कोरोना संसर्ग नव्याने वाढू नये म्हणून रेल्वे मंत्रालयाने अशी शक्कल लढवली
रेल्वे विभागाने रेल्वे प्लॅटफॉर्मच्या तिकिटात तब्बल पाच पटीने वाढ केलीय. लोकांनी विनाकारण रेल्वेस्थानकात गर्दी करु नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. तसेच रेल्वे स्थानकाच्या परिसरात विनामास्क फिरल्यास तब्बल 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे निर्बंधांमध्ये शिथिलता आणली जात आहे. राज्यात मंदिरं तसेच शाळा नुकत्याच सुरु झाल्या आहेत. परंतु निर्बंध शिथिल झाल्यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता असल्यामुळे रेल्वे मंत्रालयाने खरबदारी घेणे सुरु केलं आहे. रेल्वेस्थानकावर लोकांनी गर्दी करु नये म्हणून प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात पाच पटीने वाढ करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. यापूर्वी मुंबईत प्लॅटफॉर्म तिकिटाचा दर हा 10 रुपये होता. आता नव्या दरांनुसार प्लॅटफॉर्म तिकीट हे 50 रुपये करण्यात आले आहे. हे नवे दर 8 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. मुंबईतील सीएसएमटी, एलटीटी, कल्याण, ठाणे, दादर आणि पनवेल स्थानकावर हा दर आकारण्यात येणार आहे. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतलाय.
दुसरीकडे प्लॅटफॉर्मचे तिकीट वाढवण्याबरोबरच रेल्वे मंत्रालयाने अन्य नियमसुद्धा आणखी कठोर केले आहेत. मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांविरोधात कडक नियम लागू करण्यात आले आहेत. नव्या आदेशानुसार रेल्वे परिसर आणि रेल्वे गाड्यांमध्ये मास्क न वापरल्यास 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. सनासुदीच्या काळात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून हे नियम लागू करण्यात आले आहेत.