मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 19 जून 2024 (11:25 IST)

श्री कोकिळा माहात्म्य अध्याय सतरावा

श्रीगणेशाय नम: ॥
धर्म विनवी कर जोडुनी ॥ कथा सांगावी मोक्षदायनी ॥ श्रवण तृप्त होती जिचेनी ॥ पावन होती श्रवणमात्रें ॥१॥
तुजविण आमुचें मन ॥ तृप्त करी ऐसा कोण ॥ तूं दयानिधी पतितपावन ॥ आम्ही दीन तुझे पैं ॥२॥
आमुची पुरवील कोण आशा ॥ तूं कृपाळु सर्वेशा ॥ आनंदकंदा पूर्णप्रकाशा ॥ आमुची आशा पुरवी तूं ॥३॥
ऐसें बोलोन राजा धर्म ॥ चरण धरी होऊनि सप्रेम ॥ आनंदल अतिउत्तम ॥ मुख पाहोनी हरीचें ॥४॥
हरी बोले आनंदेंकरुन ॥ धर्मा ऐक चित्त देऊन ॥ तेणें करुनी पापहानी ॥ करी क्षय एकदांची ॥५॥
कथा हे उत्तम फार ॥ श्रवणीं चिंतीत फळ देणार ॥ तरी तूं आतां होऊनि सादर ॥ कथा श्रवण करी कां ॥६॥
पूर्वी राजा वैश्रवण ॥ त्याचे कुळीं जन्मला श्रावण ॥ तो श्रावण अति सुलक्षण ॥ पुण्यशीळ धर्मिष्ठ ॥७॥
श्रावण राज्य करी निरंतर ॥ मातृपितृ सेवा करी फार ॥ आनंदे उल्हास अंतर ॥ प्रसन्न वदनें सेवा करी ॥८॥
मातापिता दोघेजन ॥ आवडती जैसे प्राण ॥ वृध्दे हीं वांचोत बहुत दिन ॥ ऐसें म्हणतसे निरंतर ॥९॥
मातापिता उठतांच सेजेवरून ॥ शौच्यास पाणी ठेवी आणून ॥ शौच करुनी येताना ॥ पात्र आप्ण धुतसे ॥१०॥
चौरंग मांडी बैसावयाला ॥ पाणी देत पादक्षालनाला ॥ याचप्रमाणें नित्य नेमाळा ॥ उष्णपाणी देत तात्काळ ॥११॥
हस्तपाद मुख धुतलीयावरी ॥ सुगंध तेल त्यांचे शरिरीं ॥ उटणें लाउनी झडकरी ॥ स्नानास उष्णोदक देतसे ॥१२॥
करवून त्यांसी मंगळस्नान ॥ पाणी देत आचमनालागुन ॥ वस्त्रें उत्तम आणून ॥ देतसे नित्य दोघांसी ॥१३॥
आणिक वस्त्र आणून झडकरी ॥ ते लेववी दोघांचे शरीरीं ॥ दोघे नेऊण मंदिरी ॥ उत्तमासनीं बैसविले ॥१४॥
मातेस हरिद्राकुंकुम देऊन ॥ पितयास चंदन चर्चून ॥ सुगंधमाळा पुष्प आणून ॥ गळां घाली दोघांच्या ॥१५॥
धूप दाखवी अति उत्तम ॥ मग आरती करी सप्रेम ॥ साष्टांग नमस्कार घालून ॥ नैवेद्य आणि पंचामृत ॥१६॥
नैवेद्यासी नाना पक्वान्न ॥ करी घृत पाचितअन्न ॥ विडे भोजन झालीया जाण ॥ देऊनी तयासी आनंदवी ॥१७॥
कर्पूर घोळुन सुपारी ॥ वर्खि लवंगा त्यावरी ॥ जायफळ जायपत्री बरी ॥ विडे देत अतिप्रीतीं ॥१८॥
विडे घेतल्यावरी ॥ मग उत्तम मंचकावरी ॥ पहुडवी दोघां निर्धारीं ॥ बैसे पाय चुरित ॥१९॥
चरणतीर्थ दोघांचे घेऊन ॥ प्राशन करी आपण ॥ मग सहपत्नी भोजन ॥ बैसती आनंदें ॥२०॥
ऐसी सेवा रात्रंदिवस ॥ दासी करी विशेष ॥ न विसंबे तयास ॥ प्राणही गेलिया ॥२१॥
नमस्कार करी क्षणक्षणा ॥ वारंवार घाली प्रदक्षणा ॥ श्रावणाचे मनीं हर्ष जाणा ॥ होतसे सेवा करितांची ॥२२॥
कोण एके अवसरीं ॥ उत्पन्न झालें अंतरीं ॥ वाराणसी यात्रे जावें निर्धारीं ॥ श्रावणास पुसति दोघें ती ॥२३॥
श्रावण म्हणे तयांलागुन ॥ चला मी नेतों तुम्हांकारणें ॥ तुमचें वचन मज प्रमाण ॥ दुसरें न आवडे सर्वथा ॥२४॥
तुम्ही माझें केवळ दैवत ॥ तुम्ही माझे प्राण निश्चित ॥ तुमचें वचन करी सत्य ॥ तरीच जन्मोनी सार्थक ॥२५॥
तुमचें वचन सत्य करीन ॥ दोघां तुम्हास काशीस नेईन ॥ मग बुरडा घरी जाऊन ॥ कावड एक आणिली ॥२६॥
कावड आणिली विस्तीर्ण ॥ मध्यें मृदु आंथरुण करुन ॥ त्यांत बैसविलें दोघेजण ॥ आनंद चित्तीं न समाये ॥२७॥
मनी आनंदला थोर ॥ म्हणे धन्य माझे शरीर ॥ पावन झालो निर्धार ॥ उल्हासें अंतर श्रावणाचें ॥२८॥
आनंदेंकरुनी चालिला ॥ वाराणसीचा वेध लागला ॥ कांही पंथ क्रमिला ॥ तों अद्भुत वर्तलें ॥२९॥
मातापिता दोघे बोलती ॥ श्रावणा तृषा लागली आम्हाप्रती ॥ पाणी पाजी शीघ्रगती ॥ प्राण व्याकुळ तृषेनें ॥३०॥
श्रावणें हें ऐकून ॥ कावड तेथें ठेविली जाण ॥ गेला पाणी आणावयालागुन ॥ झारी करीं घेतलीसे ॥३१॥
दोघांसी म्हणे असावें स्थिर ॥ पाणी घेऊन येतों सत्वर ॥ ऐसें बोलोनियां त्वरें ॥ पाणी शोधास गेला पैं ॥३२॥
वनोवनीं फिरे श्रावण ॥ पाणी न मिळे होत हैरण ॥ तों एक सरोवर देखोन ॥ पाणी आंत भरलेंसे ॥३३॥
पाणी तेथें असे शीतळ ॥ आंत कमळ निर्मळ ॥ तेथें जाऊनि तयावेळे ॥ झारी बुडवूं लागला ॥३४॥
झारी बुडवावया जात ॥ तों तेथें बैसला राजा दशरथ ॥ सूर्यवंशी जो विख्यात ॥ त्रिभुवनामाजी धन्य तो ॥३५॥
त्याचे कानीं तो शब्द पडला ॥ त्यास वाटलें कीं गज आला ॥ धनुष्यासी बाण लाविला ॥ सोडिता झाला दशरथ ॥३६॥
न पाहतां सोडिला बाण ॥ तात्काळ गेला तेथें श्रावण ॥ त्याचे ह्रदयीं भेदून ॥ बाण गेला निघोनी ॥३७॥
रामराम बोलून वाणी ॥ श्रावण तेव्हां पडला धरणी ॥ तेव्हां दशरथें धांवोनी ॥ तो मूर्छित श्रावण देखिला ॥३८॥
मूर्छित पडिला श्रावण ॥ तयासी दशरथें पाहून ॥ परम पेटला चिंताग्नि ॥ शोक अपार करी तेव्हां ॥३९॥
अहा प्राक्तनाची गती ॥ ब्रह्म हत्या घडली निश्चितीं ॥ अहा कर्मा कैसी गती ॥ हें पाप मज घडलें कीं ॥४०॥
वांझोटा मशीं म्हणती जाण ॥ त्यावरी ब्रह्महत्या घडली दारुण ॥ महादु:ख झाले पूर्ण ॥ म्हणोन दशरथ शोक करी
॥४१॥
तों श्रावण हळुच बोलत ॥ दशरथा हे झारी घेई त्वरित ॥ मातापिता माझीं तृपाक्रांत ॥ असती वनी दोघें तीं ॥४२॥
त्यास तुवां पाणी नेऊण ॥ पाजी आतां सत्वर जाण ॥ दशरथा तीं उदकावीण ॥ प्राण देती सर्वथा ॥४३॥
माझी दशा ही जाहली ॥ इतुकें बोलोनी ते वेळीं ॥ मूर्छेनें व्यापिला तात्काळीं ॥ प्राण सोडिला श्रावणें ॥४४॥
दशरथ विचारी अंतरी ॥ ब्रह्महत्या घडली निर्धारीं ॥ आतां त्यास पाणी न पाजूं जरी ॥ तरी तेही मरतील ॥४५॥
दशरथ झारी घेऊनी ॥ तात्काळ चालला तेक्षणीं ॥ हिंडता झाला घोरवनी ॥ दोघांलागीं पाहतसे ॥४६॥
तों कावडी देखिली अवचित ॥ दोघें बैसलीं असती आंत ॥ पुत्राची वाट पाहत ॥ पाणी घेऊनी यईल ॥४७॥
तो तेथें दशरथ गेला ॥ झारी घेऊनी उभा राहिला ॥ मौन्येच दोघांचे मुखाला ॥ झारी दशरथ लावित ॥४८॥
ती म्हणती श्रावणपुत्रा ॥ पाणी आणिलें परम पवित्रा ॥ तूं श्रमलासी सुकुमारा ॥ आम्हां दोघां कारणें ॥४९॥
ऐसें दोघें बोलती ॥ दशरथ न बोले निश्चितीं ॥ दोघेंही तेव्हां म्हणती ॥ कां न बोलसी तान्हया ॥५०॥
कीं आम्हांवर रुसलासी ॥ आमुचा त्रास आला तुजसी ॥ जरी तूं न बोलसी ॥ तरी पाणी आम्ही न पिऊं ॥५१॥
म्हणोनी तीं दोघेंजण ॥ पाणी न पीति सत्य जाण ॥ तो दशरथ म्हणे तयांलागुन ॥ श्रावण मृत्यु पावला ॥५२॥
न कळतां माझे शरिरीं ॥ श्रावणहत्या घडली खरी ॥ मृगमिषें निर्धारीं ॥ बाण माझा लागला ॥५३॥
तेणीं मृत्यु पावला श्रावण ॥ पाणी म्यां आणिलें तुम्हांलागुन ॥ पिऊन व्हावें सावधान ॥ कांही आज्ञा करा मज ॥५४॥
ऐसी दशरथाची वाणी ॥ ऐकोन शोक करिती तेक्षणीं ॥ म्हणती सुपुत्रा तुजलागोनी ॥ कोणत्या स्थानीं पहावें ॥५५॥
अहा श्रावणा अवधारीं ॥ आम्हांस टाकूनच वनांतरीं । तूं गेलासी निर्धारी ॥ हरी आम्हावरी कोपला ॥५६॥
कोठें आतां आम्ही जावें ॥ कोणतेस्थानी रहावें ॥ कोणासंगे बोलावें ॥ हितगुज श्रावणा ॥५७॥
कोण आम्हांस घालील स्नान ॥ कोण आम्हांस करवील भोजन ॥ कोण आम्हास पाणी पान ॥ शयन कोण करवील
॥५८॥
कोण आम्हास विडा देईल ॥ कोण आमुची सेवा करील ॥ कोण आम्हास रक्षील ॥ तुजवांचोनी श्रावणा ॥५९॥
श्रावणा आम्ही करावें काय ॥ श्रावणा आमुचें कठोर ह्रदय ॥ प्राण अझुनी न जाय ॥ तुजविण श्रावणा ॥६०॥
श्रावणा आम्ही बहुत चांडाळ ॥ आम्हां आधीं तूं पावलासी मरण ॥ आमुचा प्राण निश्चित ॥ अद्यापि कां न जाय ॥६१॥
दशरथा हें त्वां काय केलें ॥ आम्ही आधीं मरावें पहिलें ॥ आधींच श्रावणास मारिलें ॥ हें दुश्चित त्वां केलें ॥६२॥
आतां कोण करावी गती ॥ नेत्र अंध न दिसे क्षितीं ॥ दशरथा शस्त्र काढी निश्चितीं ॥ वधी आम्हा दोघातें ॥६३॥
नाही तरी आणि वीष ॥ आम्हां दोघां पाजि नि:शेष ॥ नाहींतरी विहिरींत आम्हास ॥ लोटोनी देईं सर्वथा ॥६४॥
दशरथा आतां श्रावणावीण ॥ जातातरे आमुचे प्राण । तूं पुत्रशोकें करुन ॥ मरण पावसी दशरथा ॥६५॥
ऐसें दोघें बोलोनी ॥ प्राण सोडिले तेचक्षणीं ॥ हे द्शरथें पाहुनी ॥ शोक अपार करीतसे ॥६६॥
म्हणे ईश्वरा काय केलें ॥ तीन हत्या घडल्या एक वेळे ॥ म्हणोनी नेत्री अश्रु लोटले ॥ दशरथाचे तेसमयीं ॥६७॥
दशरथ मूर्छित पडला ॥ आंगासी बहुत धर्म आला ॥ रामराम मुखीं वदता जाहला ॥ नेत्र तेव्हां झांकिले ॥६८॥
समजाऊन मनाप्रती ॥ दशरथ उठिला शीघ्रगती ॥ सरणरची तिघांप्रती ॥ अग्नि दिला निजहस्तें ॥६९॥
तिन्हीं प्रेतें जाळुनी ॥ दशरथा आला तेक्षणीं ॥ अंतरीं जाळी चिंताग्नी ॥ ब्रह्महत्या शापाची ॥७०॥
ऐकी धर्मा सादर ॥ कोकिळा महात्म्य परिकर ॥ तुज सांगतो वारंवार ॥ हें व्रत करी अगम्य ॥७१॥
कोकिळाव्रताचा महिमा ॥ त्याची कोण करील सीमा ॥ चतुर्मुख जो कां ब्रह्मा ॥ त्याचेनी हे न वर्णवें ॥७२॥
धनप्राप्त होत लवलाही ॥ स्त्रियासी कधीही वैधव्य नाहीं ॥ श्रवणमात्रें कामना पाही ॥ पूर्ण होती सर्वथा ॥७३॥
ऐसी कथा पुण्यपावन ॥ श्रवणें पातकें जाती जळोन ॥ कृष्ण सांगे धर्मालागुन ॥ कथा उत्तम म्हणोनी ॥७४॥
इति श्रीस्कंदपुराणे ॥ ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिळामहात्म्ये ॥ सप्तदशमोऽध्याय गोडहा ॥ अध्याय ॥१७॥
 ओंवी ॥७४॥
॥ अध्याय १७ वा समाप्त ॥