शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 12 फेब्रुवारी 2024 (14:43 IST)

सचिन धस: ‘बीडमधून इंडियासाठी कुणीच खेळू शकत नाही, असं ते मला म्हणाले आणि…

Sachin Dhas Life Story
’“बीडमधून इंडियासाठी कुणीच खेळी शकत नाही. मुंबईत प्रॅक्टिस केल्याशिवाय इंडिया टीममध्ये सिलेक्शन होणार नाही, असं असं त्यांचं म्हणणं होतं. माझ्या सचिनची अंडर-14, अंडर -19 साठी निवड झाली, तरीही मी त्यांना काही म्हटलं नाही. नेपाळविरोधात त्यानं शतक मारलं तरीही मी काही म्हटलं नाही. पण जेव्हा त्यानं आफ्रिकेविरोधात 96 धावांची खेळी केली, तेव्हा मात्र मी त्यांना ग्राऊंडवर घेऊन गेलो.
 
“त्यांना म्हटलं, हीच ती खेळपट्टी आणि हेच ते मैदान, जिथं सचिननं सराव केला आणि आज तो भारतासाठी खेळतोय. आपल्या भागाचं नाव रोशन करतोय.”
 
सचिन धसचे वडील संजय धस यांचा ऊर अभिमानानं भरुन आला होता. दुपारच्या सुमारास ते मला त्यांच्या जुन्या घराकडे घेऊन चालले होते.
 
त्यावेळेस एक जण वाटेत भेटला आणि संजय यांना हा किस्सा आठवला.
 
संजय यांनी त्यांचं जुनं घर पाडून तिथं पिच तयार केली आहे. जसजसा सचिन मोठा होत होता, तसं तसं त्याला सरावासाठी योग्य गोष्टी मिळाव्यात यासाठी संजय यांनी जुनं घर पाडलं आणि तिथं पिच तयार केली.
 
सचिनला वेगवान गोलंदाजीचा सराव करता यावा यासाठी बॉलिंग मशीन विकत घेतली. जवळपास 7 लाख रुपयांची ही मशीन आहे. दररोज संध्याकाळी 5 ते 9 च्या दरम्यान सचिन इथं सराव करायला येत असतो.
 
आम्ही याठिकाणी पोहोचलो तेव्हा संजय मोठ्या मायेनं सचिननं वापरलेल्या बॅट्स, ग्लोव्ल्ज आणि हेल्मेटवरुन हात फिरवत होते.
 
सचिन वापरत असलेली एकएक गोष्ट पुसून ती पुन्हा पेटीत ठेवत होते.
 
अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत ज्या नावांची चर्चा झाली, त्यापैकी सचिन धस हे एक नाव. सचिननं आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात आक्रमक फलंदाजी केली आणि भारताला अंतिम सामन्यात पोहचवण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यानंतर सचिनच्या नावाची सगळीकडे चर्चा झाली. अनेक दिग्गजांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
 
सचिन मूळचा बीडचा. तहसील कार्यालयाच्या मागच्या बाजूस त्याचं घर आहे.
 
आम्ही त्याच्या घरी पोहचलो तेव्हा हॉलमधील कपाट सचिनच्या संग्रहातील बॅट्स, त्यानं जिंकलेल्या ट्रॉफीज आणि पुरस्कारांनी पूर्णपणे भरलेलं दिसलं.
 
सचिनचे वडील सांगायला लागले, “मला क्रिकेटची प्रचंड आवड होती. मला सचिन तेंडुलकर खूप आवडायचा. त्यामुळे मग मी माझ्या मुलाचं नाव सचिन ठेवलं आणि त्याला क्रिकेटर बनवायचं ठरवलं.मी क्रिकेट खेळायचो. मग मी त्याला माझ्यासोबत घेऊन जायचो. मग त्यालाही क्रिकेटची आवड निर्माण झाली.”
 
वयाच्या चौथ्या वर्षी संजय यांनी सचिनच्या हातात बॅट दिली आणि त्याला सरावासाठी मैदानावर घेऊन जायला लागले.
 
इथंच त्यांची भेट अझहर शेख यांच्याशी झाली. अझहर हे गेल्या 20 वर्षांपासून बीडमध्ये क्रिकेटचे कोच म्हणून कार्यरत आहेत. ते स्वत:ची खासगी अकॅडमी चालवतात.
 
11 फेब्रुवारीच्या सकाळी 8 वाजता आम्ही बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात पोहचलो तेव्हा अझहर शेख तिथं होते.
 
ते क्रिकेटचा सराव करण्यासाठी आलेल्या लहान मुलांना, तरुण-तरुणींना सूचना देत होते. मार्गदर्शन करत होते.
 
सचिनविषयी विचारल्यावर ते म्हणाले, “सचिन साडेचार वर्षांचा असताना माझ्याकडे आला. तेव्हापासून मी त्याला मार्गदर्शन करत आहे. त्यावेळेस वाटायचं हा एवढा छोटा असतानाही त्याची बॅट सरळ येतेय. आक्रमक पद्धतीनं खेळणं ही त्याची जमेची बाजू आहे.”
 
वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यांमध्ये फलंदाजांना आक्रमक खेळी कशी करायची हे सांगितलं जातं. पण मी सचिनला क्रिकेटच्या बेसिक्सवर लक्ष द्यायला सांगितलं. वर्लड कपला जाण्याच्या 8 दिवस अगोदर पूर्ण फोकस बेसिक खेळीवर केला. आडवे-तिडवे शॉट्स न मारता बेसिक्स क्रिकेट खेळायला सांगितल्याचंही अझहर म्हणाले.
 
अझहर यांच्याशी बोलत सुरू असतानाच अनेक तरुण आमच्या भोवती जमा झाले. फायलनच्या मॅचमध्ये सचिनला वरच्या क्रमांकावर खेळण्यास पाठवायला हवं, असं सचिनसोबत सराव करणारा एक तरुण म्हणाला.
 
तर महाराष्ट्राकडून अंडर-14 संघात खेळलेला एक जण म्हणाला, “सचिन दादा आमचा रोल मॉडेल आहे. तो इथं असला की आम्ही त्याचा खेळ पाहत असतो. आम्ही खेळताना काही चुकत असेल तर तो स्वत: आमच्याकडे येतो आणि आम्हाला सांगत असतो.”
 
मराठवाडा आणि बीडमधील दुष्काळी परिस्थितीचाही सचिनला सरावादरम्यान सामना करावा लागला.
 
सचिननं ज्या खेळपट्टीवर सराव केला ती दाखवत अझहर शेख म्हणाले, “इथंच सचिन सराव करतो. तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल की आम्ही अर्ध्याच खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. कारण इथं पाण्याची समस्या आहे. याशिवाय मोठ्या खेळपट्ट्या करायला म्हणजे पैसा लागतो.”
 
पण खेळपट्ट्या नाही किंवा सर्व सोयीसुविधा नाही म्हणून अझहर शेख थांबणार नव्हते. त्यांनी मुलांना यावेळी एक सल्ला दिला.
 
“मी मुलांना म्हटलं की, मुंबई-पुण्यात सगळ्या सुविधा असतात. आपल्याकडे त्या नाहीत. पण म्हणून आपण थांबून चालणार नाहीत. मुंबई-पुण्यातले पोरं जेवढी प्रॅक्टिस करतात त्याच्या दररोज 2 तास जास्तीची प्रॅक्टिस आपण करायची.”
 
खरं तर सचिननं क्रिकेट खेळण्याला त्याच्या आईचा विरोध होता. क्रिकेटमधील स्पर्धा, तयारीसाठी लागणारं भांडवलं यामुळे त्यांना सचिनच्या क्रिकेटमधील भविष्याबाबत चिंता होती.
 
सचिनच्या आई सुरेखा धस म्हणाल्या, “43 डिग्री तापमान वाढलं तरीसुद्धा सचिनं ग्राऊंडवर होता. त्याला कधी कुणाचं लग्न अटेंड करता आलं नाही किंवा कधी मामाच्या गेला नाही. त्याला क्रिकेटचं वेड आहे.
 
सचिनचे वडील आणि त्याचे इतर नातेवाईकही त्याचा खेळ पाहून त्याला क्रिकेटमध्येच करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देत होते.
 
सचिनही एकएक पाऊल पुढे टाकत होता. सचिनचं क्रिकेटमधील कामगिरी बघून मग त्याची आई निर्धास्त झाली. आता त्यांना सचिनची आई म्हणून अभिनंदनाचे फोन येतात.
 
सचिनच्या आई सुरेखा धस म्हणाल्या, “मी पोलिस दलामध्ये काम करते. त्यामुळे लोक मला ओळखतात. पण आज जे फोन येतात ते सचिनची मम्मी काँग्रॅच्युलेशन्स असं म्हणून येतात. मीडियामधूनही फोन आले. त्यामुळे खूप चांगलं वाटतं.”
 
सचिनची आई सुरेखा धस बीड पोलिस दलात सहाय्यक पोलिस निरीक्षक तर वडील संजय धस आरोग्य विभागात कर्मचारी आहेत.
 
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंडर-19 वर्लड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी बीडमध्ये तीन ठिकाणी सभागृहांमध्ये स्क्रीन्स लावण्यात आल्या होत्या. छत्रपती क्रीडा संकुलातल्या हॉलमध्ये आम्ही पोहोचलो तर तिथं काही जण मॅच बघत होते.
 
ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकत भारताला 253 धावांचं टार्गेट दिलं. सामना सुरू होण्यासाठी अर्धा तास वेळ असल्यानं सगळे जण हॉलमधून बाहेर पडले.
 
काय होईल जिंकेल का भारत? असं विचारल्यावर एक जण म्हणाला, “100 % जिंकणार. कारण 250 काय फार मोठी धावसंख्या नाही. ऑस्ट्रेलियानं 300 केले असते तर मग माईंडला प्रेशर आलं असतं.”
 
दुसरा एक जण म्हणाला, “सचिनला लवकर म्हणजे चौथ्या क्रमांकावरच खेळायला पाठवायला पाहिजे.”
 
भारतीय संघाची फलंदाजी सुरू झाल्यानंतर हॉलमध्ये बऱ्यापैकी गर्दी दिसून आली.
 
ऑस्ट्रेलियानं दिलेलं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली.
 
91 धावांवर भारताचे 6 फलंदाज तंबूत परतले. भारतीय संघाचा कर्णधार उदय सहारन बाद झाल्यावर सचिन धस खेळायला आला तोच हॉलमध्ये टाळ्यांनी त्याचं स्वागत करण्यात आलं.
 
सचिननं आक्रमक खेळी करायला सुरुवात केली. त्याच्या प्रत्येक शॉट्सवर हॉलमध्ये टाळ्या आणि शिट्ट्या वाजत होत्या.
 
पण, सचिन केवळ 9 धावा करू शकला. सचिन बाद झाल्यावर हॉलमधील बहुतेक जण बाहेर पडले. अर्ध्यापेक्षा जास्त हॉल रिकामा झाला.
 
सचिन बाद झाल्यावर त्याचे वडील संजय धस यांनी चेहरा दोन्ही हातांनी झाकून घेतला. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं.
 
चहा घेण्यासाठी मीही हॉलबाहेर पडलो. टपरीवर काही जणांची मॅचविषयी चर्चा सुरू होती.
 
त्यातला एक जण म्हणाला, “जास्त तारिफ केली की असं होतं की काय माहिती? सचिननं निदान 25 धावा तरी करायच्या होत्या.”
 
रात्री दहाच्या सुमारास संजय धस हॉलमधून बाहेर पडत घराकडे जायला निघाले. मला बघितल्यावर ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला मिठी मारली आणि म्हणाले, “भारत जिंकायला पाहिजे होता, कुणीही खेळला असता तरी चाललं असतं. पण भारत जिंकायला पाहिजे होता.”
 
Published By- Priya Dixit