चक्क बकर्यांचे स्वयंवर!
सिमला : हल्ली हौसेपोटी अनेक लोक पशुपक्ष्यांचेही काही कार्यक्रम आयोजित करीत असतात. आपल्याकडे गायीचे डोहाळे जेवण होत असते तर पाश्चात्य देशांमध्ये कुत्र्या-मांजरांचे फॅशन शो होत असतात. मात्र, कधी बकर्यांचे स्वयंवरही होऊ शकते, याची आपण कल्पना केली नसेल. उत्तराखंडमध्ये असे एक स्वयंवर झाले आहे. टिहरी जिल्ह्यातील पंतवाडी नावाच्या गावात हे अनोखे स्वयंवर पार पडले. अर्थातच आता हे स्वयंवर चर्चेचा विषय बनले आहे!
या स्वयंवरात आसपासच्या परिसरातील अनेक बकर्या सहभागी झाल्या होत्या. त्यांची वेगळी वेशभूषा करून त्यांना चांगले सजवलेही होते. या बकर्यांची नावेही चांगली आधुनिक होती. दीपिका, प्रियांका, करिना, कंगना आणि कॅटरिना अशी नावे असलेल्या या बकर्यांनी आपापले जोडीदार या स्वयंवरात पसंत केले! दीपिकाने या स्वयंवरात आपला जोडीदार म्हणून बैसाखू नावाच्या बकर्याला निवडले तर प्रियांकाने टुकनू आणि कॅटरिनाने चंदूची निवड केली! गोट व्हिलेज आणि ग्रीन पिपल किसान विकास समितीने या स्वयंवराचे आयोजन केले होते.