रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : बुधवार, 8 मार्च 2023 (09:51 IST)

होळी, धुळवड खेळल्यावर रंग कसे साफ करायचे?

होळीपाठोपाठ येणारी धुळवड आणि रंगपंचमी म्हणजे रंगांचा उत्सव.अनेकजण उत्साहानं रंग खेळतात पण नंतर हे रंग धुताना नाकी नऊ येतात. मग करायचं तरी काय हा प्रश्न पडत असेल. होळी खेळताना आणि खेळल्यावर त्रास होऊ नये यासाठी काय करायचं? अंगावर लागलेले रंग कसे साफ करायचे? हे आपण या लेखात पाहू.
होळी, धुळवड आणि रंगपंचमीला रंग खेळताना जरा सावधच राहा असा इशारा डॉक्टर्स देतात. पण म्हणजे नेमकी काय काळजी घ्यायची, याविषयी आम्ही त्वचारोगतज्ज्ञांना विचारलं.
 
रंग खेळण्याआधीच काही तयारी करायला हवी, असं त्वचारोगतज्ज्ञ दीपाली भारद्वाज यांनी बीबीसीसोबत बोलताना सांगितलं आहे. त्यांनी काही टिप्सच दिल्या आहेत.
 
रंग खेळण्याआधी काय काळजी घ्यायची?
रंग खेळण्याआधी डोक्यापासून पायापर्यंत शरीराला तेल लावा. केसांना मुळापासून तेल लावणं महत्त्वाचं आहे.
 
तुमच्या त्वचेवर काही आजार किंवा कुठली जखम असेल, तर त्यावर टेप लावूनच रंग खेळायला जा म्हणजे जखमेतून रंग आत जाणार नाहीत. ऑरगॅनिक रंग असतील तरीही ही काळजी घ्यायला हवीच.
 
चेहऱ्यावर तेल लावण्याआधी सनस्क्रीनही लावा, त्यामुळे उन्हापासून संरक्षण मिळतं.
तुमच्या चेहऱ्यावर काही मुरुम, पुटकुळ्या असतील किंवा एक्झेमा, सोरायसिस यांसारखे त्वचारोग असतील, तर त्यासाठी डॉक्टरांनी तुम्हाला जे मलम दिलंय, ते लावून मगच त्याच्यावर तेल लावा.
 
महिला किंवा पुरुषही एखादं नेलपॉलिशही लावू शकतात, जेणेकरून रंग नखांच्या मुळापाशी अडकणार नाहीत.
 
तुम्हाला चष्मा असेल किंवा सनग्लासेस घालणार असाल तर उत्तम, कारण त्यामुळे तुमचे डोळे बऱ्यापैकी सुरक्षित राहतील.
 
नंबरचा चष्मा असलेल्यांनी शक्यतो मजबूत फ्रेमवाला चष्मा वापरा, म्हणजे तो तुटणार नाही आणि तुमचे पाहण्याचे वांधे होणार नाहीत.
 
रंग खेळताना शक्यतो सुती, साधे आरामदायी कपडे घाला. कृत्रिम नायलॉनसारखे कपडे ओले झाल्यावर त्वचेवर घासले जातात आणि त्रास होतो.
 
रंग खेळायला जाण्याआधी, खेळताना आणि खेळून झाल्यावरही पाणी पीत राहणं गरजेचं असतं. त्यामुळे त्वचेतला ओलावा कायम राहण्यास मदत होते.
 
रंग खेळून झाल्यावर काय कराल?
रंग खेळण्याच्या आदल्या दिवशी केस धुण्याची गरज नाही, मात्र रंग खेळून आल्यावर आधी वाहत्या पाण्याखाली डोकं नीट धुवून घ्या आणि मगच शॅम्पू लावा.
 
कोरडे रंग खेळणार असाल तर ते काढताना आंघोळ करण्याआधी आधी केस झटकून घ्या. अंगावरचा कोरडा रंग एखादं कोरडं फडकं वापरून टिपून घ्या.
 
चेहऱ्यावरचे, हातापायावरचे रंग काढण्याआधी आधी पुन्हा थोडं तेल लावू शकता.
 
जर रंग पक्का बसला असेल, निघत नसेल आणि तुम्हाला लगेचच कुठे ऑफिसात जायचं असेल किंवा शाळेत शिक्षक ओरडतील अशी भीती वाटत असेल तर रंग साफ करण्यासाठी त्या जागी दहा-पंधरा मिनिटांपेक्षा जास्त वेळ घासत, रगडत राहू नका.
 
एवढा वेळ रगडूनही रंग निघाला नाही, तर रंग सुटण्यासाठी त्यावर थोडं दही किंवा कोरफड जेल लावा.
रंग खेळताना पाण्यात भरपूर भिजलात, तर त्वचा कोरडी पडते आणि त्यामुळे इतर काही त्रास होऊ शकतो. तो टाळण्यासाठी आंघोळ केल्यावर थोडं तेल लावू शकता.
 
रंग काढण्यासाठी रॉकेल, कुठलं इतर केमिकल, किंवा कपडे धुण्याचा साबण वापरू नका, त्यानं त्वचेचं नुकसान होतं.
 
रंगांची अ‍ॅलर्जी झाली तर?
तुम्ही अगदी नैसर्गिक रंगच वापरत असाल, पण एखादा कुणी कुठले रासायनिक रंग घेऊन आला असेल, किंवा चुकून असा रंग कुणी तुमच्यावर टाकला तर त्रास होऊ शकतो.
 
नैसर्गिक रंगातल्या एखाद्या घटकाची कुणाला अ‍ॅलर्जी असू शकते.
 
असा कुठला रंग लागल्यावर त्या जागी खाज सुटली किंवा काही अ‍ॅलर्जी रिअ‍ॅक्शन आली, तर लगेच तो भाग वाहत्या पाण्याखाली धरा. तिथे तुम्ही दही, कोरफडीचा रस किंवा जेल किंवा अगदी साधा बर्फ लावू शकता.
 
त्रास थांबला नाही, तर लगेच डॉक्टरांना संपर्क करा.
 
चेहऱ्यावरचा रंग काढण्यासाठी ब्लीच किंवा फेशियल किंवा कुठली ब्युटी ट्रीटमेंट घेताना आधी नीट विचार करा. रंग जर पक्का बसला असेल तर एखादं क्रीम वगैरे लावल्यानं रिअ‍ॅक्शन उठू शकते. त्यामुळेच रंग खेळल्यावर चेहऱ्याला पुढचे चार-पाच दिवस कुठले कॉस्मेटिक्स लावणं टाळा.
 
डोळ्यांचे डॉक्टर्स सांगतात की होळी खेळताना डोळ्यात रंग गेलाच, तर आधी पाण्यानं ते स्वच्छ करावेत, डोळ्यांची आग होत असेल तर छोट्या भांड्यात पाणी घेऊन त्यात डोळ्यांची उघडझाप करावी.
 
डॉक्टरांनी सांगितलेले आयड्रॉप्स डोळ्यात घाला आणि जास्तच त्रास झाला तर लगेच वैद्यकीय मदत घ्या.
 
Published By- Priya Dixit