शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Modified: बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (16:34 IST)

गुरूचरित्र – अध्याय एकोणतिसावा भाग 2

गृहदाहादि केला दोष । असत्यवादी परियेस । पैशून्यपण पापास । वेदविक्रय पाप जाणा ॥२१॥
कूटसाक्षी व्रतत्यागी । कौटिल्य करी पोटालागी । ऐसी पाप सदा भोगी । तोही पुनीत होय जाणा ॥२२॥
 
गाई-भूमि-हिरण्यदान । म्हैषी-तीळ-कंबळदान । घेतले असेल वस्त्रान्न । तोही पुनीत होय जाणा ॥२३॥
धान्यदान जलादिदान । घेतले असेल नीचापासून । त्याणे करणे भस्मधारण । तोही पुनीत होय जाणा ॥२४॥
 
दासी-वेश्या-भुजंगीसी । वृषलस्त्री-रजस्वलेसी । केले असती जे का दोषी । तोही पुनीत जाणा ॥२५॥
कन्या विधवा अन्य स्त्रियांशी । घडला असेल संग जयासी । अनुतप्त होऊनि परियेसी । भस्म लाविता पुनीत होईल ॥२६॥
 
रस-मांस-लवणादिका । केला असेल विक्रय जो का । पुनीत होय भस्मसंपर्का । त्रिपुंड्र लाविता परियेसा ॥२७॥
जाणोनि अथवा अज्ञानता । पाप घडले असंख्याता । भस्म लाविता पुनीता । पुण्यात्मा होय जाणा ॥२८॥
 
नाशी समस्त पापांसी । भस्ममहिमा आहे ऐशी । शिवनिंदक पापियासी । न करी पुनीत परियेसा ॥२९॥
शिवद्रव्य अपहारकासी । निंदा करी शिवभक्तांसी । न होय निष्कृति त्यासी । पापावेगळा नव्हे जाणा ॥२३०॥
 
रुद्राक्षमाळा जयाचे गळा । लाविला असेल त्रिपुंड्र टिळा । अन्य पापी होय केवळा । तोही पूज्य तीही लोकी ॥३१॥
जितुकी तीर्थे भूमीवरी । असतील क्षेत्रे नानापरी । स्नान केले पुण्य-सरी । भस्म लाविता परियेसा ॥३२॥
 
मंत्र असती कोटी सात । पंचाक्षरादि विख्यात । अनंत आगम असे मंत्र । जपिले फळ भस्मांकिता ॥३३॥
पूर्वजन्म-सहस्त्रांती । सहस्त्र जन्म पुढे होती । भस्मधारणे पापे जाती । बेचाळीस वंशादिक ॥३४॥
 
इहलोकी अखिल सौख्य । होती पुरुष शतायुष्य । व्याधि न होती शरीरास । भस्म लाविता नरासी ॥३५॥
अष्टैश्वर्यै होती त्यासी । दिव्य शरीर परियेसी । अंती ज्ञान होईल निश्चयेसी । देहांती तया नरा ॥३६॥
 
बैसवोनि दिव्य विमानी । देवस्त्रिया शत येऊनि । सेवा करिती येणे गुणी । घेऊनि जाती स्वर्गभुवना ॥३७॥
विद्याधर सिद्धजन । गंधर्वादि देवगण । इंद्रादि लोकपाळ जाण । वंदिती समस्त तयासी ॥३८॥
 
अनंतकाळ तया स्थानी । सुखे असती संतोषोनि । मग जाती तेथोनि । ब्रह्मलोकी शाश्वत ॥३९॥
एकशत कल्पवरी । रहाती ब्रह्मलोकी स्थिरी । तेथोनि जाती वैकुंठपुरी । विष्णुलोकी परियेसा ॥२४०॥
 
ब्रह्मकल्प तीनवरी । रहाती नर वैकुंठपुरी । मग पावती कैलासपुरी । अक्षय काळ तेथे रहाती ॥४१॥
शिवसायुज्य होय त्यासी । संदेह सोडोनिया मानसी । लावा त्रिपुंड्र भक्तीसी । सनत्कुमारादि सकळिक हो ॥४२॥
 
वेदशास्त्रदि उपनिषदार्थ । सार पाहिले मी अवलोकित । चतुर्विध पुरुषार्थ । भस्मधारणे होय जाणा ॥४३॥
ऐसे त्रिपुंड्रमहिमान । सांगितले ईश्वरे विस्तारून । लावा तुम्ही सकळ जन । सनत्कुमारादि ऋषीश्वर हो ॥४४॥
 
सांगोनि सनत्कुमारासी । गेला ईश्वर कैलासासी । सनत्कुमार महाहर्षी । गेला ब्रह्मलोकाप्रती ॥४५॥
वामदेव महामुनि । सांगती ऐसे विस्तारोनि । ब्रह्मराक्षसे संतोषोनि । नमन केले चरणकमलासी ॥४६॥
 
वामदे म्हणे राक्षसासी । भस्ममाहात्म्य आहे ऐसी । माझे अंगस्पर्शेसी । ज्ञान तुज प्रकाशिले ॥४७॥
ऐसे म्हणोनि संतोषी अभिमंत्रोनि भस्मासी । देता झाला राक्षसासी । वामदेव तया वेळी ॥४८॥
 
ब्रह्मराक्षस तया वेळी । लाविता त्रिपुंड्र कपाळी । दिव्यदेह तात्काळी । तेजोमूर्ति जाहला परियेसा ॥४९॥
दिव्य अवयव झाले त्यासी । जैसा सूर्यसंकाशी । झाला आनंदरूप कैसी । ब्रह्मराक्षस तया वेळी ॥२५०॥
 
नमन करूनि योगीश्वरासी । केली प्रदक्षिणा भक्तीसी । विमान आले तत्‌क्षणेसी । सूर्यसंकाश परियेसा ॥५१॥
दिव्य विमानी बैसोनि । गेला स्वर्गासी तत्क्षणी । वामदेव महामुनी । दिधला तयासी परलोक ॥५२॥
 
वामदेव महादेव । मनुष्यरूप दिसतो स्वभाव । प्रत्यक्ष जाणा तो शांभव । हिंडे भक्त तारावया ॥५३॥
त्रयमूर्तीचा अवतारु । वामदेव तोचि गुरु । करावया जगदोद्धारु । हिंडत होता भूमीवरी ॥५४॥
 
भस्ममाहात्म्य असे थोरु । विशेष हस्तस्पर्श गुरु । ब्रह्मराक्षसासी दिधला वरु । उद्धार गति परियेसा ॥५५॥
समस्त मंत्र असती । गुरूविणे साध्य नव्हती । वेदशास्त्रे वाखाणिती । ’नास्ति तत्त्वं गुरोः परम’ ॥५६॥
 
सूत म्हणे ऋषेश्वरांसी । भस्ममाहात्म्य आहे ऐसी । गुरुहस्ते असे विशेषी । तस्माद्‍ गुरुचि कारण ॥५७॥
येणेपरी त्रिविक्रमासी । सांगती श्रीगुरु विस्तारेसी । त्रिविक्रमभारती हर्षी । चरणांवरी माथा ठेवित ॥५८॥
 
नमन करूनि श्रीगुरूसी । निघाला आपुले स्थानासी । झाले ज्ञान समस्तांसी । श्रीगुरूच्या उपदेशे ॥५९॥
येणेपरी सिद्धमुनि । सांगते झाले विस्तारूनि । ऐकतो शिष्य नामकरणी । भक्तिभावेकरूनिया ॥२६०॥
 
म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । भक्तिभावे ऐकती नर । लाघे चारी पुरुषार्थ ॥२६१॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे भस्ममहिमावर्णन नाम एकोनत्रिंशोऽध्यायः ॥२९॥
 
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ (ओवीसंख्या २६१)

गुरूचरित्रअध्यायएकोणतिसावाभाग1