रविवार, 15 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. नवरात्र 2024
  3. देवीची मंदिरे
Written By
Last Updated : शुक्रवार, 27 सप्टेंबर 2024 (12:00 IST)

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Mahalaxmi devi Kolhapur
श्री महालक्ष्मी कोल्हापूर  
महाराष्ट्रातील कोल्हापूर मध्ये असलेले श्री महालक्ष्मी मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे. अंबाबाई म्हणून ओळखली जाणारी कोल्हापूरची महालक्ष्मी ही भक्तांच्या हाकेला धावणारी आहे. तसेच श्री महालक्ष्मी अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. अंबाबाईचा उल्लेख पुराणात देखील सापडतो. तसेच साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मुख्य शक्तीपीठ म्हणाले कोल्हापूरची अंबाबाई होय. तसेच वास्तुशास्त्राच्या बांधणीनुसार चालुक्य राजवटीत मंदिराचे बांधकाम केले गेले आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आले असून या मंदिराला पाच कळस आहे. असे सांगितले जाते की, श्री महालक्ष्मीची मूर्ती रत्नजडित खड्यांपासून घडविण्यात आली असून ती जवळपास पाच ते सहा हजार वर्षापूर्वीची असावी. कोल्हापूरमध्ये दर वर्षी शारदीय नवरात्र हे भव्य आणि दिव्या स्वरूपात साजरे होते. तसेच नवरात्रीला लाखोंच्या संख्येने भक्त कोल्हापुरात दाखल होतात. तसेच वर्षातून दोनदा साजरा होणारा ‘किरणोत्सव’ हा सोहोळा ह्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. दर वर्षी मार्च आणि नोव्हेंबरमध्ये हा सोहोळा साजरा केला जातो. ठराविक दिवशी उगवित्या सूर्याची किरणे महालक्ष्मीच्या पायांशी पडतात. हा सोहोळा पाहण्यासाठी, अनुभविण्यासाठी हजारो भाविक आवर्जून कोल्हापुरामध्ये येत असतात. या शिवाय रथोत्सव, अष्टमी जागर, ग्रहण, गोकुळाष्टमीला विशेष आरती केली जाते. 
Tuljabhavani temple
श्री तुळजाभवानी तुळजापूर 
महाराष्ट्रातील तुळजापूर मध्ये असलेली तुळजाभवानी ही साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ मानले जाते. तुळजापुरातील तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र हे पूर्ण आणि आद्यपीठ मानले जाते. पुराणानुसार असुरांचा संहारकरून धर्माचरण आणि नीतीची पुनर्स्थापना करण्याचे कार्य तुळजाभवानी देवी आईने केले आहे. तसेच स्वराज्य हिंदवीचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज भोसले यांची कुलदेवी देखील हीच तुळजाभवानी आहे. तसेच महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये तुळजाभवानी देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो व भक्तांची गर्दी असते. नवरात्र महोत्सवात देशभरातून भवानीमातेचे भक्त मनोभावाने देवीची ज्योत पेटवून नेतात. तसेच संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून भवानीमातेला मान आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे देवी मंदिराच्या मागच्या बाजूस काळा दगडाचा चिंतामणी असून तो गोल आकाराचा आहे. आपले काम होईल की नाही याचा कौल हा चिंतामणी देतो. तसेच श्री तुळजाभवानी मातेच्या नवरात्र उत्सव  मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. 
श्री रेणुका देवी माहूर 
महाराष्ट्रातील माहूरगड मध्ये असलेली रेणुका देवी ही साडेतीन शक्तिपीठांपैकी एक एक पीठ असून जागृत देवस्थान आहे. अनेक जणांची कुळदैवता असलेली रेणुका मातेच्या मंदिरात शारदीय नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी होते. तसेच रेणुका म्हणजे एकविरा आणि एकविरा म्हणजे रेणुका असा उल्लेख पुराणात सापडतो. दैवत्व एक असले तरीही त्या दोन्ही देवीची नावे व स्थान वेगवेगळे आहे. संकट काळात भक्ताचे रक्षण करणारी रेणुका माउली या देवीचं देऊळ यादव काळातील राजाने बांधले आहे अशी आख्यायिका आहे. तसेच माहूर गडावर माता रेणुकेचे कमलाकर असे देऊळ आहे. हे देऊळ वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आले आहे. तर देऊळ हे गाभारा आणि सभामंडपात विभागलेले आहेत. गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश देत नाही. गाभाऱ्याचे प्रवेश द्वार चांदीच्या पत्राचे आहे. देवीचा मुखवटा तब्बल 5 फुटी उंचीचा असून  रुंदी 4 फुटी एवढी आहे. तसेच देवीचा हा मुखवटा पूर्वाभिमुखी आहे. मुखावर सहस्त्र सूर्याचे तेज असलेली माता रेणुकेचे मोहक रूप डोळ्यातच साचवून ठेवण्या सारखे असते. शारदीय नवरात्र हे माहूरगडावर शुचिर्भूत वातावरणात आणि श्रद्धेने साजरा करतात. नऊ दिवस या गडावर भाविकांची गर्दी उसळून येते. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवसापासून ते दसऱ्या पर्यंत दर रोजचा नैवेद्य म्हणजे दहीभात, पुरणपोळी दाखवतात. ललितापंचमीला नवीन वस्त्र आणि अलंकार दिले जातात. माहूर गडावर कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी, शाकंभरी नवरात्र, चंपाषष्ठी, मकरसंक्रांत, होळी इत्यादी सर्व सण साजरे केले जातात. 
Saptashrungi
श्री सप्तशृंगी देवी वणी 
साडेतीन शक्तिपीठांपैकी असलेले अर्धे शक्तीपीठ म्हणजे वणीची सप्तशृंगी देवी होय. महाराष्ट्रातील नाशिकजवळ असलेले वणी हे सप्तशृंगी देवीचे निवासस्थान आहे. अतिशय जागृत देवस्थान म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. देवीआईचे हे मंदिर 4800 फूट उंचीवर आहे. तसेच देवीची मूर्ती आठ फुटी उंच असून तिला अठरा भुजा आहे. तर मूर्ती शेंदूर अर्चित असून रक्तवर्णी आहे. या देवीआईला 18 हात असून तिला अष्टादश देवी असेही म्हणतात. तसेच गडावर शारदीय नवरात्रोत्सव, गुडी पाडवा, चैत्रउत्सव, गोकुळाष्टमी, कोजागिरी उत्सव, लक्ष्मी पूजन, हरिहर भेट, महाशिवरात्र इत्यादी उत्सव गडावर भव्य आणि दिव्य साजरे केले जातात. 
 
श्री योगेश्वरी देवी अंबाजोगाई 
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असलेले अंबाजोगाई मध्ये स्थित योगेश्वरी देवीचे मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. तसेच हे मंदिर बीड मधील सर्व प्रतिष्ठित मंदिरांपैकी एक मंदिर आहे. योगेश्वरी मंदिर हे देवी योगेश्वरीला समर्पित आहे. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवीआई म्हणून या देवीचे विशेष महत्व आहे. योगेश्वरी देवी मंदिर जयंती नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थित आहे. तसेच या मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीतील आहे. मराठवाड्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून अंबाजोगाई ओळखले जाते. श्री योगेश्वरी देवीचे हे एक एक प्राचीन मंदिर आहे. तसेच शारदीय नवरात्रोत्सव येथे भव्यदिव्य साजरा केला जातो. नवरात्रोत्सव दरम्यान हजारोंच्या संख्येने भक्तगण बीड मध्ये दाखल होतात. 
ekvira devi dhule
श्री एकविरा देवी धुळे 
महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात देवपूर या उपनगरात असलेल्‍या तसेच सुर्यकन्‍या तापी नदीची उपनदी म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या पांझरा नदीच्‍या तीरावर आदिमाया एकवीरा देवीचे अतिप्राचीन मंदीर आहे. शेंदूर लेपीत आणि पद्मासनी बसलेली ही स्‍वयंभू देवी महाराष्‍ट्रासह मध्‍यप्रदेश, राजस्‍थान, कर्नाटक आणि गुजरातमधील अनेक भाविकांची कुलदेवता असल्‍याने येथे सतत वर्दळ असते. तसेच भक्‍तांच्‍या संकटांना दूर करून त्‍यांची मनोकामना पूर्ण करणारी, नवसाला पावणारी, स्‍वयंभू अशी ही देवी असल्‍याची भाविकांची श्रध्‍दा आहे. तसेच मंदिराच्‍या परिसरात प्राचीन शमीवृक्ष असून वृक्षाखालीच शमीदेवतेचे भारतातील एकमेव मंदिर आहे. मंदिराच्‍या परिसरात नित्‍यनियमित पूजा अर्चा आणि आरती अभिषेक करण्‍यात येतो. तसेच पौर्णिमा आणि आमावस्‍येच्‍या आदल्‍या दिवशी देवीला पंचामृत स्‍नान करून अभिषेक केला जातो. शारदीय नवरात्रोत्‍सवाच्‍या काळात येथे मोठा उत्‍सव आणि जत्रेचेही आयोजन केले जात असते. शारदीय नवरात्रोत्‍सवाच्‍या काळात हजारोंच्या संख्येने भाविक धुळ्यामध्ये दाखल होतात. 
 
manu devi
श्री मनुदेवी जळगाव 
महाराष्ट्रातील यावल-चोपडा मार्गावर आडगाव गावापासून आठ किलोमीटर असलेले मनुदेवीचे अतिप्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. तसेच सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या या मंदिरातील मनुदेवीला सातपुडा निवासिनी म्हणून देखील ओळखले जाते. हे मंदिर चारही बाजूंनी हिरवळीने घेरलेले आहे. येथील धबधबा  आकर्षणाचे केंद्रबिंदू मानला जातो. तसेच सांगण्यात येते की, इ. स. १२५० मध्ये मनुदेवीची स्थापना करण्यात आली आहे. राक्षसांचा वध करण्यासाठी  मनुदेवीची स्थापना करण्यात आली होती. मंदिराच्या परिसरात प्राचीन आठ विहिरी आढळतात. तसेच मनुदेवीची यात्रा वर्षातून चारवेळॆस भरते. तसेच शुद्ध अष्टमीला नवचण्डी करून महायाज्ञ आयोजित केला जातो. तसेच शारदीय नवरात्रोत्‍सव मोठ्या उत्साहात साजरी केला जातो. नवरात्रोत्‍सवात दहा दिवस हजारोंच्या संख्येने भक्तगण मनुदेवीचे दर्शन घेण्यासाठी दाखल होतात. 
 
dahanu mahalakshmi
श्री महालक्ष्मी देवी डहाणू  
मुंबई अहमदाबाद महामार्गावर डहाणू रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर असणाऱ्या महालक्ष्मीचे हे देवस्थान जागृत आहे. तसेच डहाणूची महालक्ष्मी हे एक जागृत देवस्थान असून भक्ताच्या हाकेला धावणारी देवी आहे. या देवीची यात्रा चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून म्हणजेच हनुमान जयंतीपासून पुढे 15दिवस चालते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या जत्रेसाठी भाविक येतात. तसेच डहाणू येथील महालक्ष्मी मंदिरात शारदीय नवरात्रोत्‍सव देखील मोठ्या उत्साहात साजरा होतो. लाखोंच्या संख्येने भाविक देवी आईच्या दर्शनासाठी येतात. तसेच आदिशक्ती महालक्ष्मीची महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी स्थाने आहे. यातीलच एक महत्वाचे स्थान म्हणजे डहाणूची महालक्ष्मी. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचा पुजारी आदिवासी समाजातील आहे. या लोकात ही देवी कोळवणची महालक्ष्मी म्हणून प्रसिद्ध आहे.
 
मुंबादेवी मुंबई 
मुंबईचे मुंबा देवी मंदिर महाराष्ट्रातच नाही तर देशभरात खूप प्रसिद्ध आहे. मुंबादेवी मंदिर मुंबईच्या भुलेश्वर, येथे आहे.हे मंदिर सुमारे 400 वर्ष जुने आहे. या मंदिराची स्थापना कोळी बांधवानी केली आहे. देवी आईच्या आशीर्वादाने त्यांचा भरभराट झाला. कोळी बांधवांचा असा विश्वास आहे की, मुंबा देवी आई त्यांचे समुद्रापासून संरक्षण करते. या मंदिरातील देवीची मूर्ती नारंगी रंगाची असून चांदीच्या मुकुटाने सुशोभित आहे. देवीच्या मुर्तीजवळच शेजारी आई अन्नपूर्णा आणि जगदंबेची मूर्ती स्थापित केली आहे. या मंदिरात दिवसातून सहावेळा आरती केली जाते. यामंदीरात शारदीय नवरात्रोत्‍सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातॊ.
मांढरदेवी काळुबाई सातारा 
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्रीकाळेश्वरी म्हणजेच काळूबाई ही देवी नवसाला पावणारी आहे. तसेच गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान असलेल्या काळूबाईचे स्थान शंभू-महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे-साताऱ्या जिल्हा तसेच वाई भोर-खंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहद्दीच्या शिखरावर वसलेले आहे.हे देवीचे मंदिर कोणी आणि कधी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही. मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर प्राचीन आहे. तसेच देवीला तिच्या वार्षिक यात्रोत्सवाच्या दिवशी म्हणजे पौष महिन्याच्या पौर्णिमेला देवी आईच्या चेहऱ्यावर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसवतात. देवी आईने पौष पौर्णिमेला रात्री दैत्याचा वध केला आणि विजय मिळवला. याकरिता पौष पौर्णिमेला देवीआईची मोठी यात्रा भरते. या काळात लाखो भाविक देवीआईचे देव्हारे घेऊन मांढरगडावर येतात. तसेच शारदीय नवरात्रोत्‍सव देखील या मंदिरात भव्य दिव्य साजरे केले जाते. 
 
virar
जीवदानी देवी विरार 
महाराष्ट्रातील विरारमध्ये डोंगरावर वसलेले सर्वात महत्त्वाचे ठिकाण म्हणजे आई जीवदानी देवीचे मंदिर आहे. तसेच विरार मध्ये असलेले हे 150 वर्ष जुने आई जीवदानी मंदिर हजारो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. जमिनीपासून एका टेकडीवर उंचावर असलेले मंदिर हे आपल्या अनेक पर्यटकांना देखील आकर्षित करते. आई जीवदानी देवीच्या मंदिरात शारदीय नवरात्रोत्‍सव सोबत इतर सण देखील मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. तसेच सणासुदीला अनेक भक्त आई जीवदानी देवीचे दर्शन घेण्यासाठी या टेकडीवर दाखल होतात.