शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Updated : सोमवार, 1 ऑगस्ट 2022 (08:38 IST)

भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर Bhimashankar Temple

bhima shankar
भीमाशंकर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते. परंतु, ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते.
 
भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. हेमाडपंती पद्धतीचे हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. 
 
मंदिरात सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या सुंदर व रेखीव मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत तसंच पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. 
 
सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जिर्णोध्दार केला होता. 
 
इतर प्रेक्षणीय स्थळे-
 
गुप्त भीमाशंकर -भीमानदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.
 
कोकण कडा-भीमाशंकर मंदिराजवळच पश्चिमेला हा कडा असून त्याची उंची साधारणपणे ११०० मीटर इतकी आहे. येथून अतिशय विहंगम असे दृश्य दिसते. अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा अरबीसमुद्रही दिसू शकतो.
 
सीतारामबाबा आश्रम- कोकणकड्यापासून एक रस्ता या आश्रमाकडे जातो. घनदाट जंगलात हे ठिकाण आहे. गाडीने या ठिकाणी पोहोचता येते
 
नागफणी - आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे. हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून १२३० मीटर इतकी आहे. कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. कोकणातून हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे.
 
कसे पोहचाल-
रेल्वे: भीमाशंकर निकटम रेलवे स्टेशन पुणे आहे. पुणे पासून भीमाशंकर 125 किलोमीटर दुरी स्थित आहे.
 
बस: पुण्याहून भीमाशंकरसाठी दर अर्ध्या तासांनंतर नियमितपणे बस सेवा मिळते तसेच प्रायव्हेट टॅक्सी, कार देखील उपलब्ध असतात.