शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मे 2020 (09:28 IST)

पुण्यात पहील्यांदाच उच्चांकी रुग्णांची नोंद

पुणे महापालिका हद्दीत प्रथमच एकाच दिवसात उच्चांकी ३९९ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली. यामुळे पुणे शहराने कोरोनाबाधित रूग्णांचा पाच हजाराचा आकडा पार केला असून, सोमवारपर्यंत शहरात एकूण ५ हजार १८१ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. आढळून आलेल्या ३९९ रूग्णांमध्ये बहुतांशी रूग्ण हे कंटन्मेंट भागातीलच आहेत.
 
पुणे शहरात एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच, दुसरीकडे मात्र कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांचे प्रमाणही मोठे आहे. सोमवारी १७९ कोरोनाबाधित रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, आजपर्यंत शहरातील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही आता २ हजार ७३५ इतकी झाली आहे. पुणे शहरात कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या जरी ५ हजार १८१ इतकी झाली असली तरी, यापैकी अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार १८२ इतकी आहे. यापैकी १७९ कोरोनाबाधित रूग्णांची प्रकृती गंभीर आहे़ तर ४४ रूग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
 
 पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कंटन्मेंट झोनमधील प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्याची मोहिम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली असल्याने, अधिकाधिक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण उजेडात येत आहेत. परिणामी त्यांना वेळेत उपचारही मिळत असून, त्यांना अन्य नागरिकांपासून विलग करून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासही मदत मिळत आहे. ३९९ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ३२९ पालिकेच्या नायडू हॉस्पिटल व अन्य आयसोलेशन सेंटरमध्ये, तर ११ जण ससून हॉस्पिटलमध्ये व ५९ जणांना खाजगी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.