शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जुलै 2022 (12:50 IST)

माहेर

mayka
वयाची उणीपुरी वीसपंचवीस वर्षे जिथे काढून बाकी आयुष्यभर सासरी राहतात. पण बायकांचा सारा जीव जिथं गुंतलेला असतो..... ते माहेर!
 
लेकीच्या घरी भरभरून असूनही 'हे एवढं' तिच्यासाठी राखून ठेऊन, आठवणीने तिच्यासाठी पाठवून देतं..... ते माहेर!
 
घरी पोचल्यावर आईच्या गळ्यात पडणं. पाठीवरून हात फिरवून घेताना बाबांच्या ओथंबलेल्या नजरेतूनच त्यांचं सारं प्रेम समजतं..... ते माहेर! 
 
भावंडांना गप्पा मारायच्या असतात. पण  'झोपलीय तर झोपू देत जरा. तिच्या घरी उठतीच की लवकर'  असं म्हणत  उशीरापर्यंत झोपू देतं.... ते माहेर!
 
ती तिच्या घरी सर्व पदार्थ बनवून  खाते, खाऊ घालते. तरीही इकडे आल्यावर तिच्या आवडीचे निरनिराळे पदार्थ बनवून तिला खायला घालते.... ते माहेर!
 
कामं लवकर उरकणं. रात्री उशिरापर्यंत  भावजयशी खुसुखुसू करत बसणं ( भावाला कळणार नाही अशा पद्धतीने) जिथं शक्य असतं..... ते माहेर!
 
दोन-चार दिवस फोन झाला नाही तर, फोन करून 'काय गं, बरी आहेस ना.... विचारणा करतं..... ते माहेर!
 
भाचेमंडळी कितीही मोठी झाली तरीही मग आज काय आणायचा खाऊ? म्हणत मामा त्यांचे लाड पुरवतो.... ते माहेर!
 
कोणताही कार्यक्रम असो, अडीअडचण असो. प्रत्येक विवाहित स्त्रीची नेहमी तयार असणारी सपोर्ट सिस्टीम.... ते माहेर!
 
नवविवाहिता असू देत किंवा एखादी आजी-पणजी. पण तिकडे जायचं ठरलं की अंगात वेगळाच उत्साह संचारतो.... ते माहेर!
 
सासरी जाताना पुन्हा पुढच्या भेटीला येईपर्यंत भरपूर एनर्जी, चैतन्य भरून देतं.... ते माहेर!
 
सासरी आल्यावर आपल्यात झालेला energetic बदल बघून सासरी सारेच खूष होऊन ज्याला धन्यवाद देतात.... ते माहेर!
 
आणि शेवटचे अन् महत्त्वाचे
 
ही पोस्ट वाचताना ज्याच्या आठवणीने हृदयात गलबलतं आणि डोळ्यांच्या कडा नकळतपणे ओलावतात.... ते माहेर!

- सोशल मीडिया