शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (15:39 IST)

पुणे पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेकडे उमेदवारांची पाठ, 3 ‘डमी’ उमेदवार जाळ्यात

पुणे आयुक्तालयातील पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेकडे मोठ्यासंख्येने उमेदवारांनी पाठ फिरविली. भरतीसाठी अर्ज केलेले जेमेतेम ३१. २८ टक्केच उमेदवारच परीक्षेसाठी हजर राहीले. तर पोलिसांनी परीक्षेवेळी ठेवलेल्या बंदोबस्तामुळे तीन केंद्रांवर तीन डमी उमेदवारही आढळले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी दिली.
 
पुणे पोलिस आयुक्तालयातील शिपाई पदाच्या भरतीसाठी आज ७९ केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली. पोलिस भरतीसाठी ३८ हजार ४४१ उमेदवारांनी अर्ज केले होते.त्, प्रत्यक्षात लेखी परीक्षेला १२ हजार २७ उमेदवारांनीच हजेरी लावली. उमेदवारांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचता यावेयासाठी रेल्वे स्टेशन व बस स्थानकांमध्येही मार्गदर्शनासाठी पोलिस तैनात करण्यात आले होते.तसेच परीक्षा केंद्रांवर उमेदवारांसाठी पाणी व फळेही पोहोचवण्याची जबाबदारी पोलिसांनी उचलली.सर्वच परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली होती.तसेच परीक्षा केंद्रांवर व्यापक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
 
दरम्यान, परीक्षेदरम्यान भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स या केंद्रावर बाबासाहेब भिमराव गवळी (वय २२, रा. सांजखेडा, औरंगाबाद) हा तोतया उमेदवार योगेश कौतिकराव गवळी या उमेदवाराऐवजी परीक्षेस बसल्याचे निदर्शनास आले.तसेच महेश सुधाकर दांडगे (रा. जाफराबाद, जालना) या उमेदवाराने जनक सिसोदे या मध्यस्थामार्फत पाच लाख रुपये देतोअसे आश्‍वासन देउन विठ्ठल किसन जारवाल याला स्वत:ची ओळखपत्र देउन परीक्षा देण्यास पाठविल्याचे निदर्शनास आले. आणखी एका प्रकरणामध्ये शामराव भोंडणे याने रामेश्‍वर गवळी या डमी उमेदवाराला परीक्षेसाठी बसविल्याचे उघडकीस आले.या तीनही प्रकरणात संबधितांवर अनुक्रमे भारती विद्यापीठ आणि सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती डॉ. सुपेकर यांनी दिली.