सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

Apara Ekadashi अपरा एकादशी महात्म्य

Apara Ekadashi Mahatmya
युधिष्ठिर म्हणाला, ‘जनार्दना, वैशाख कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिचे नाव काय व माहात्म्य काय ? हे ऐकण्याची मला इच्छा आहे. तेव्हा ते सर्व सांग.’
 
श्रीकृष्ण म्हणाले, ‘राजा तू लोकांचे कल्याण व्हावे म्हणून चांगला प्रश्न विचारला आहेस. या एकादशीचे नाव अपरा असून ती अपार फल देणारी आहे. राजा, ती खूप पुण्य देणारी असून महापातकांचाही नाश करते. जो या अपरा एकादशीचे व्रत करतो त्याला या जगात खूप कीर्ती लाभते. या अपरा एकादशीचे व्रत केल्यामुळे ब्रह्महत्येचे पाप केलेला, गोत्राचा नाश करणारा, गर्भहत्या करणारा, खोटे आरोप करणारा, परस्त्रीवर भाळणारा, अशा सर्वांची पापे निश्चितपणे नाहीशी होतात. खोटी साक्ष देणारे, खोटा तराजू वापरणारे, खोटी वजने वापरणारे, लबाडीने वेदाध्ययन करणारा, लबाडीने गणित करणारा ज्योतिषी, लबाडीने खोटी चिकित्सा करणारा वैद्य, हे सर्वजण खोटी साक्ष देणार्‍या इतकेच दोषी असतात आणि ते नरकात जातात. 
 
राजा, परंतु या लोकांना जर अपरा एकादशीचे व्रत केले तर त्यांची त्या त्या पापातून मुक्तता होते. जो क्षत्रीय आपला क्षात्रधर्म सोडून युध्दातून पळ काढतो, तो आपल्या धर्मातून भ्रष्ट होऊन घोर नरकात पडतो. परंतु त्याने जर अपरा एकादशी केली तर तो त्या पापातून मुक्त होऊन स्वर्गाला जातो. जो शिष्य गुरुकडून विद्या मिळवल्यावर त्याची निंदा करतो त्याला महापातक लागते. आणि त्याला दारुण नरकवास प्राप्त होतो. परंतु त्याने अपरा एकादशीचे व्रत केल्यास त्या माणसाला सद्गती लाभते. तीन प्रकारच्या पुष्कर तीर्थात कार्तिक मासात स्नान केल्याने जे पुण्य मिळते, तेच पुण्य ही एकादशी केल्यामुळे मिळते.
 
तसेच माघ मासात मकर संक्रातीला प्रयाग क्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य, काशी क्षेत्रात शिवरात्रीचा उपवास केल्याचे पुण्य, सर्व सुवर्ण दान दिल्यामुळे मिळणारे पुण्य, अशी सर्व गुरुग्रह, सिंह राशीत आला असता गोदावरीत स्नान केल्याचे पुण्य, कुंभ संक्रांतीला बद्रिकेद्वारला दर्शन घेतल्याचे पुण्य, बद्रिनारायणाची यात्रा केल्याचे व तेथील तीर्थसेवनाचे पुण्य, अशी सर्व पुण्ये या एकाच अपरा एकादशीचे व्रत केल्याने मिळत असतात.
 
कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणाच्या वेळी स्नान केल्याने मिळणारे पुण्य हत्ती, घोडा, सोने दान दिल्याने मिळणारे पुण्य, अशी सर्व पुण्ये या अपरा एकादशीच्या व्रताने मिळतात. अर्धप्रसूत गाईचे दान देऊन किंवा सुवर्णदान देऊन किंवा पृथ्वी दान देऊन जे पुण्य मिळते तेच पुण्य़ या एकादशीच्या व्रतामुळे मिळते. अपरा एकादशीचे हे व्रत म्हणजे पापरुपी वृक्षाचा छेद करणारी कुर्‍हाड आहे. पापरुपी इंधन जाळणारा, रानातला वनवा आहे. किंवा पापरुपी अंधकार नाहीसा करणारा सूर्य आहे किंवा पापरुप हरीण खाऊन टाकणारा सिंह आहे.
‘राजा, ज्याला पापाची भीती वाटत असेल, त्याने ही एकादशी करावी. जे लोक एकादशीव्रत करीत नाहीत, ते पाण्यावरच्या बुडबुडयाप्रमाणे निरर्थक जन्माला येतात, किंवा लाकडाच्या बाहुलीप्रमाणे केवळ मरणासाठीच जन्मलेले असतात.
 
अपरा एकादशीचे उपोषण करुन जो मनुष्य त्रिविक्रम देवाची पूजा करतो. तो सर्व पापातून मुक्त होऊन विष्णुलोकाला जातो. धर्मराजा, ही कथा लोकांच्या कल्याणाकरता मी तुला सांगितली आहे. ही कथा वाचली किंवा ऐकली तरीही सर्व पापातून मुक्तता होते.
॥ ब्रह्मांडपुराणातील अपरा एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥