1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 4 एप्रिल 2024 (09:10 IST)

श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरेंची वैशाली दरेकर?

मुंबई : शिवसेनेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून आता ४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून कल्याणमधून वैशाली दरेकर यांना संधी देण्यात आली आहे.
 
खासदार श्रीकांत शिंदेंचा हा मतदारसंघ असल्याने या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळेल, याची सर्वांनाच उत्सुकता होती. तर, शिवसेना आणि महायुतीतील नेत्यांनाही या उमेदवारीवरुन आपला उमेदवार द्यायचा होता.
 
अखेर, शिवसेना फुटीनंतर ठाकरेंसोबत राहिलेल्या वैशाली दरेकर यांना उद्धव ठाकरेंनी लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. वैशाली दरेकर हे नाव जरी महाराष्ट्राला किंवा कल्याण-डोंबिवलीबाहेर नवीन वाटत असले तरी त्यांनी यापूर्वी २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली आहे. शिवसेनेतून मनसेत गेलेल्या वैशाली दरेकर यांनी २००९ मध्ये मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.
 
त्यावेळी १ लाख २ हजार ६३ मतं पडली होती. मात्र, त्यानंतर केडीएमसी महापलिका निवडणुकीत दरेकर यांना प्रभाग आरक्षण आणि पुनरर्चनेमुळे उमेदवारी मिळाली नव्हती. त्यावेळी, त्यांना पूनर्वसनाचं आश्वासन राज ठाकरेंनी दिलं होतं. पण, ते आश्वासन पूर्ण न केल्याने वैशाली दरेकर यांनी २०१६ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी ठाकरेंसोबत राहून निष्ठा जपली. त्यामुळेच, आज शिवसेना उबाठा पक्षाकडून त्यांना थेट लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
 
कल्याण लोकसभा मतदारसंघातून गेल्या दोन निवडणुकांत मुख्यमंत्रीपुत्र एकनाथ शिंदे यांनी विजय मिळवत दिल्ली गाठली. त्यामुळे, यंदाही त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे, श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर असा सामना कल्याण लोकसभा मतदारसंघात होऊ शकतो.
 
उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेतून जळगाव, हातकणंगले, कल्याण आणि पालघर या ४ मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामध्ये, वैशाली दरेकर यांना कल्याणमधून मैदानात उतरवले आहे. दरम्यान दुसऱ्या यादीतील ४ उमेदवारांपैकी २ उमेदवार ह्या महिला असून कल्याणच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
Edited by Ratnadeep Ranshoor