रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 14 नोव्हेंबर 2018 (15:35 IST)

आयटीला अच्छे दिन, नोकरभरती तब्बल २१ टक्क्यांनी वाढली

आयटी सेक्टरने ऑक्टोबरपासून भारतातील नोकरभरती आधीच्या तुलनेत तब्बल २१ टक्क्यांनी वाढवली आहे. आयटी नोकऱ्या संदर्भातील जॉबस्पीकचा निर्देशांक २ हजार ८८ अंकावर पोहचला. मागील वर्षाच्या तुलनेत हा आकडा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. मागील वर्षी याच काळात हा आकडा १ हजार ७२८ अंकावर होता. नोकरी डॉट कॉमने केलेल्या सर्वेक्षणानुसार ऑक्टोबर महिन्यात आयटी क्षेत्रात सर्वाधिक नोकरभरती झाली आहे.
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसा नियमांमध्ये बदल केले होते. व्हिसावर लादलेल्या बंधनामुळे आयटी क्षेत्रात पिछेहाट झाली होती. परंतू, मागील दोन महिन्यांमध्ये आयटी सेक्टरने पुन्हा झेप घेतली आहे. याचा फायदा नोकर भरतीला झाला आहे. आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांना घसघशीत पगारवाढही मिळाली आहे. येणाऱ्या काही काळामध्ये आयटीची भरभराट टिकून राहाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 
नोकरी डॉट काॅमवर प्रत्येक महिन्याला नोंद होणाऱ्या रोजगार नोंदणीच्या आधारावर एक निर्देशांक तयार केला जातो. यासाठी जुलै महिन्यापासूनची आकडेवारी गृहित धरल्या जाते. यामहिन्यात प्राप्त झालेल्या आकडेवारीमध्ये १ हजार अंकाची वाढ दिसून आली आहे. वर्षातील एकूण आकडेवारीची सरासरी काढून हा निर्देशांक ठरवण्यात येतो. रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धीमत्ता, ब्लॉकचेन इत्यादी क्षेत्रात कार्यरत स्टार्टअप कंपन्यांनीही चांगले प्रदर्शन केले आहे.