शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 29 जून 2021 (21:42 IST)

कोरोना व्हायरस: मुलांमध्ये आढळणारा MIS-C हा आजार किती काळजीचा?

सौतिक बिस्वास
श्वास घ्यायला त्रास व्हायला लागल्यामुळे आणि ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळे या महिन्यात महाराष्ट्रामध्ये चार मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं.
 
त्यांच्या मातांना महिन्याभरापूर्वीच कोव्हिडचा संसर्ग झाला होता. पण मुलांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसून आली नव्हती.
 
सेवाग्राममधील 1 हजार खाटांच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये आलेल्या या लहान रुग्णांमध्ये कोव्हिडविरुद्धच्या अँटीबॉडीज आढळून आल्या. याचाच अर्थ त्यांना संसर्ग होऊन गेला होता आणि आता ही मुलं अतिशय दुर्मीळ अशा अवस्थेशी झगडत आहेत.
 
या अवस्थेला MIS-C म्हणजे मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन (Multi Inflammatory Syndrom in Kids) असं म्हणतात. याची लक्षणं ही सहसा कोव्हिड होऊन गेल्यानंतर चार ते सहा आठवड्यांमध्ये दिसून यायला लागतात. लहान आणि पौगंडावस्थेतील मुलांमध्ये ही लक्षणं दिसून येतात.
 
कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या चार मुलांपैकी दोन मुलं बरी झाली आहेत, तर बाकीच्या दोघांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
 
"मला ही लक्षणं चिंताजनक वाटत आहेत. ही समस्या किती खोलवर रुजली आहे, हे आपल्याला कदाचित माहितीही नाहीये. भारतात या आजाराच्या संसर्गाची आकडेवारीही नाहीये आणि ही काळजीची बाब आहे," असं कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. पी. कलंत्री सांगत होते.
 
कोरोना संसर्गाची दुसरी लाट ही प्रचंड विनाशकारी ठरली होती. या लाटेनंतर देशभरातील बालरोगतज्ज्ञ या दुर्मीळ आणि गंभीर संसर्गाची अधिकाधिक प्रकरणं येत असल्याचं सांगत आहेत.
 
डॉक्टरांकडे ही लक्षणं असलेले रुग्ण अजूनही येत असताना, किती मुलांना MIS-C झाला आहे, याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाहीये. अमेरिकेत आतापर्यंत MIS-Cचा संसर्ग 4 हजार मुलांना झाला असून 36 जण मृत्यूमुखी पडले आहेत.
 
दिल्लीमधील गंगाराम रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. धीरेन गुप्ता सांगतात की, मार्चपासून आतापर्यंत MIS-Cचे 4 ते 15 वयोगटातील 75 हून अधिक रुग्ण समोर आले आहेत.
 
या हॉस्पिटलमध्ये 18 बेड्सचा MIS-C वॉर्ड स्थापन करण्यात आला असून दिल्ली तसंच आजूबाजूच्या परिसरात अशी 500 प्रकरणं आढळली असल्याचं डॉ. गुप्ता सांगतात.
 
पुण्यामधील सरकारी रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. आरती किणीकर सांगतात की, एप्रिलपासून आतापर्यंत त्यांच्याकडे MIS-Cचे 30 रुग्ण आले होते. या तीस मुलांपैकी तेरा जण 4 ते 12 वयोगटातली होती. त्यांच्या हृदयाच्या स्नायूला सूज आली होती.
 
"दुसऱ्या लाटेनंतर ही संख्या खूप वाढली आहे," डॉक्टर किणीकर सांगतात.
 
सोलापूरमधील बालरोगतज्ज्ञ डॉक्टर दयानंद नकटे यांनी आतापर्यंत MIS-Cचे 20 रुग्ण हाताळले आहेत. ही गेल्या महिन्याभरातली रुग्णसंख्या आहे. ही सगळी मुलं 10 ते 15 वयोगटातली होती.
 
गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्र सरकारने MIS-C या आजाराची माहिती सरकारी यंत्रणेला देणं कायद्यानेच बंधनकारक केलं आहे.
 
शरीरातली रोग प्रतिकारक शक्ती जास्त कार्यरत झाल्याने ही परिस्थिती उद्भवत असल्याचं डॉक्टर सांगतात. त्यामुळे महत्त्वाच्या अवयवांना सूज येते.
 
सुरूवातीला या आजाराची लक्षणं ही इतर आजारांच्या लक्षणाशी साधर्म्य दाखवणारीच असतात. उदाहरणार्थ- मुलांच्या शरीरातल्या महत्त्वाच्या अवयवयांचा दाह (Inflamation), पोट बिघडणं, पोटात दुखणं, उलट्या, अंगावर पुरळ उमटणं, डोळे लाल होणं, ताप येणं, जीभ-घसा लाल होणं.
 
मुलांमध्ये आढळणाऱ्या कावासाकी सिंड्रोमसारखीच ही लक्षणं असतात. कावासाकी सिंड्रोम हा 5 वर्षांखालच्या मुलांमध्ये आढळतो.
 
"मध्यम तीव्रतेच्या कावासाकी सिंड्रोमसारख्या लक्षणांपासून महत्त्वाचे अवयव निकामी होण्यापर्यंत अनेक लक्षणं या आजारात दिसू शकतात," असं दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये असोसिएट प्रोफेसर असलेल्या डॉ. झुमा शंकर सांगतात.
 
डॉक्टरांच्या मते रुग्णांची संख्या अशीच वाढल्यास सेप्टिक शॉक, श्वसन यंत्रणा निकामी होणं तसंच हृदय, मूत्रपिंड आणि यकृतासारख्या महत्त्वाचे अवयव निकामी होणं असे काही घातक परिणामही दिसू शकतात. अमेरिकेमध्ये MIS-C झालेल्या मुलांमध्ये नंतर न्यूरॉलॉजिकल लक्षणं आढळल्याचंही एका संशोधनातून समोर आलं आहे.
 
डॉ. गुप्ता यांनी सांगितलं की MIS-C झालेल्या बऱ्याचशा मुलांवर अतिदक्षता विभागातच उपचार करावे लागत आहेत. तीनपैकी एका मुलाला किमान आठवडाभरासाठी तरी व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज भासतीये.
 
तज्ज्ञांच्या मते स्टेरॉईड्स, अँटीबॉडीज, भरपूर निरोगी अँटीबॉडीजपासून बनविण्यात आलेली IVIG इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा या मुलांवरील उपचारात महत्त्वाचा ठरू शकतो.
 
डॉ. गुप्ता यांच्या रुग्णालयात आलेल्या 90 टक्के मुलांमध्ये कोव्हिड-19ची कोणतीही लक्षणं दिसली नव्हती. "कोव्हिडमधून बरं झाल्यानंतर दोन ते सहा आठवड्यांनी त्यांच्यामध्ये MIS-C ची लक्षणं दिसली आणि हीच चिंतेची बाब आहे," असंही डॉ. गुप्ता सांगतात.
 
"मुलांना परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर रुग्णालयात आणावं लागू नये एवढंच मला वाटतं. पालकांनी कोव्हिडमधून बरं झाल्यानंतर मुलांवर लक्ष ठेवायला हवं, त्यांच्यात कोणतीही लक्षणं आढळल्यास बालरोगतज्ज्ञांना दाखवावं," असं डॉ. गुप्ता सांगतात.
 
जर अशा संसर्गाचं प्रमाण अचानक वाढलं तर लहान मुलांवर उपचार करण्यासाठी आपल्याकडे पुरेशा सोयी आणि संसाधनं आहेत का? असा प्रश्नही डॉ. गुप्ता उपस्थित करतात.
 
MIS-C हा अतिशय दुर्मिळ असला तरी वेळेवर उपचार झाल्यास मृत्यूदर कमी राहतो.
 
मुंबईमधल्या चार हॉस्पिटलमध्ये MIS-Cचे 23 रुग्ण दाखल झाले होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे.
 
युकेमधील रॉयल कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स अँड चाइल्ड हेल्थनं केलेल्या संशोधनात म्हटलं आहे की, "MIS-C मुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा उपलब्ध नसला तरी यामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण नगण्य आहे."
 
पुण्यामध्ये बालरोगतज्ज्ञ पालकांना या आजारासंबंधी माहिती आणि सूचना देणारी पत्रकं तयार करत आहेत आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मुलांची घरच्या घरी कशी काळजी घ्यावी याबद्दल ऑनलाइन ट्रेनिंगही देत आहेत.
 
अर्थात, MIS - Cचं नेमकं कारण काय हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. कोव्हिडनंतर तयार झालेल्या अँटीबॉडिजमुळे तो होतो की हा सिंड्रोम संसर्गानंतर आपोआपच होतो? तसं असेल तर इतक्या कमी प्रमाणात तो का होत आहे?
 
"हे अजूनही गूढच आहे," डॉ. बानिक सांगतात.
 
ही लक्षणं दिसल्यास घ्या डॉक्टरांचा सल्ला-
मुलांमध्ये ही लक्षण दिसल्यास पालकांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा याबाबत युएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन सूचना केली आहे-
 
* श्वास घ्यायला त्रास
 
* छातीत दुखणं किंवा दडपण जाणवणं
 
* सतत येणारी ग्लानी
 
* त्वचा, ओठ किंवा नखं फिकट किंवा निळी पडणं
 
* पोटात प्रचंड वेदना