रविवार, 21 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 9 डिसेंबर 2023 (13:34 IST)

बोरांच्या उत्पादनात ३५ टक्क्यांनी घट, रिपोर्ट

bor
नारंगी, पिवळसर, लालसर रंगाची आणि विविध आकारांची चवीला आंबट-गोड बोरांचा हंगाम सुरु झाला आहे. यंदा पाऊस कमी प्रमाणात झाल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा हंगाम साधारणच राहील, असा अंदाज व्यापा-यांनी व्यक्त्त केला आहे. तर यंदा बोरांच्या उत्पादानात सुमारे ३५ टक्क्यांनी घट झाल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे.
 
दिवाळीनंतर बाजारात बोरांची आवक सुरु होते. ती हळूहळू वाढत जाते, डिसेंबर, जानेवारी महिन्यात बोरांचा हंगाम बहरात असतो. फेब्रुवारी महिन्यात हा हंगाम संपत असतो. सध्या राज्यातील विविध  मार्केट यार्डात सरासरी अंदाजित प्रति दिवस २०० ते ३०० गोण्या इतकी आवक होत आहे. सध्या घाऊक बाजारात बोरांना मागणी वाढली असून, येणा-या काही दिवसात आणखी मागणी वाढेल. सध्या लातूर बाजारपेठेत सोलापूर जिल्ह्यातील आष्टी, मोहोळ, खंडाळी आदी गावांतून बोरांची आवक होत आहे. यामध्ये चमेली, कडाका, उमराण या बोरांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे अ‍ॅपल बोरांची आवक जानेवारीपासून सुरू होईल. आकाराने मोठे, रंगाने हिरवे आणि गर जास्त असलेले ही बोरे आता लोकप्रिय होऊ लागले आहे.
 
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे बोरांचा हंगाम एक महिना उशिराने सुरु झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत उत्पादनात तब्बल ३० ते ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बोरांना लातूरच्या बाजारात मागणी वाढली आहे. लातूर मार्केट यार्डात बोरांची गेल्या आठवड्यापासून आवक होण्यास सूरुवात झाली आहे. सध्या सुरुवातीला बोरांची कमी आवक होत आहे. डिसेंबरनंतर आवक वाढण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात बोरांचे उत्पादन कमी झाले आहे. लातूर मार्केट यार्डात आवक होणारी बोरं चांगल्या प्रतीची आहेत. उत्पादनात घट झाल्याने घाऊक बाजारात बोरांचा दरात १० टक्क्यांनी वाढ होईल, असा अंदाज व्यापारी वर्गानी वर्तविला आहे. त्याचप्रमाणे घाउक बाजारात कडाका बोर ५० ते ६० रुपये किलो, अ‍ॅपल बोर ३० ते ४० रुपये किलो, चमेली बोर २० रुपये किलो, उमराण बोर ३० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात असल्याचे किरकोळ व्यापारी माजीद शेख यांनी सागीतले आहे.