सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. मुस्लिम
  3. रमझान
Written By

Ramzan महिन्याचे पावित्र्य

मुस्लीम बांधवांच्या उपवासाच महिन्याला प्रारंभ झाला आहे. यालाच ‘रमजान’चा अर्थात ‘बरकती’चा महिना म्हणतात. मनामनातील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव, सद्भाव वाढविणारा हा महिना. संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा माणसांच्या ठायी रुजविणारा हा महिना. माणसाला वाईटापासून, वासनेपासून शेकडो मैल दूर ठेवणारा हा महिना. या महिनचे महात्म्य, पावित्र्य सांगावे तेवढे थोडेच.

मनाचं मागणं पूर्ण करणार्‍या, बरकतीची मुक्तपणे उधळण करणार्‍या या महिन्याच्या चंद्राची तमाम मुस्लीम बांधव अधीरतेने प्रतीक्षा करीत असतात. चंद्राच्या दर्शनाने प्रत्येकाच्या चेहर्‍यावर प्रसन्नतेची पहाट फुलत असते. घरादारात, मुहल्ल्यात आनंद भरभरून ओसंडत असतो. ‘चाँद दिख, चाँद दिख’चा गलका आसमंतात चैतनचे कारंजी उडवू लागतो. मुस्लीम बांधव आपापसातील वैरत्व, द्वेष विसरून हस्तांदोलन करतात, आलिंगन देतात. त्यांच्या निखळ जिव्हाळने सबंध माहोल स्नेहमय होऊन जातो. संपूर्ण महिनाभर अत्यंत कडकडीत रोजे, पाच वेळेचा नियमित नमाज, कुराणपठण अन् अल्लाहचे स्मरण , चिंतन करायचे असते. या तीस दिवसात उपासधारकांच्या तनमनाची शुद्धी होते. म्हणून इस्लाम धर्मात रमजान महिन्याला अनन्साधारण महत्त्व देण्यात  आले आहे. हा महिना अत्यंत पवित्र अन् मंगलमय मानला गेला आहे.

या महिन्यातच हजरत मुहम्मद पैगंबरांना त्यांच्या अखंड साधनेचे, खडतर तपश्चर्येचे फळ प्राप्त झाले. अर्थात त्यांना अल्लाहचे दर्शन झाले. ज्या परमेश्वराच्या साक्षात्कारासाठी हजरत मुहम्मद पैगंबरांनी तहान, भूक, दुनियादारी या सार्‍या गोष्टींना तिलांजली देऊन ज परमेश्वराची इमानेइतबारे इबादत केली, तो परमेश्वर याच महिन्यात त्यांना प्रसन्न झाला. त्यांची ईशसेवा खर्‍या अर्थाने कबूल झाली. पैगंबरांची इबादत स्वत:साठी नव्हतीच मुळी. ती इबादत होती लोककल्याणासाठी, समस्त मानवमुक्तीसाठी. या महिन्यापासूनच पवित्र कुराणाचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचण्याला सुरुवात झाली. ईश्वराच्या प्रसन्नतेची, विशालतेची साक्ष देणारा महिना म्हणूनही या महिन्याचे आगळेवेगळे स्थान अबाधित आहे. माणसाला त्याच्या भलबुर्‍याची, पाप-पुण्याची जाणीव करून देणार्‍या या महिन्यात उपवास कराचे असतात. उपवास म्हणजे आत्म्याचे, आचारविचारांचे शुद्धीकरण होय. माणसाच्या या आचार-विचारांच्या शुद्धीकरणाची ही निकड कितीतरी वर्षापूर्वी सांगण्यात आली आहे. आजही त्याची नितांत निकड भासते. यावरून पैगंबरांच्या दूरदृष्टीची कल्पना सहजगत येऊ शकते. रमजानमधील रोजा म्हणजे सहरीपासून इफ्तारपर्यंत निव्वळ अन्न-पाण्यापासून दूर राहून भुकेची जीवघेणी यातना सहन करणे एवढेच नव्हे तर आखून देण्यात आलेली कुंपणे, बंधने, मर्यादा यांचे तंतोतंत पालन या महिन्याच्या वतरुळात राहून करणे हो. या महिन्यातील बंद्याची इबादत अल्लाहला अधिक पसंत असते. या महिन्यातल्या इबादतीचा असर, नूर काही वेगळाच असतो.

अनीती, अनाचार, अत्याचार, अवास्तव या गोष्टींकडे कानाडोळा करून दुनिेयेतल्या चांगुलपणावर, मांगल्यावर अंत:करणपूर्वक प्रेम करणे, डोळ्यात पावित्र्य  साठविणे, मनात नीतिमूल्यांची जपणूक करणे, परोपकाराची भावना रुजविणे, कानांना फक्त चांगले, उदात्त, विधायक विचार ऐकण्याची सवय लावणे ही या महिन्याची विशेष शिकवणूक. महिनाभराच्या त्यागाने, शुद्ध आचरणाने तावून सुलाखून निघालेल्या रोजदारांनी ईदचा शिरकुर्मा आनंदाने प्यायचा असतो. ईद म्हणजे आनंदोत्सवच. जो एकमेकांच्या शुभेच्छांनी, सदिच्छांनी साजरा कराचा असतो.

- मुबारक शेख