रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 17 जुलै 2019 (10:41 IST)

इच्छा नसतानाही महिला 'या' पाच कारणांमुळे रिलेशनशीपमध्ये राहतात

लग्नाला हिंदू संस्कृतीत आजही खूप मोठं महत्त्व आहे. प्रत्येकाने एका वयात आल्यानंतर लग्न करायलाच हवं, असा घरातल्या मोठ्यांचा नेहमी आग्रह असतो. मुलगी वयात आली, मुलगा कमवता झाला की घरच्यांना त्यांच्या लग्नाची घाई होते. एकदा लग्न झालं की तुम्हाला ते नातं टिकवायचंच आहे, असा अप्रत्यक्ष दबाव पुरुष आणि महिला दोघांवरही असतो. मग त्यांच्या नात्यात प्रेम, आपुलकी, काळजी असो किंवा नको. पण, त्यांनी त्यांचं नातं टिकवावं अशीच सर्वांची अपेक्षा असते. यामध्ये जास्तकरुन महिलांना तडजोड करावी लागते. त्यांना त्यांच्या सर्व भावना बाजूला सारत ते नातं सांभाळावं लागतं. पण, कुणी कितीही प्रयत्न केले, तरी नवरा-बायकोच्या नात्यात प्रेम नसेल, एकमेकांना समजून घेण्याची क्षमता नसेल, तर असं नातं फार काळ टिकू शकत नाही. तरीही महिला ते नातं टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामागे काही कारणं असतात. आज आपण तिचं कारणं जाणून घेणार आहोत, ज्यामुळे महिलांना ही तडजोड आयुष्यभर करावी लागते.
 
संभ्रम :
मनोवैज्ञानिकांच्या मते, शारीरिक आणि मानसिक त्रास भोगल्यानंतरही अनेकदा महिला आपल्या नात्याबद्दल संभ्रमात असतात.  त्यांच्यासोबत होणाऱ्या वाईट, चुकिच्या गोष्टींसाठी त्या स्वत:ला दोषी मानतात. यामुळे त्यांच्यामधील आत्मसन्मान कमी होत जातो, एव्हाना संपून जातो. त्यांना असं वाटायला लागतं की, त्यांच्या आयुष्याला काही किंमत नाही.
 
समाजाची भीती
बऱ्याचदा महिलांना समाजाची भीती असते. त्यामुळे नात्यामध्ये त्रास होत असला तरी त्या त्यातून बाहेर पडत नाहीत. एवढंच नाही, तर अनेकदा महिला आपल्यासोबत होणाऱ्या वाईट गोष्टीही कुणाला सांगत नाहीत.
 
जोडीदार सुधारण्याची अपेक्षा :
काही महिला आपल्या जोडीदाराला सोडून जात नाहीत. कारण, त्यांना असं वाटतं की, कधीतरी जोडीदारामध्ये सुधारणा होईल. तसेच, मी सोडून गेल्यावर जोडीदाराला त्रास होईल. असा विचार करुन अनेक महिला वर्षानुवर्षे घुसमटत नातं निभवत असतात.
 
मुलांच्या भविष्यासाठी :
पालक म्हणून मुलांची जबाबदारी घेणं खूप महत्त्वाचं आहे. अशात जर महिलांची गोष्ट असेल, तर अडचणी आणखी वाढतात. यामुळे आपल्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी त्या स्वत:चं भविष्य अंधारात टाकतात.
 
कुटुंबाचा दबाव :
आज आपल्या देशात नात जोडणं सोपं आहे, पण त्या नात्यातून बाहेर येणं खूप कठीण होऊन जाते. जर महिला नात्यात आनंदी नसेल आणि तिला त्यातून बाहरे पडायचं असेल, तर तिला तिचे नातेवाईक तसं करण्यापासून रोखतात. तिला अॅडजस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा कुटुंबातील लोक समाज, कुटुंब आणि मुलांच्या नावाखाली नातं टिकवून ठेवण्यासाठी दबाव टाकतात.
 
आर्थिक स्थितीमुळे हतबल :
अनेकदा काही महिला आर्थिक स्तरावर सक्षम नसल्याने त्यांना जोडीदारावर अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे अशा नात्यामध्ये राहणं तिची गरज असते. त्यामुळे तिला ते नातं टिकवावं लागतं.