शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 6 डिसेंबर 2023 (10:07 IST)

राजपूत करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडीच्या हत्येची जबाबदारी कोणी घेतली?

sukhdev
मोहरसिंह मीणा
ANI
 राजपूत करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांची मंगळवार 5 डिसेंबर 2023 रोजी जयपूरमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांना भेटण्यासाठी म्हणून त्यांच्या श्यामनगर येथील घरी तीन हल्लेखोर आले होते. त्यांनी या गोळ्या झाडल्या. या घटनेत एका हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे.
 
गोगामेडी यांना गंभीर स्थितीतच मानसरोवरच्या एका रुग्णालयात नेण्यात आलं तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
 
यानंतर रुग्णालयाच्या बाहेर राजपूत करणीसेनेशी संबंधित लोक एकत्र झाले आणि त्यांनी निदर्शनं केली. तसेच जयपूर, उदयपूर, बाडमेर अशा विविध भागांतून निदर्शनं होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या.
 
या घटनेची 3 सीसीटीव्ही चित्रणं मिळाली आहेत. त्यात दोन हल्लेखोर सुखदेव सिंह यांच्यावर गोळ्या झाडताना दिसत आहे.
 
सीसीटीव्ही चित्रणाच्या मदतीने पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी राज्यभरात अलर्ट घोषित केला असून डीजीपी उमेश मिश्रा यांनी सतर्कता राखण्याचे आदेश दिले आहेत.
 
पोलिसांनी काय सांगितलं?
श्यामनगर भागात सुखदेव सिंह यांच्या घरात घुसून दुपारी साधारण दीड वाजता गोळीबार करण्यात आला. त्यानंतर पोलीस तात्काळ तिथं आले. एफएसएल टीमने घटनास्थळावरुन पुरावे गोळा केले आहेत.
 
जयपूरचे पोलीस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ या घटनेबद्दल म्हणाले, "तीन लोक गोगामेडी यांना भेटायला आले होते. परवानगी मिळाल्यावर ते आत आले आणि साधारण 10 मिनिटं त्यांनी चर्चा केली. 10 मिनिटांनी त्यांनी गोळ्या झाडल्या. त्यात सुखदेव यांचा मृत्यू झाला.
 
शेजारी उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकालाही गोळ्या लागल्या, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. यात एका हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे."
 
जोसेफ म्हणाले, "मृत्यू झालेल्या हल्लेखोराचे नाव नवीनसिंह शेखावत असून तो मुळचा शाहपुराचा होता. त्याचं जयपूरमध्ये कपड्यांचं दुकान होतं."
 
"सीसीटीव्ही चित्रणात ही सगळी घटना दिसत असून त्याच्या आधारे तपास करत आहोत. तसेच प्रत्यक्षदर्शी आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही लवकरच उर्वरित 2 हल्लेखोर आणि या हल्ल्याचं नियोजन करणाऱ्यांपर्यंत पोहोचू. हल्लेखोरांशी संबंधित ठिकाणांवर तपास सुरू असून जयपूरच्या आजूबाजूचे जिल्हे आणि बिकानेर विभागातही तपाय सुरू आहे. आम्ही हरियाणा पोलिसांनाही सहकार्य करण्याची विनंती केली आहे."
 
सुखदेव सिंह गोगामेडी कोण होते?
सुखदेव सिंह गोगामेडी हे हनुमानगड जिल्ह्यातले राजपूत समाजाचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जात.
 
2017 साली 'पद्मावत' सिनेमाला विरोध केल्यानंतर त्यांचं नाव चर्चेत आलं. राजपूत करणी सेनेनं या सिनेमाचं चित्रिकरण जयपूरमध्ये होत असताना त्याच्या सेटची तोडफोड आणि निदर्शनं केली होती.
 
या सिनेमातल्या काही दृश्यांवर त्यांचा आक्षेप होता. त्याचकाळात सिनेमाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना थप्पड मारल्याच्या घटनेनंतर गोगामेडी बातम्यांमध्ये आलेराजपूत समाजाची संघटना असलेल्या करणी सेनेत ते अनेक वर्षं होते मात्र लोकेंद्र सिंह कालवी यांच्या वाद झाल्यानंतर त्यांनी राजपूत करणी सेना नावाने नवी संघटना तयार केली. कालवींच्या निधनानंतर राजपूत समाजाचे मोठे नेते म्हणून गोगामेडी नावारुपाला आले होते.
 
त्यांच्यावर अनेक गुन्हे नोंद होते. ते राजकारणातही सक्रीय होते. दोनवेळा त्यांनी बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती पण त्यांना अपयश आले होते.
 
2020 साली कंगना राणावत आणि संजय राऊत यांच्यातील वाकयुद्धात त्यांनी कंगनाची बाजू घेतली होती. तसेच कंगनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी अनेक ठिकाणी निदर्शनं केली होती.
 
राज्यभरात निदर्शनं
सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येनंतर राज्यभरात निदर्शनं होत आहे. मानसरोवर येथील रुग्णालयाबाहेरही निदर्शनं झाली आणि राजपूत समाजाच्या लोकांनी रस्तारोको करुन निदर्शनं केली. हल्लेखोरांना तात्काळ पकडा अशी मागणी ते करत आहेत.
 
जयपूर, उदयपूर, प्रतापगड, बिकानेर, बाडमेर, जोधपूर, जैसलमेरसह राज्यातील अनेक भागांत राजपूत लोकांनी आंदोलनं केली आहेत आणि महामार्ग व रस्ते बंद केल्याच्या बातम्या येत आहेत.
 
क्षत्रिय करणी सेना परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राज शेखावत यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
 
ते म्हणाले, "करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोगामेडी यांची राहत्या घरीच ज्या प्रकारे हत्या झाली आहे, त्यामुळे क्षत्रिय समाजात संतापाची लाट निर्माण झाली आहे. सरकारनं या हल्लेखोरांना तात्काळ पकडावं नाहीतर जयपूरमध्ये मोठं आंदोलन केलं जाईल आणि होणाऱ्या परिणामांना सरकारला सामोरं जावं लागेल."
 
काँग्रेस सरकारमधील माजी मंत्री राजेंद्र गुढा यांनी या घटनेला 'भ्याड कृत्य' असं म्हटलं आहे. या घटनेनंतर राज्यभरातले राजपूत समाजाचे लोक जयपूरमध्ये गोळा होत आहेत. जयपूरमधल्या अनेक भागांतली दुकानं बंद केली गेली आणि बुधवार 6 तारखेला जयपूर बंदचं आव्हान करण्यात आलं. राजस्थान पोलीस डीजीपी उमेश मिश्रा यांनी लोकांना शांतता राखण्याची विनंती केली आहे.
 
रोहित गोदारा टोळीनं घेतली हत्येची जबाबदारी
डीजीपी उमेश मिश्रा सांगतात, "या हत्येची जबाबदारी रोहित गोदारा टोळीनं घेतली आहे. आम्ही लवकरच अटक कारवाई करू. रोहित गोदारावर 1 लाख रुपयांचं बक्षीस आहे आणि तो गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहे. "
 
मूळच्या बिकानेरच्या रोहितवर गेल्यावर्षी बेकायदेशीररित्या देशातून पळृून जाण्याचाही आरोप ठेवण्यात आला आहे. त्याने पूर्वी गँगस्टर राजू ठेहटच्या सिकर येथे जालेल्या हत्येचीही जबाबदारी घेतली होती.
 
राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या हत्येनंतर म्हटलं, "श्री सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येमुळे अतीव दुःख झालं. मी दिवंगत आत्म्याला शांतता मिळावी आणि त्यांच्या कुटुंबीयांना हा आघात सहन करण्याची शक्ती मिळावी यासाठी प्रार्थना करतो."
 
राज्यपाल कलराज मिश्र यांनी राज्यात शांतता टिकून राहावी यासाठी व्यवस्था करावी असे आदेश डीजीपींना फोनद्वारे दिले आहेत. 'अपराधी कोणीही असो त्याच्याविरुद्ध कडक कारवाई केली जावी' तसेच सामान्य नागरिकांचं संरक्षण आणि शांततेसाठी प्रभावी पावलं उचलावीत असे आदेशही त्यांनी दिले.
 
माजी मंत्री राजेंद्र गुढा यांनी पोलीस प्रशासनाला उद्देशून एक्सवर लिहिलं, "सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर भ्याड हल्ला करुन हत्या करणं निंदनीय आहे. मी काहीवेळातच जयपूरला पोहोचत असून राजस्थान सरकार व पोलिसांनी तात्काळ कारवाई केली नाही तर प्रतिकूल परिणांमासाठी तेच जबाबदार राहातील. "
 
जोधपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले, "श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येच्या घटनेची बातमी समजल्यावर मी स्तब्धच झालो. याबाबत मी पोलीस आयुक्तांकडून माहिती घेतली आणि आरोपींना लवकर अटक करण्यास सांगितले. लोकांनी शांतता आणि धैर्य बाळगण्याची गरज आहे."
 
"भाजपा सरकारने शपथ घेतल्यावर राज्याला गुन्हेगारीमुक्त करण्याला आमची प्राथमिकता असेल. गोगामेडी यांच्या आत्माल्या ईश्वर शांती देवो. त्यांच्या कुटुंबाला आणि शुभचिंतकांना हा धक्का सहन करण्याची शक्ती मिळो."
 
बुधवारी 6 डिसेंबरला राज्यभरात निदर्शनं होऊ शकतात. पोलीस त्या 2 हल्लेखोरांचा तपास करत आहे, आतापर्यंत त्यादिशेने त्यांना विशेष यश मिळालेलं नाही.