गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By
Last Modified: रविवार, 16 ऑगस्ट 2020 (08:21 IST)

गणेशाला हत्तीचे मस्तक असल्यामागील कथा

ब्रह्मवैवर्त पुराणात दिलेल्या वर्णनाप्रमाणे-
एकदा श्री शंकराने देवी पार्वतीला दु:खी पाहून विचारले की "तुझ्या दुःखाचं कारण काय?'' 
त्यावर पार्वतीने म्हटले आपण देवाधिदेव आहात, आपण त्रैलोक्‍याचा स्वामी असूनही मला संतती नाही. यापेक्षा मोठे दुःख काय असणार?" 
 
यानंतर श्री शंकरांनी पार्वतीला एक वर्ष श्री विष्णूची उपासना आणि एक व्रत करण्याविषयी सांगितले. मोठ्या निश्‍चयाने तिने ते व्रत केले. अखेर पार्वतीला प्रत्यक्ष श्री विष्णूंनी दर्शन दिले. पार्वतीने आपली इच्छा बोलून दाखविली. तिला 'तथास्तु' म्हणून भगवान अंतर्धान पावले. नंतर एके दिवशी ब्राह्मणाच्या रूपाने येऊन श्री विष्णूंनी शंकर-पार्वती यांची परीक्षा घेतली. त्या दोघांनी केलेल्या आतिथ्याने तृप्त होऊन त्यांनी इच्छापूर्तीचा आशीर्वाद दिला, आणि मग काय! चमत्कारच घडला. 
 
पार्वती घरात जाऊन पाहते तो तिच्या शय्येवर एक गोजिरे हसरे, देखणे बालक दृष्टीस पडले. हे बाळ कुणाचे असे विचारात पडली असतानाच आकाशवाणी झाली- 
 
"पार्वती, सर्व जण ज्याचे ध्यान करतात, सर्वांआधी ज्याचे पूजन होते, ज्याच्या केवळ स्मरणानेच विघ्ने दूर पळतात असा हा बाळ तुझा पुत्र आहे."
 
शंकर-पार्वती फार आनंदित झाले. आता त्यांच्याकडे बाळाला पाहण्यासाठी अनेक देव, ऋषी, देवगण येऊ लागले. एक मोठा मंगल उत्सव झाला. पार्वती आपल्या पुत्राला अंगावर घेऊन बसली होती. त्याच वेळी पलीकडे शनैश्‍चर हा सूर्यदेवाचा मुलगा खाली मान घालून बसलेला बघून पार्वतीने विचारले, "अरे, तू खाली मान घालून काय बसलाहेस?" 
 
"देवी, काय सांगू, हे माझ्या कर्माचे फळ भोगतोय मी," शनैश्‍चर दुःखाने म्हणाला. 
पार्वतीने खोदून विचारल्यावर तो दुःखाने म्हणाला, "देवी, मला शाप मिळाला आहे. मी ज्या वस्तूकडे पाहीन ती वस्तू नष्ट होईल. म्हणून मी कोणालाही पाहत नाही." 
"असू दे शनैश्‍चरा, प्राक्तनात असेल ते होईल,'' असे पार्वतीने त्याला म्हटले. 
शनैश्‍चराला दोन्ही बाजून पेच पडला. अखेर त्याने उजव्या डोळ्याच्या कोपऱ्यातून पार्वतीच्या सुंदर बाळाकडे पाहिले. त्याच क्षणी त्या बाळाचे मस्तक उडाले नि थेट भगवान श्रीकृष्णाच्या पुढ्यात जाऊन पडले. 
 
श्रीकृष्णाने अंतर्ज्ञानाने सर्व काही जाणले. ताबडतोब गरुडावर आरूढ होऊन श्रीकृष्ण उत्तर दिशेला पुष्पभद्रा नदीच्या रोखाने निघाला. तेथे नदीच्या तीरावर त्याला एक हत्ती दिसला. त्या हत्तीचे मस्तक कापून घेऊन तो तातडीने निघाला. कैलासावर येताच त्या ठिकाणी शिरावेगळ्या पडलेल्या बालकाच्या धडावर ते हत्तीचे मस्तक बसविले आणि त्याने बालकाला जिवंत केले. 
 
यानंतर पार्वतीलाही शुद्धीवर आणले गेले. मग स्वतः विष्णूंनी त्या बालकाची पूजा केली. विष्णूंनी त्या वेळी असे स्पष्टपणे सर्वांना सांगितले, "सर्वप्रथम याचीच पूजा केली जाईल आणि या बालकाची विघ्नेश, गणेश, हेरंब, गजानन, लंबोदर, एकदन्त, शूर्पकर्ण आणि विनायक अशा आठ नावे सर्वप्रकारच्या सिद्धी प्राप्त करून देणारी ठरतील."