सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 3 ऑगस्ट 2022 (15:20 IST)

उदय सामंत यांच्यावर हल्ला, संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक

शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्यावर मंगळवारी रात्री पुण्यातील कात्रज चौकात हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई केली असून पुणे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांतच पुणे पोलिसांनी हल्लेखोरांची धरपकड केली आहे.
 
याप्रकरणी उदय सामंत यांनी तत्काळ पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. काही हल्लेखोरांचे फोटोही यावेळी दिले. दरम्यान, याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई व्हावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यामुळे पोलिसांनीही आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि पाच जणांना अटक केली. यामध्ये शिवसंवाद सभेचे मुख्य आयोजक संभाजी थोरवे, राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रुपेश पवार आणि पुण्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांना अटक करण्यात आली आहे.
 
या शिवसैनिकांवर कलम ३०७ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. तसेच, हिंगोलीचे शिवसेना संपर्कप्रमुख बबन थोरात यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.