Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय १८

Updated: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (13:52 IST)
 
गोपीचंदाची अशी भाषणे ऐकून तिलकचंद रागावला व म्हणाला गुरूच्या प्रतापाची एवढी प्रौढी वर्णन करीत आहेस; तर आम्हास चमत्कार दाखीव. आम्ही चार दिवस प्रेत जतन करून ठेवितो. मग प्रेत खात्रीने उठविण्याचे त्याने कबूल केल्यानंतर गुरूस दाखविण्यासाठी प्रेताचा डावा हात तिच्या सासर्‍याच्या हुकुमावरून नवर्‍याने काढून दिला. तो घेऊन गोपीचंद गुरूस आणण्यासाठी गौडबंगाल्यात जावयास निघाला. तो बराच लांब गेल्यावर इकडे यांनी प्रेत दहन केले.
 
गोपीचंद सुमारे पाच कोस गेला असेल इतक्यात हा सर्व प्रकार जालंदरच्या लक्षात आला व गोपीचंद आल्यास घोटाळा होईल म्हणून तो स्वतः तिकडे जावयास निघाला. त्या वेळी त्याने प्राणास्त्राची विभूति कपाळास लाविली. पृथ्वीवर नैषधराजपुत्रावाचून ह्या अस्त्राची कोणास माहिती नव्हती. हे अस्त्र जालंदरास मिळाले होते. ते लावल्याबरोबर एका निमिषात तो शंभर कोस गेला व गोपीचंदास भेटला. तेव्हा गोपीचंदाने जालंदराच्या पाया पडून सर्व मजकूर सांगितला. तो ऐकून चंपावती उठविण्याचे गुरूने आश्वासन दिले आणि त्यासह पौलपट्टणास जाऊन राजवाड्यात सर्व मंडळी शोक करीत होती तेथे प्रवेश केला.
 
ह्या उभयतास पहाताच तिलकचंद पुढे झाला. त्याने जालंदरनाथाच्या पाया पडून त्यास कनकासनावर बसविले व आपण पुढे उभा राहिला. त्याने केलेला आदरसत्कार केवळ कुभावाचा होता. ही त्याची मानभावी करणी जालंदरनाथाच्या लक्षात येऊन गेली मग तो म्हणाला, राजा, चंपावतीचे तेज ह्या घरात लोपून गेले. ह्या घरात ती शोभत नाही. असे बोलून त्याने गोपीचंदापासून तिचा हात मागून घेतला. मग संजीवनीमंत्र म्हणून भस्म हातास लाविले आणि हाक मारिली; त्यासरशी चंपावती उठली व जालंदरनाथाच्या पाया पडली. शुक्राचार्याने कचास उठविले, तद्वत जालंदरनाथाने चंपावतीस उठविले. ते पाहून सर्व मंडळी प्रेमपूर्वक नाथांच्या पाया पडली. तरीसुद्धा ते प्रेम स्मशानातल्या क्षणिक वैराग्याप्रमाणे होते.
 
मग जालंधरनाथ उठून जावयास निघाले. तेव्हा तिलकचंद राजाने पाया पडुन प्रार्थना केली की, महाराज, मी पतित आहे. राज्यवैभवाने उन्मत्त होऊन गोपीचंदाचा छळ केला, तरी आता माझ्या अन्यायाची आपण मला क्षमा करावी. या बालकाचे अन्याय उदरामध्ये साठवावे ! असे बोलून त्याने पायांवर मस्तक ठेविले आणि ती रात्र राहण्याकरिता तो प्रार्थना करू लागला. मग जालंदराने तेथे एक रात्र राहण्याचा बेत केला. तेव्हा जालंदराने चंपावतीकडून स्वयंपाक करविला. तिला तिच्या भ्रतारासह आपल्या पंक्तिस जेवावयास बसविले व तिला अनुग्रह देऊन नाथपंथी केले व आपला उच्छिष्ट ग्रास देउन तिला अमर केले.
 
मग भोजन होऊन विडा खाल्ल्यानंतर जालंदरनाथाने राजास सांगितले की, गोपीचंद राज्य सोडून तपश्चर्यैस जात आहे. ह्याचा मुलगा मुक्तचंद अज्ञान आहे म्हणून त्याच्या राज्यावर तुमची देखरेख असू द्या. तुमचा प्रताप जगास ठाऊक आहे. म्हणून कोणी शत्रु उठणार नाही. मीहि येथे सहा महिने राहून बंदोबस्त करून देईन. परंतु त्यापुढे माझे राहणे व्हावयाचे नाही. म्हणून तू त्यास लागेल ती मदत देऊन त्याचे संरक्षण कर. ती आज्ञा राजाने मनापासून मान्य केली.
 
मग ती रात्र तेथे राहून दुसरे दिवशी दोघेहि मार्गस्थ झाले. गोपीचंद जालंदरच्या पाया पडून तीर्थयात्रेत व जालंदरनाथ हेळापट्टणास गेला. त्या वेळी राजा उभयतांस पोचवावयास गेला होता. गोपीचंद राजा बदरिकाश्रमास जाऊन तपश्चर्या करू लागला. जालंदरनाथ हेळापट्टणास सहा महिने राहून, मुक्तचंदास अनुग्रह देऊन कानिफासहवर्तमान फिरत फिरत बारा वर्षांनी बदरिकाश्रमास जाऊन गोपीचंदास भेटला. त्याच्या तपाचे उद्यापन करावयासाठी सर्व देवांना आणिले होते; तेथे त्याने त्यास सर्व विद्या शिकविल्या व पुनः दैवते आणून वर देवविले.

सर्व पहा

शुक्रवारी करा वैभवलक्ष्मीचे हे सोपे उपाय, घरात नांदेल सुख-समृद्धी

Mahalaxmi Pujan on Friday महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी करा हे 4 उपाय

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

Sai Baba Puja Mantra गुरुवारी करा साईबाबांची पूजा, उपवासाचे नियम मंत्र जाणून घ्या

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments