शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 1 जून 2021 (13:26 IST)

कोरोना व्हायरस व्हेरियंट: WHO नं कोव्हिडच्या 10 व्हेरियंटचं केलं नामकरण, भारतातील व्हेरियंटला काय नावं?

जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) कोव्हिडच्या विविध प्रकारांना (व्हेरियंट) नावं दिली आहेत. ही नावं ग्रीक भाषेतील आहेत.
 
भारत, युके आणि दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेल्या कोव्हिडच्या विविध व्हेरियंटना ही नावं देण्यात आली आहेत आणि याच नावांनी यापुढे जागतिक आरोग्य संघटना संबंधित व्हेरियंटला संबोधले आहे.
 
भारतातील व्हेरियंटला 'डेल्टा' आणि 'कॅपा' , युकेतील व्हेरियंटला 'अल्फा', तर दक्षिण आफ्रिकेतील व्हेरियंटला 'बीटा' असं संबोधलं जाईल.
जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय की, व्हेरियंटबद्दल चर्चा अधिक सहज व्हावी म्हणून ही नावं दिली आहेत. तसंच, नावाभोवती एक प्रकारचा डाग होता, तोही दूर करण्यासाटी ही नवीन नावं दिली आहेत.
 
नुकतेच भारत सरकारनं भारतात आढळणाऱ्या व्हेरियंटला 'भारतीय व्हेरिएंट' म्हणण्यावरून टीका केली होती. B.1.617.2 हा व्हेरियंट सर्वप्रथम भारतात ऑक्टोबर 2020 मध्ये आढळला. याला सर्वसामान्य लोकांच्या चर्चेत 'भारतीय व्हेरियंट' म्हटलं गेलं. पण जागतिक आरोग्य संघटनेनं असं अधिकृत कधीही म्हटलं नव्हतं.
 
"एखादा व्हेरियंट सापडल्यास त्या देशाच्या नावाशी जोडू नये आणि तशी ओळख व्हायला नको," असं जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक विभागाच्या प्रमुख मारिया व्हान केरखोव्ह यांनी ट्विटद्वारे सांगितलं.
मारिया यांनी कुठल्या व्हेरियंटला जागतिक आरोग्य संघटनेनं काय नावं दिलंय, याची यादीही ट्वीट केलीय.
 
कुठल्या व्हेरियंटला काय नावं दिलंय?
 
अल्फा - B.1.1.7 (युकेमध्ये सप्टेंबर 2020 मध्ये आढळला)
बीटा - B.1.351 (दक्षिण आफ्रिकेत मे 2020 मध्ये आढळला)
गामा - P.1 (ब्राझिलमध्ये नोव्हेंबर 2020 मध्ये आढळला)
डेल्टा - B.1.617.2 (भारतात ऑक्टोबर 2020 मध्ये आढळला)
एप्सिलॉन - B.1.427/B.1.429 (अमेरिकेत मार्च 2020 मध्ये आढळला)
झेटा - P.2 (ब्राझिलमध्ये एप्रिल 2020 मध्ये आढळला)
एटा - B.1.525 (अनेक देशात डिसेंबर 2020 मध्ये आढळला)
थीटा - P.3 (फिलिपाईन्समध्ये जानेवारी 2021 मध्ये आढळला)
आयोटा - B.1.526 (अमेरिकेत नोव्हेंबर 2020 मध्ये आढळला)
कॅपा - B.1.617.1 (भारतात ऑक्टोबर 2020 मध्ये आढलला)
सध्या ग्रीक नावं देण्यात आलीत. पण कोव्हिडची 24 पेक्षा जास्त व्हेरियंट अधिकृतरीत्या आढळली, तर नवीन नावांची घोषणा केली जाईल, असेही मारिया यांनी सांगितलं.