शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By

भगवंताची लीला

श्रीमद् भागवतात हजारो कथा आहेत. आणि त्या एकाहून एक अशा उत्तम व बोधपर कथा आहेत. अजूनही लोक मोठय़ा भक्तिभावाने श्रीमद् भागवताचे वाचन करतात.
 
भगवंताच्या अनेक लीलांचे त्यात वर्णन आहे. अशीच कथा ‘उखळबंध’ लीलेची आहे. या लीलेची गोष्ट संताच्या शापाची व त्या शापातून लाभणार्‍या कृपेची आहे. कुबेराला दोन पुत्र होते. त्यातला एक नलकुबेर आणि दुसरा मणिग्रीव. हे दोन्ही पुत्र उन्मत्त व घमेंडखोर होते. माणूस उन्मत्त कशामुळे होतो, याची चार प्रमुख कारणे शास्त्राने सांगितली आहेत.

एक म्हणजे यौवन. ही तारुणवस्था अशी असते की ती धुंदी आणते. त्यात तो कुणाची पर्वा करीत नाही. स्वत:चेच खरे याची गुर्मी चढते.
 
दुसरे म्हणजे संपत्ती. संपत्ती ज्याच्याजवळ असेल त्याला त्याची नशा चढते. त्या नशेत तो इतरांना तुच्छ लेखतो.
 
तिसरे कारण सत्ता. त्यामुळे तो मदांध बनतो. सत्तेच्या जोरावर न्यायान्न्यात बघत नाही. त्याला उन्माद चढतो.
 
चवथी म्हणजे अविचार. अविचारामुळे तर अनर्थ होतो.
 
हे चारी दुर्गुण कुबेरपुत्रांमध्ये होते. कारण ते कुबेराचे पुत्र होते. त्यांना धनाला काही कमी नव्हते. तरुण होते. सत्ता होती. कारण त्यांचे अनेक पार्षद होते. त्यांचे ते स्वामीच होते. ते व्यसनी व अविचारी होते.
 
एकदा ते दोघे आपल्या स्त्रिांसह, दासींसह जलक्रीडा करीत होते. अशावेळी नेमके महर्षी नारद तेथे आले. पण त्यांना पाहून देखील कुबेर पुत्रांनी त्यांचा आदर केला नाही. वास्तविक नारद महर्षी संत होते. पण कुबेरपुत्र निर्लज्जपणे नग्नावस्थेत ताठ उभे राहिले. त्यांना वंदन केले नाही. म्हणून नारदांनी त्यांना शाप दिला. ‘मला पाहूनही तुम्ही जडासारखे उभे राहिलात म्हणून तुम्ही जडोनीत जन्म घ्याला. जेव्हा भगवंत अवतार घेतील तेव्हा तेच तुमचा उद्धार करतील.’
 
खरे तर हा शाप नसून वरदानच आहे. कारण ते थोर संत होते. संत कुणाचे नुकसान करीत नाहीत. ज्या व्रजभूमीत अनेकांनी सेवा करण्यासाठी, जन्म घेण्यासाठी व भगवंताच्या लीला पाहाण्यासाठी पराकाष्ठा केली, पण ही संधी कुणालाच मिळाली नाही. ती या उन्मत्त  कुबेरपुत्रांना मिळाली जेव्हा यशोदेने कृष्णाला उखळाला बांधले तेव्हा ते उखळ ओढून नेऊन दोन वृक्षामध्ये अडकले व जोर लावल्यावर ते वृक्ष उन्मळून पडले. आणि नलकुबेर व मणिग्रीव मुक्त झाले आणि नारदांच्या शापांतून त्यांना लाभच झाला. ते भक्तीमार्गाला लागले. असा संताच्या, ऋषींच्या शापातून दुष्टांचा, त्यांच्या खलप्रवृत्तीचा नाश होऊन ते सन्मार्गाला लागले. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या काळात अनेक जीवांचा उध्दार केला.
 
-रजनी थिंगळे