1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021 (21:42 IST)

मुख्यमंत्र्यांनी माशांचा पाहुणचार घ्यावा आणि परत जावं, विमानतळाचं श्रेय आमचंच : राणे

मुंबई : शिवसेना विरुद्ध नारायण राणे या संघर्षाचा आणखी एक अंक उद्या सिंधुदुर्गात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचं उद्घाटन केलं जाणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील उपस्थित राहणार आहेत. राणे यांनी उद्याच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. चिपी विमानतळाच्या कामात शिवसेनेचा काहीच संबंध नाही. उलट यांच्या नेत्यांनी विमानतळाच्या कामांना विरोध केला, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. विकास प्रकल्पांना आधी विरोध करायचा आणि प्रकल्प पूर्ण झाले की श्रेय घ्यायला यायचं, ही शिवसेना नेत्यांची वृत्ती आहे. राज्याचे मुख्यमंत्री असल्यानं उद्धव ठाकरे यांनी आमच्या सिंधुदुर्गात यावं, आम्ही त्यांचा पाहुणचार करू, मालवणचं म्हावरं खावं आणि परत जावं, असा टोला राणे यांनी लगावला आहे.
 
नारायण राणे यांनी भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सिंधुदुर्गसाठी आपण काय काय केलं याची जंत्रीच सादर केली. तसेच चिपी विमानतळासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा आढावाही घेतला. चिपी विमानतळाचे सर्व श्रेय भाजप आणि आमचं आहे. त्यात कुणाचंही श्रेय नाही. पाहुणे म्हणून आम्ही बोलावलंय पाहुणे म्हणून या. पदाप्रमाणे काही तरी द्या आणि जा. नाही तर पूर्वी मोठमोठी माणसं कार्यक्रमाला यायची, एक मंत्री आला की मोठमोठे रस्ते व्हायचे. आता एकदोन तीन रस्त्यांचे पैसे तरी द्या. विकासाच्या अनेक गोष्टी आहेत. त्याला पैसे द्या. वादळाच्यावेळी जाहीर केलेले पैसे द्या. पूरपरिस्थितीत जाहीर केलेले पैसे द्या, असं राणे म्हणाले.
 
विकासाच्या आड कोण येतं ते जनतेला माहीत आहे. सिंधुदुर्गातील जनता त्याची साक्षीदार आहे. उद्घाटनाची परवानगी मी आणली. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन त्यांना उद्घाटनासाठी ८ दिवसांत परवानगी देण्याची विनंती केली. त्यांनी ती तातडीनं मान्य केली आणि ९ ऑक्टोबर तारीख दिली. शिवसेना नेत्यांनी विमानतळासाठी काय केलं, त्यांची औकात काय, असे प्रश्न राणेंनी विचारले.