Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दासबोध दशक अठरावा - बहुजिनसी

Updated: शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (17:25 IST)
 
 
समास दहावा : श्रोताअवलक्षणनिरूपण
 
॥ श्रीराम ॥ कोणीयेका कार्याचा साक्षप । कांहीं तऱ्ही घडे विक्षेप । काळ साहे तें आपेंआप । होत जातें ॥ १ ॥ कार्यभाग होत चालिला । तेणें प्राणी शोक जाला । विचारहि सुचों लागला । दिवसेंदेवस ॥ २ ॥ कोणीयेक प्राणी जन्मासी येतो । कांहीं तऱ्ही काळ साहे होतो । दुःखाउपरी सुख देतो । देव कृपाळुपणें ॥ ३ ॥ अवघाचि काळ जरी सजे । तरी अवघेचि होती राजे । कांहीं सजे कांहीं न सजे । ऐसें आहे ॥ ४ ॥ येकलोक अथवा परलोक । साधतां कोणीयेक विवेक । अद्भूत होये स्वाभाविक । देणें ईश्वराचें ॥ ५ ॥ ऐकल्याविण कळलें । शिकल्याविण शहाणपण आलें । देखिलें ना ऐकिलें । भूमंडळीं ॥ ६ ॥ सकळ कांहीं ऐकतां कळे । कळतां कळतां वृत्ति निवळे । नेमस्त मनामधें आकळे । सारासार ॥ ७ ॥ श्रवण म्हणिजे ऐकावें । मनन म्हणिजे मनीं धरावें । येणें उपायें स्वभावें । त्रयलोक्य चाले ॥ ८ ॥ श्रवणाआड विक्षेप येती । नाना जिनस सांगो किती । सावध असतां प्रत्यय येती । सकळ कांहीं ॥ ९ ॥ श्रवणीं लोक बैसले । बोलतां बोलतां येकाग्र जाले । त्याउपरी जे नूतन आले । ते येकाग्र नव्हेती ॥ १० ॥ मनुष्य बाहेर हिंडोनी आलें । नाना प्रकारीचें ऐकिलें । उदंड गलबलूं लागलें । उगें असेना ॥ ११ ॥ प्रसंग पाहोन चालती । ऐसे लोक थोडे असती । श्रवणीं नाना विक्षेप होती । ते हे ऐका ॥ १२ ॥ श्रवणीं बैसले ऐकाया । अडों लागलीसें काया । येती कडकडां जांभया । निद्राभरें ॥ १३ ॥ बैसले सुचित करूनि मना । परी तें मनचि ऐकेना । मागें होतें ऐकिलें नाना । तेंचि धरुनी बैसलें ॥ १४ ॥ तत्पर केलें शरीर । परी मनामधें आणीक विचार । कल्पना कल्पी तो विस्तार । किती म्हणौनि सांगावा ॥ १५ ॥ जें जें कांहीं श्रवणीं पडिलें । तितुकें समजोन विवरलें । तरीच कांहीं सार्थक जालें । निरूपणीं ॥ १६ ॥ मन दिसतें मां धरावें । ज्याचें त्यानें आवरावें । आवरून विवेकें धरवें । अर्थांतरीं ॥ १७ ॥ निरूपणीं येऊन बैसला । परी तो उदंड जेऊन आला । बैसतांच कासाविस जाला । त्रुषाकांत ॥ १८ ॥ आधीं उदक आणविलें । घळघळां उदंड घेतलें । तेणें मळमळूं लागलें । उठोनी गेला ॥ १९ ॥ कर्पट ढेंकर उचक्या देती । वारा सरतां मोठी फजिती । क्षणक्षणा उठोनी जाती । लघुशंकेसी ॥ २० ॥ दिशेनें कासाविस केला । आवघेंचि सांडून धांविला । निरूपणप्रसंगीं निघोन गेला । अखंड ऐसा ॥ २१ ॥ दृष्टांती कांहीं अपूर्व आलें । अंतःकर्ण तेथेंचि राहिलें । कोठवरी काये वाचिलें । कांहीं कळेना ॥ २२ ॥ निरूपणीं येऊन बैसला । तो विंचुवें फणकाविला । कैचें निरूपण जाला । कासाविस ॥ २३ ॥ पोटामधें तिडिक उठिली । पाठीमधें करक भरली । चालक चिखल्या पुळी जाली । बैसवेना ॥ २४ ॥ पिसोळा चाऊन पळाला । तेणें प्राणी दुश्चीत जाला । कोणें नेटें गल्बला केला । तेथेंचि धावें ॥ २५ ॥ विषै लोक श्रवणीं येती । ते बायेकांकडेच पाहाती । चोरटे लोक चोरून जाती । पादरक्षा ॥ २६ ॥ होये नव्हे वादवेवाद । तेणें उदंड जाला खेद । सिव्या गाळी अप्रमाद । होतां चुकला ॥ २७ ॥ कोणी निरूपणीं बैसती । सावकस गोष्टी लाविती । हरिदास ते रें रें करिती । पोटासाठीं ॥ २८ ॥ बहुत जाणते मिळाले । येकापुढें येक बोले । लोकांचे आशये राहिले । कोण जाणे ॥ २९ ॥ माझें होये तुझें नव्हे । ऐसी अखंड जयास सवे । न्याये नीति सांडून धावे । अन्यायाकडे ॥ ३० ॥ आपल्य थोरपणासाठीं । अच्यावाच्या तोंड पिटी । न्याये नाहीं ते सेवटीं । परम अन्याई ॥ ३१ ॥ येकेकडे अभिमान उठे । दूसरेकडे उदंड पेटे । ऐसे श्रोते खरे खोटे । कोण जाणे ॥ ३२ ॥ म्हणोन जाणते विचक्षण । तें आधींच धरिती नेणेपण । मूर्ख टोणपा आपण । कांहींच नाहीं ॥ ३३ ॥ आपणाहून देव थोर । ऐसा जयास कळला विचार । सकळ कांहीं जगदांतर । तेहिं राखावें ॥ ३४ ॥ सभेमधें कळहो जाला । शब्द येतो जाणत्याला । अंतरें राखों नाहीं सिकला । कैसा योगी । ३५ ॥ वैर करितां वैरचि वाढे । आपणास दुःख भोग्णें घडे । म्हणोनि शाहाण्याचे कुकडे । कळों आलें ॥ ३६ ॥ अखंड आपणा सांभळिती । क्षुल्लकपण येऊं नेदिती । थोर लोकांस क्ष्मा शांति । अगत्य करणें ॥ ३७ ॥ अवगुणापासीं बैसला गुणी । आवगुण कळतो ततक्षणीं । विवेकी पुरुषाची करणी । विवेकें होते ॥ ३८ ॥ उपाये परियाये दीर्घ प्रेत्‌न । विवेकबळें नाना येत्‌न । करील तयाचें महिमान । तोचि जाणे ॥ ३९ ॥ दुर्जनीं वेवदरून घेतला । बाश्कळ लोकीं घसरिला । विवेकापासून चेवला । विवेकी कैसा ॥ ४० ॥ न्याये परियाये उपाये । मूर्खास हें कळे काये । मूर्खाकरितां चिवडा होये । मज्यालसीचा ॥ ४१ ॥ मग ते शाहाणे नीट करिती । स्वयें साहोन साहविती । स्वयें करून करविती । लोकांकरवीं ॥ ४२ ॥ पृथ्वीमधें उदंड जन । जनामधें असती सज्जन । जयांकरितां समाधान । प्राणीमात्रासी ॥ ४३ ॥ तो मनोगतांचीं आंगें जाणे । मान प्रसंग समये जाणे । संतप्तालागीं निवऊ जाणे । नाना प्रकारें ॥ ४४ ॥ ऐसा तो जाणता लोक । समर्थ तयाचा विवेक । त्यचें करणें कांहिं येक । जनास कळेना ॥ ४५ ॥ बहुत जनस चलवी । नाना मंडळें हालवी । ऐसी हे समर्थपदवी । विवेकें होते ॥ ४६ ॥ विवेक एकांती करावा । जगदीश धारणेनें धरावा । लोक आपला आणी परावा । म्हणोंचि नये ॥ ४७ ॥ येकांती विवेक ठाईं पडे । येकांतीं येत्‌न सांपडे । येकांतीं तर्क वावडे । ब्रह्मांडगोळीं ॥ ४८ ॥ येकांती स्मरण करावें । चुकलें निधान पडे ठावें । अंतरात्म्यासरिसें फिरावें । कांहीं तरी ॥ ४९ ॥ जयास येकांत मानला । अवघ्या आधीं कळे त्याला । त्यावेगळें वडिलपणाला । ठवचि नाहीं ॥ ५० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे श्रोताअवलक्षणनिरूपणनाम समास दहावा ॥ ॥ दशक अठरावा समाप्त ॥

सर्व पहा

Devshayani Ashadhi Ekadashi 2026 Wishes Images देवशयनी आषाढी एकादशी शुभेच्छा इमेजेस

उपवास नडणार नाही, पित्त वाढणार नाही! पाळा 'या' सोप्या ५ टिप्स

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

Budhwar Upay: बुधवारी करा हे चमत्कारी उपाय, व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होईल

Ashadhi Ekadashi 2026 Wishes in Marathi आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश मराठीत

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments