शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मॉस्को , रविवार, 3 सप्टेंबर 2017 (18:14 IST)

ब्लू व्हेल गेमची मास्टर माईंड गजाआड

मोबाईल गेमच्या नावे खेळणाऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या ब्लू व्हेल गेमच्या मास्टरमाईंडला अखेर गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेली आरोपी 17 वर्षाची मुलगी आहे.
 
रशियन पोलिसांनी तिला बुधवारी बेड्या ठोकल्या. ब्लू व्हेल गेम चॅलेंजमागे तिचाच हात असल्याचा पोलिसांनी दावा केला आहे. ही मुलगी ब्लू व्हेल गेम खेळणाऱ्यांना टास्क द्यायची. त्यानंतर टास्कच्या नावे आत्महत्येस प्रवृत्त करायची. जर टास्क पूर्ण केला नाही, तर गेम खेळणाऱ्याला त्याच्या परिवाराची हत्या करण्याची धमकी देत असे, असा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.
 
पोलिसांनी आरोपी तरुणीला तिच्या घरातून अटक केली. आरोपी मुलगी मनोविज्ञानाची विद्यार्थिनी आहे. तिने आपला गुन्हा कबूल केल्याचाही दावाही पोलिसांनी केला आहे. आरोपी मुलीला न्यायालयात हजर केले असता, तिला तीन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
 
ऑनलाईन खेळल्या जाणाऱ्या या गेममध्ये एक “मास्टर’ मिळतो. मास्टर प्लेअरला कठीण टास्क देतो. स्वत:च्या रक्ताने ब्ल्यू व्हेल तयार करणे, शरीरावर जखमा करणे, दिवसभर हॉरर फिल्म पाहणे, रात्रभर जागणे अशा प्रकारचे टास्क मिळाल्यामुळे खेळणारे नैराश्‍याच्या गर्तेत जातात. अशा प्रकारे मास्टर प्लेअरवर 50 दिवस कंट्रोल ठेवतो. खेळाचा शेवटचा टप्पा म्हणजे प्लेअरला आत्महत्या करण्याचे आव्हान दिले जाते आणि स्वतःची हिंमत सिद्ध करण्यासाठी अनेक प्लेअर आत्महत्या करतात.