सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

गोपाळकाला : जन्माष्टमी विशेष

एक दिवस कृष्णाने सकाळीच घाइघाईत सगळ्या त्याच्या सवंगड्यांना आवाज दिला अन् सर्वांना आपापल्या घरात जे काही शिळेपाळके आहे त्याच्या शिदोर्‍या घेऊन रानाकडे कूच करण्यास सांगितले. दुपारी गाईंना चरावयास सोडल्यावर सगळ्यांनी आपापल्या शिदोर्‍या सोडल्या. श्रीकृष्णाने त्या सगळ्या शिदोर्‍या एकत्र करून त्याचा काला केला. नंतर तो काला सर्वजण एकमेकांना प्रेमाने भरवू लागले. असा कृष्णाच्या हातचा अमुल्य प्रसाद आपल्यालाही मिळावा म्हणून देवादिक माशांच्या रूपाने येऊन यमुनेत उतरले. पण कृष्णाच्या सवंगड्यांची कृष्णावर जशी भक्ती होती, श्रध्दा होती. त्यामुळे त्यांना कृष्णाने दिलेला काला देवांना कसा मिळेल? 

कृष्णासह त्याच्या सवंगड्यांनी काला खाल्ल्यावर कृष्णाने त्यांना हातही धुवू दिले नाहीत. त्या काल्याचा सुवास सगळयांनी त्यांच्या घरच्यांना दिला. त्यावर तुम्ही खूप भाग्यवान आहात. साक्षात भगवंताच्या हातचा प्रसाद तुम्हाला मिळाला. आम्ही मात्र त्याला मुकलो, असे म्हणून गोकूळवासी हळहळले.

त्या काल्याचा घास कृष्णाने मुखात घालता क्षणी सर्वांना अवीट रसाची गोडी चाखायला मिळाली. त्या काल्याच्या आठवणीसाठी आजही गोकुळाष्टमीनंतर गोपाळकाला केला जातो.

त्यात दही, दूध, लोणचे, लाह्या, कुरमुरे, पोहे पापड इतकेच नव्हे तर त्यात भाकरीही कुसकरून घालतात. खरंच तो काला खाल्ल्यावर एक वेगळीच अविस्मरणीय चव जिभेवर रेंगाळते. इतर दिवशी असे पदार्थ एकत्र केले तर त्यात कदाचित तो रस राहणार नाही. तो कृष्ण भक्तीचा रस, कृष्णाच्या व त्याच्या सवंगड्यांच्या मैत्रीचा रस त्या काल्याला अमृताची गोडी मिळवून देतो.