1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : गुरूवार, 2 नोव्हेंबर 2023 (12:10 IST)

नीता अंबानींच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त 'अन्न-सेवा', देशभरात 1.4 लाख लोकांना जेवणाचे वाटप

• नीता अंबानी यांनी त्यांचा वाढदिवस 3 हजार वंचित समाजातील मुलांसोबत साजरा केला.
नवी दिल्ली- रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी 1 नोव्हेंबर रोजी त्यांचा 60 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी अन्न सेवेअंतर्गत 15 राज्यांतील 1.4 लाख लोकांना अन्नदान करण्यात आले. अन्न सेवेच्या माध्यमातून सुमारे 75 हजार लोकांना शिजवलेले जेवण देण्यात आले. तर सुमारे 65 हजार लोकांसाठी कच्च्या रेशनचे वाटप करण्यात आले.
 
लहान मुले, वृद्धाश्रमात राहणारे वृद्ध, रोजंदारीवर काम करणारे, ट्रान्सजेंडर समुदायातील लोक, कुष्ठरोगी आणि विशेष गरजा असलेल्या लोकांना जेवण देण्यात आले. अन्न वाटपापासून ते विविध ठिकाणी गरमागरम जेवण देण्यापर्यंतची सर्व कामे रिलायन्सच्या स्वयंसेवकांनी केली. नीता अंबानी यांनी वंचित समाजातील सुमारे 3000 मुलांसोबत वाढदिवस साजरा केला.
कोरोना महामारीच्या काळात नीता अंबानींच्या रिलायन्स फाऊंडेशनने अन्न सेवा नावाने त्यावेळचा सर्वात मोठा अन्न वितरण कार्यक्रम चालवला होता. फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार नीता अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त अन्न वाटप हा त्याच परंपरेचा विस्तार आहे.
 
नीता अंबानी यांनी शिक्षण, महिला सबलीकरण, क्रीडा, कला आणि संस्कृती या क्षेत्रांत अगणित कामगिरी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स फाऊंडेशनने देशभरातील 7 कोटी 10 लाखांहून अधिक लोकांचे जीवन प्रभावित केले आहे.