गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 जून 2018 (13:49 IST)

उमाताईंनी दु:खाशी हसतमुखाने केलेला सामना प्रेरणादायी! – नितीन गडकरी

“माझी थोरली बहीण आशा यांच्यामुळे गडकरी आणि भेंडे कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. त्यामुळे उमा आणि प्रकाश भेंडे यांचा जिवनप्रवास मी जवळून अनुभवला. उमाताई एक उत्तम अभिनेत्री आणि प्रकाशजी एक उत्तम चित्रकार आहेत. एक आदर्श जोडी आणि कलावंत म्हणून उभा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले परंतु विशेषत: उमाताईंच्या प्रेमळ स्वभावामुळे भेंडे दांपत्याने त्यांचा हसतमुखाने सामना केला. या सर्व कटु-गोड आठवणींचा जीवन प्रवास वाचकांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल.”असा आशावाद केन्द्रीय मंत्री खा. नितीन गडकरी यांनी आपल्या व्हिडीयासंदेशाद्वारे प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केला. पंतप्रधानांकडून तातडीच्या बैठकीचे बोलावणे आल्याने ‘गंध फुलांचा गेला सांगून’ह्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहता आले नसल्याने खा. नितीन गडकरी यांनी व्हीडीयो संदेशाद्वारे उपस्थितांची माफी मागून आपले मनोगत व्यक्त केले. 
 
ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांनी लग्नानंतर सिनेविश्वातून सन्यास घेतला होता. कारण उमा यांच्या आईने प्रकाश भेंडे यांना अनेक अटी घातल्या होत्या. त्यातील ती एक अट होती. पण प्रकाश भेंडे यांच्या आग्रहाखातर त्यांनी काही वर्षांनी स्वत:ची ‘श्रीप्रसाद चित्र’नावाची निर्मिती संस्था स्थापन करून सुपरहीट‘भालू’ह्या चित्रपटाची निर्मिती केली. चित्रपट खूप गाजला. परंतु, त्याच्या निर्मिती प्रक्रियेवेळी अनेक प्रस्थापित सिनेकर्मींकडून प्रचंड मनस्ताप झाला. व्यावसायिक आणि कौटुंबिक आयुष्यात अनेक बरे-वाईट प्रसंग आले, ते तसेच्या तसे पुस्तकात लिहीले गेल्याने बरेचजण सुखावतील तर काहिजण दुखावतील. त्याला माझा नाईलाज आहे, असे प्रतिपादन अभिनेता-दिग्दर्शक आणि ‘गंध फुलांचा गेला सांगून’ह्या पुस्तकाचे लेखक प्रकाश भेंडे यांनी प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने केले. पत्नीविरहाने एकाकी पडल्याची भावना मनामध्ये होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी पुस्तक लिहिण्याची प्रेरणा उमा यांनीच दिल्याचे प्रकाश भेंडे यांनी यावेळी सांगितले. 
 
पन्नासहून अधिक मराठी आणि ‘दोस्ती’,‘मासूम’सारखे अनेक हिंदी तसेच तेलगु आणि छत्तीसगडी भाषेतील रौप्य महोत्सव गाजवल्या चित्रपटांमधून अभिनेत्री उमा भेंडे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. त्यांच्या निधनानंतर आलेल्या पहिल्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या जीवनावर आधारीत ‘गंध फुलांचा गेला सांगून’ह्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. ह्या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी, जयश्री टी., वर्षा उसगांवकर, मृणाल कुलकर्णी, हेमांगी राव अभिनेता रमेश भाटकर, निर्माती-दिग्दर्शक कांचन अधिकारी, संजीव पालांडे, आशुतोष घोरपडे, तसेच संपूर्ण भेंडे कुटुंबिय आणि उमाताईंचे चाहते उपस्थित होते.