्षा जर नसत्या तर काय केलं असतं हा विचार करा. त्यानुसार कामाला लागा. आपण ज्या क्षेत्रात शिक्षण घेतलंय त्यातच पुढे करिअर करता येईल का?
 
किंवा आपली नैसर्गिक आवड निवड जोपासणारा व्यवसाय किंवा नोकरी करता येईल का याचाही विचार करावा.
 
पदवीचं वर्षं आणि नोकरीची सुरुवात यात फारसं अंतर राहणार नाही याची काळजी घ्यावी. नाहीतर आपण शिक्षण घेतलेल्या क्षेत्रात मागे पडतो आणि नोकरी मिळायला त्रास होतो.
 
एकदा प्लॅन बी ठरवल्यावर त्याची फारशी चर्चा करू नका. त्याचवेळी प्लॅन बी चांगलाच आहे म्हणून स्पर्धा परीक्षेवरचं लक्ष उडू देऊ नका. शेवटी तो प्लॅन बी आहे हे लक्षात ठेवा.
 
3. सामर्थ्य आहे प्राधान्याचे
हल्ली अनेक उमेदवार एक दोनदा परीक्षेसाठी प्रयत्न करून प्लॅन बी कडे वळतात आणि त्याचवेळी परीक्षांची तयारी अर्धवेळ करत राहतात.
 
आपला अभ्यास चांगला झाला असेल आणि परीक्षेत यश किंवा अपयश इतकाच मुद्दा असेल तर हा अतिशय योग्य मार्ग आहे. या परिस्थितीत गोंधळ होण्याचीही शक्यता असते.
 
त्यामुळे आपले प्राधान्यक्रम काय आहेत त्यानुसार निर्णय घ्यावेत आणि वाटचाल करावी.
 
4. प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट
प्लॅन बी कितीही चांगला असला तरी अंमलात येताना त्रास होतोच. कारण तु्म्ही अभ्यास करताना आजूबाजूची परिस्थिती झपाट्याने बदलत असणार हे नक्की. त्यामुळे अनेकदा नोकरी मिळायला त्रास होतो.
 
नोकरी मागायाला गेल्यावर गरज असल्यासच तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतात हे सांगा. करिअरमधली गॅप दिसल्यावर हा प्रश्न येतोच. पण आपलं अपयश खुल्या मनाने स्वीकारलं आहे आणि आता मी पुढे जातोय किंवा जातेय हे मुलाखतकाराला कळू द्या.
 
नाहीतर काहीही पर्याय नाही म्हणून नोकरी मागायला आला आहे अशी प्रतिमा तयार होऊन नोकरी मिळण्याची शक्यता धूसर होते. नोकरी मिळायला वेळ लागला तरी खचून जाऊ नका. संयम ठेवा.
 
5. स्वीकार हेच सत्य
नोकरी मिळाल्यावरही परिस्थिती जरा नाजूक असते. कारण अपयशाची दुखरी जखम उराशी असते. अधिकारीपणाची काल्पनिक वस्त्रं अंगावर पांघरलेली असतात.
 
त्यातून बाहेर निघून नवीन वातावरण, नवीन नोकरी स्वीकारणं कठीण असतं. त्यामुळे नवीन नोकरी व्यवसायात पडल्यावर आता आपण अधिकारी होऊ शकत नाही किंवा होण्यासाठी थोडी वाट पहावी लागेल हे मनाला पटवून द्या आणि अधिकारपणाची पांघरलेली झूल काढून ठेवा.
 
नवीन परिस्थितीचा लवकरात लवकर स्वीकार करावा आणि पुढे जावं. आपण कसा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला आणि त्यामुळे आम्हाला कसं सगळ्यातलं काकणभर जास्त समजतं हे सांगायला जाऊ नये, त्याचा काहीही फायदा नसतो.
 
असेलच ज्ञान तर ते कामातून दिसावं. आपल्या सहकाऱ्यांशी बोलतानाही सारखे सारखे स्पर्धा परीक्षांचे दाखले देऊ नये. तुम्ही पराभूत आहात ही प्रतिमा तुमच्या नकळत तयार होण्याची ती सुरुवात असते.
 
6. गेले ते दिन गेले
नॉस्टॅलजियात अडकू नका. नवीन वातावरणाचा स्वीकार केल्यावरही खपल्या निघतातच. मात्र आपल्याकडे जी नोकरी आहे किंवा व्यवसाय करत असाल तर त्यात कसं उत्तमोत्तम काम करता येईल याचा विचार करा.
 
एक स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून स्वप्नं पाहण्याचा अधिकार तुमच्यापासून कोणीही हिरावून घेतलेला नाही ही खूणगाठ मनाशी पक्की बांधा.
 
आपलं अस्तित्व स्पर्धा परीक्षांमध्ये अडकून ठेवू नका. स्पर्धा परीक्षा देण्याची संधी असेल तर त्याचाही अभ्यास करावा. एखाद्या परीक्षेतलं अपयश जगण्यातला अडथळा होऊ शकत नाही हे लक्षात घ्यावं.
 
7. चित्ती असावे समाधान
प्लॅन ए यशस्वी होण्यासाठी मनापासून प्रयत्न केले असतील तर प्लॅन बी अंमलात आणण्यासाठी फारसा त्रास होत नाही.
 
आपण आपल्याकडून 100 टक्के प्रयत्न केले पण नाही झाले प्रयत्न यशस्वी म्हणून हा पर्याय आहे इतका शांतपणे विचार केल्या की बराचसा गोंधळ कमी होतो. आपण कुठेही कमी पडलो नाही असा विश्वास उराशी असतो. आणि त्यामुळे आयुष्य अधिकाधिक सुकर होतं.
 
म्हणून प्लॅन बी आपल्या आयुष्यात येऊच नये याचा नक्की विचार करावा, मात्र आलाच तरी त्यावर प्लॅन ए इतकाच जीव लावावा.