आता ‘Delhi to London’ बस, जाणून घ्या तिकिटाचे पैसे आणि वेळ
रस्त्यावरुन जग फिरण्याची हौस असणार्यांसाठी कामाची बातमी म्हणजे आता विमान प्रवास व्यतिरिक्त लंडन पोचहण्यासाठी एक आणखी पर्याय समोर आला आहे. गुरुग्राममधील एका ट्रॅव्हल एजन्सीने दिल्ली ते लंडन बससेवेची घोषणा केली आहे. ही ट्रिप 70 दिवसांची असेल. खासगी प्रवास कंपनीने 15 ऑगस्टला बस सेवा लॉन्च केली आहे. 'बस टू लंडन' असं या सेवेचं नाव आहे.
70 दिवसांमध्ये 18 देशांमधून प्रवास करत ही बस लंडनमध्ये पोहोचेल. भारतातून सुरू होणारा हा प्रवास म्यानमार, थायलंड, लाओस, चीन, किर्गिजस्तान, उजबेकिस्तान, कजकिस्तान, रशिया, लातविया, लिथुआनिया, पोलंड, चेक रिपब्लिक, जर्मनी नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स अशा 18 देशांमार्गे हा प्रवास असेल.
20,000 किलोमीटरच्या या बस प्रवासासाठी बुकिंगला सुरूवात झाली आहे. केवळ 20 प्रवासीच या बसमधून प्रवास करु शकणार आहेत. सगळ्या सीट बिजनेस क्लासच्या असतील. या व्यतिरिक्त प्रवासामध्ये विविध सुविधा देण्यात येणार आहेत. बसमध्ये 20 प्रवाशांशिवाय एक ड्रायव्हर, एक असिस्टंट ड्रायव्हर, ट्रिप आयोजित करणाऱ्या कंपनीचा एक केअरटेकर आणि एक गाईड असतील.
यात प्रवसासाठी एका व्यक्तीला 10 देशांचा व्हिसा लागणार आहे. कंपनीच व्हिसाची संपूर्ण सोय करणार असून प्रवास 4 भागांमध्ये विभागण्यात आला आहे. लंडनपर्यंत प्रवास करता येत नसणारे ठराविक देशही फिरू शकतात. यासाठी प्रवाशांना वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळे पैसे द्यावे लागतील.