मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 19 फेब्रुवारी 2024 (09:08 IST)

IND vs ENG : यशस्वी जैस्वालचं द्विशतक, भारताचा इंग्लंडवर 434 धावांनी विजय

Yashasvi Jaiswal
मुंबईकर यशस्वी जैस्वालचं शानदार द्विशतक, सरफराझ खानचं सलग दुसरं अर्धशतक आणि रविंद्र जाडेजाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं राजकोट कसोटीत इंग्लंडला 434 रन्सनी धूळ चारली.
 
या विजयासोबतच पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतानं आता 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
 
राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात यशस्वी जैस्वालनं दुसऱ्या डावात आक्रमक द्विशतक झळकावलं आणि भारताला 400 रन्सचा पल्ला ओलांडून दिला.
 
शुबमन गिलनं 91 रन्सची खेळी केली तर मुंबईच्याच सरफराझ खाननं सलग दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकत यशस्वीला चांगली साथ दिली. सरफराझनं 68 रन्स केल्या.
 
भारतानं दुसरा डाव 4 बाद 430 रन्सवर डाव घोषित केला आणि इंग्लंडचे सर्व फलंदाज 122 रन्समध्ये बाद करून चौथ्या दिवशीच विजय साजरा केला.
 
रविंद्र जाडेजानं 5 विकेट्स काढत इंग्लंडला लवकर गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानं घरच्या मैदानात खेळताना या सामन्याच्या पहिल्या डावातही 2 विकेट्स काढल्या होत्या आणि पहिल्या डावात 112 रन्सची खेळी केली होती.
 
जाडेजालाच सामनावीराचा किताब देण्यात आला. पण चौथ्या दिवशीचा खेळ खऱ्या अर्थानं यशस्वी जैस्वालनं गाजवला.
 
जैस्वालचं विक्रमी द्विशतक
मुंबईकर यशस्वी जैस्वालनं सलग दुसऱ्या कसोटीत द्विशतकाची वेस ओलांडली आणि विक्रमही रचले. भारत आणि इंग्लंड संघांमधल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीत राजकोटच्या मैदानात खेळताना यशस्वीनं दुसऱ्या डावात आक्रमक खेळी केली. त्यानं अवघ्या 236 चेंडूंमध्येच 14 चौकार आणि 12 षटकारांसह नाबाद 214 रन्स कुटल्या.
 
याआधी विशाखापट्टणममध्ये मालिकेच्या दुसऱ्या कसोटीतही यशस्वी जैस्वालनं पहिल्या डावात 209 धावांची खेळी केली होती. 290 चेंडूंमधल्या त्या खेळीत 19 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता.
 
या दोन द्विशतकांबरोबरच यशस्वी हा सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये द्विशतक ठोकणारा तिसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी विराट कोहली आणि विनोद कांबळीनं ही करामत साधली होती.
 
तसंच याआधी विराट कोहली आणि विनू मंकड यांनी एकाच कसोटी मालिकेत दोन द्विशतकं ठोकली होती. त्यानंतर यशस्वीनंही तीच कामगिरी बजावली आहे.
 
इतकंच नाही, तर कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध दोन द्विशतकं ठोकणाराही यशस्वी पहिला भारतीय ठरला आहे.
 
याआधी मन्सूर अली खान पतौडी, गुंडाप्पा विश्वनाथ, सुनील गावस्कर, विनोद कांबळी, राहुल द्रविड, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीनं कसोटीत इंग्लंडविरुद्ध द्विशतकं ठोकली होती. यशस्वीला आता या महानतम खेळाडूंच्या यादीत स्थान मिळालं आहे.
 
पाणीपुरी विक्रेता ते क्रिकेटचा स्टार
यशस्वीच्या इथवरच्या प्रवासावर आणि संघर्षावर तर एखादा चित्रपटच काढता येईल.
 
यशस्वी मुळचा उत्तर प्रदेशच्या भदोहीचा. क्रिकेटसाठी वयाच्या दहाव्या वर्षी मुंबईत आला.
 
मुंबईच्या आझाद मैदानावरच्या तंबूत ग्राऊंड्समनसोबत राहून, कधी मुंबईच्या रस्त्यांवर पाणीपुरी विकत यशस्वीनं गुजराण केली आणि एकीकडे क्रिकेटचा सरावही करत राहिला.
 
अशी तीन वर्ष काढल्यावर प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी त्याला आपल्या पंखाखाली घेतलं, त्याची राहण्याची सोय केली आणि खेळावरही लक्ष दिलं.
 
त्याचं फळ म्हणून यशस्वीसाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडले. 2023 सालच्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर यशस्वीला कसोटीत आणि आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी20 मध्ये पदार्पणाची संधी मिळाली.
 
कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 7 सामन्यांच्या 13 डावांत यशस्वीनं तीन शतकं साजरी केली आहेत. दोन द्विशतकांखेरीज त्यानं आपलं पहिलं शतक ठोकताना 171 धावा केल्या होत्या.
 
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत खेळताना यशस्वीनं ही कामगिरी बजावली असून, भारतीय भारतीय क्रिकेटच्या नव्या युगासाठी तो एक मोठा आशेचा किरण बनला आहे.
 
एकाग्रता आणि आक्रमकता यांचा उत्कृष्ट मिलाफ त्याच्या खेळात दिसून येतो.
 
एरवी आयपीएल आणि रणजी अशा देशांतर्गत क्रिकेटमध्ये आक्रमक खेळ करत असला, तरी आपल्यात भारतीय फलंदाजीचा भार पेलण्याची क्षमता असल्याचं त्यानं दाखवून दिलं आहे.
 
यशस्वीचा खेळही अधिक परिपक्व बनत चाललेला दिसतो. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ही गोष्ट हुरूप वाढवणारी आहे.
 
Published  By - Priya Dixit