पुण्यात चीनी प्रवाशाला उलट्यांचा त्रास, कोरोनाचा संशय
दिल्लीवरुन पुण्याला आलेल्या एका चीनी प्रवाशाला उलट्यांचा त्रास झाल्याने त्याला संशयावरुन पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल केलं आहे. तेथे त्याची तपासणी करण्यात येत आहे.
सकाळी दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका चीनी प्रवाशाला उलट्यांचा त्रास झाला. विमान पुण्यात उतरल्यानंतर त्या प्रवाशाला तातडीने पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले. खबरदारी म्हणून त्या प्रवाशाच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
दरम्यान विमान पुण्यात उतरल्यानंतर खबरदारी म्हणून त्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. त्यानंतर पुन्हा या विमानाने दिल्लीला उड्डाण केले.