गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 2 एप्रिल 2024 (09:47 IST)

महाराष्ट्रातील आणखी एक कुटुंब फुटणार?

vinayak mete
बीड : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी झालेल्या बंडखोरीनंतर पवार कुटुंबात शरद पवार विरुद्ध अजित पवार असा वाद पाहायला मिळत आहे. अशात आता राज्यातील आणखी एका राजकीय कुटुंबात फुट पडण्याची शक्यता आहे.
 
कारण, एकीकडे शिवसंग्राम पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष ज्योती मेटे यांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत बोलणी सुरू असताना, दुसरीकडे विनायक मेटे यांच्या लहान भावाची संघटना महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे.
 
विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांचे लहान भाऊ रामहरी मेटे यांच्याकडून जय शिवसंग्राम नावाची संघटना स्थापन करण्यात आली होती. आता एकजण महाविकास आघाडीसोबत आणि दुसरं महायुतीसोबत जाण्याची शक्यता आहे.
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुढील दोन-तीन दिवसात जय शिवसंग्राम ही संघटना महायुतीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहभागा संदर्भातला निर्णय 48 तासात होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास बीड जिल्ह्यात मेटे विरुद्ध मेटे असाही वाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, दुसरीकडे शरद पवार गटाकडून ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास विनायक मेटे यांचा मराठा समाजासाठी केलेला लढा पाहता ज्योती मेटे यांना मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फायदा होऊ शकते. तसेच, विनायक मेटे यांच्या निधनानंतर ज्योती मेटे यांना सहानुभूती देखील मिळण्याची शक्यता आहे.
 
त्यामुळे मेटे कुटुंबातील सदस्य आपल्या बाजूने करून महायुतीने  'मास्टर स्ट्रोक' मारण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे रामहरी मेटे नेमका काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor