1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Updated: शनिवार, 24 डिसेंबर 2022 (08:33 IST)

तुझं गुपित

मैतरणी ग सांग साजणी गुपीत समदं मला
कशाचा ध्यास तुला लागला?
 
झुंजुरकाचं काखंवरती घेऊनिया घागर
एकली जातिस ओढ्यावर!
गुरं वासरं पार पिटाळुन वरल्या माळाकडं
झटकशी उन्हांत कोणाकडं?
 
शिरवाळीचं ओघळीतल्या निवत्या वाळूवर
बांधिशी कुणासंगाती घर?
कां घुटमळशी ग कडुसं
 
पडल्यावर? 
कां अल्याड चुकती रानिं तुझी वासरं?
 
ती रोजच घुमते शीळ कुणाची बरं?
करंजाखालीं कोण भेटतौ शमलेवाला तुला?
कशाचा ध्यास तुला लागला?
 
पिंपरणीचीं कवळीं पानं उन्हात व्हावीं तशी
कशानं मलूल झालिस अशी?
गालांवरती रसरस करिती मुरमाच्या पुटकुळ्या
चुरडल्या ओठांच्या पाकळ्या
 
कशी विरलि ग नवीन चोळी बाई छातीवर
पिचकले हातांतील बिलवर?
 
घे उरकुन आतां लौकर साखरपुडा
ह्यो खुळ्या पिरतीचा रस्ता लइ वांकडा
ह्यो लागो परता बोल तुला वावडा
पिकल्या आंब्यावरचा राघू चुकवुन जाईल तुला
द्वाड ह्यो इष्काचा मामला?
 
- ग. दि. माडगूळकर (गदिमा)