हिंसा कोणत्याही प्रकारची असो. ती दु:ख पोहचवते व मोठ्या प्रमाणात मनस्तापाला खतपाणीही घालत असते. आज प्रमाणे सर्वत्र हिंसा पसरली आहे. ती खूपच धोकादायक आहे. सामजिक हिंसेचे बीज समाजात जागोजागी जाणून बुजून पेरले जात आहे. सामाजिक हिंसेच्या जखमा समाज मनावर अनंत काळ घर करून राहतात. अशा परिस्थितीत समाजाच्या विकासासाठी जवळ-जवळ सर्वच प्रश्न मागे पडतात व दहशतवादाच्या जात्यात सामान्य जनता भरडली जाते. समाजिकतेच्या आगीवर राजकारणी पोळी भाजून घेत आहेत. त्यांचा हा खेळ पाहून दु:ख होते व महात्मा गांधींचे स्मरण होते.
समाजात हिंसा पसरवण्याचे दोन प्रमुख कारणे आहेत. त्यातील पहिले व मुख्य म्हणजे श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी अधिक वृंदावत आहे. त्यामुळे सामजिक ऐक्य धोक्यात आले आहे. एका बाजुला भारत सुपर पॉवर होण्याचा तसेच विकासात आघाडी घेतल्याचा दावा करत आहे. तर दुसर्या बाजूला देशातील मोठा हिस्सा साधनसामग्रीच्या अभावामुळे जीव वाचवण्याची धडपड करत आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील गरीब जनतेकडे पाहण्यासाठी कुणाकडेही वेळ नाही. विकासाच्या योजना आखणार्यांकडून ग्रामीण भागातील गरिबांना डावलले जात आहे.
हिंसा वाढण्याचे दुसरे मुख्य कारण म्हणजे भ्रष्टाचार. तो तर समाजाच्या रक्तातच ठाण मांडून बसला आहे. शासनाच्या तुटपुंज्या कल्याणकारी योजना ग्रामीण भारतापर्यंत पोहचण्याआधीच भ्रष्टाचार त्यांना गिळंकृत करतो. भ्रष्टाचाराशी दोन हात करण्यासाठी समाजातील दोन-चार मिळून स्थापन केल्या सेवाभावी संस्था पुढे आल्या आहेत. मात्र राजकारण्यांकडून त्यांचीही गळचेपी होताना दिसते. त्यामुळे तेही हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत उणीव भासते ती गांधीवादी विचारसरणीची.
गांधीवादी कल्पनेच्या उलट सत्तेचे केंद्रीकरण होत चालले आहे. महात्मा गांधीजींच्या मते या सत्तेचे मोठ्या प्रमाणावर विकेंद्रीकरण झाले पाहिजे. या सत्तेचे सामान्य नागरिकालाही स्थान मिळाले पाहिजे. आज संपूर्ण योजनांची सुत्रे ही मुंबई व दिल्ली येथून फिरवली जातात. अलिशान व एअरकंडीशन ऑफिसात बसून अधिकारी ग्रामीण भारताचे मुल्यमापन करतात. आराम खुर्चीवर बसुन त्यांना कागदावरचा चकाकणारा भारत व विकास कामेच दिसणार ना! समाजात हिंसाला व जनतेत शासनाप्रती असंतोष पसरवण्याला या दोन बाबी कारणीभूत आहेत. खेदाची गोष्ट म्हणजे जनतेतील असंतोषाची जागा आता हिंसेने घेतली
आहे.
-प्रकाश आमटे