Corn Bhel चमचमीत, चविष्ट आणि पौष्टीक स्वीट कॉर्न भेळ
कॉर्न म्हणजे मक्का हे सर्वानाच आवडतं. भाजून किंवा ह्याची भेळ बनवून देखील आपण खाऊ शकतो. मक्का फार पौष्टीक असतो. या मध्ये फॅट, कार्बोहायड्रेट, प्रथिनं, फायबर सह महत्वाचे व्हिटॅमिन आणि खनिज मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे हे शरीरासाठी आवश्यक असणारे पोषक घटक पुरवतात.
आज आम्ही आपल्याला स्वीट कॉर्न ची भेळ कशी तयार करावी हे सांगत आहोत. चमचमीत आणि चविष्ट असल्यामुळे हे आपणास नक्की आवडेल.
साहित्य -
2 कप उकडलेले स्वीट कॉर्न, 1 कप बटाटा उकडून कुस्करलेला, 1/2 कप बारीक चिरलेला कांदा, 1/2 कप बारीक चिरलेले टमाटे, 1/4 कप बारीक शेव, फरसाण, 1/4 कप बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे चिंचेची गोड चटणी, 2 चमचे हिरवी चटणी, 2 चमचे लिंबाचा रस, पादेलोण किंवा काळं मीठ चवीपुरती, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा डाळिंबाचे दाणे सजावटीसाठी.
कृती -
सर्वप्रथम एका भांड्यात कॉर्न घ्या. यामध्ये उकडून कुस्करलेले बटाटे घाला. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा, चिरलेले टमाटे, कोथींबीर, चिंचेची चटणी, हिरवी चटणी, काळं मीठ आणि चाट मसाला घालून चांगल्या प्रकारे मिसळून घ्या.
यावरून लिंबाचा रस पिळून चांगल्या प्रकारे ढवळून घ्या. वरून सजावटीसाठी डाळिंबाचे दाणे घाला. चविष्ट आणि पौष्टीक स्वीट कॉर्न भेळ खाण्यासाठी तयार आहे.