ज्येष्ठ अभिनेते अविनाश यांचे निधन
मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं राहत्या घरी हृदयविकाराचा झटक्यामुळे निधन झालं आहे. अविनाश खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करत रसिकांची पसंती मिळाली होती.
अविनाश खर्शीकर यांनी ‘बंदिवान मी या संसारी’ या चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी एकाहून एक सरस अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. यापैकी ‘जसा बाप तशी पोरं’, ‘आई थोर तुझे उपकार’, ‘चालू नवरा भोळी बायको’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘लपवाछपवी’, ‘माफीचा साक्षीदार’ असे अनेक चित्रपट त्यांनी गाजवले.
विशेष म्हणजे केवळ रुपेरी पडदाच नव्हे तर रंगभूमीवरदेखील त्यांच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘वासूची सासू’, ‘अपराध मीच केला’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘लफडा सदन’ ही त्यांची नाटकं तर प्रचंड गाजली. दरम्यान, अविनाश खर्शीकर यांनी काही मालिकांमध्येही काम केलं होतं.