शनिवार, 24 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 एप्रिल 2023 (15:16 IST)

गडचिरोलीत 23 हत्ती तळ ठोकून, आनंदाची बाब की चिंता वाढवणारी गोष्ट?

elephant
सौरभ कटकुरवार
ANI
दोन तृतियांश भाग जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील लोकांना जंगली प्राणी काही नवे नाहीत. पण नव्या पाहुण्यांच्या आगमनाने मात्र येथील लोकांना धडकी भरली आहे. हे नवीन पाहुणे आहेत जंगली हत्ती.
 
मागील दोन वर्षांमध्ये जवळपास 23 संख्या असलेल्या या हत्तींच्या कळपाचा गडचिरोलीमध्ये मुक्त संचार बघायला मिळतोय. या हत्तींनी स्वतःला मानवांपासून दूर ठेवायचा पुरेपुर प्रयत्न केलेला आहे. ज्यामुळे तुरळक घटना सोडल्यास एकंदरीत वातावरण शांत बघायला मिळतंय.
 
हत्तींच्या सतत फिरण्यामुळे मात्र लोकांच्या शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. काहींच्या घरांचं नुकसान झालेलं आहे. तर दोन जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. पण लोकांनी दाखवलेला संयम, वन विभाग आणि स्वयंसेवी संघटनांनी केलेल्या वेगवेगळ्या उपाय- योजनांमुळे मानव-हत्ती संघर्षाने रौद्र रुप धारण केलेलं नाही.
 
हत्तींचं आगमन
ऑक्टोबर 2021 मध्ये 23 हत्तींचा कळप हा शेजारील छत्तीसगड राज्यातून महाराष्ट्रात पहिल्यांदा दाखल झाला. पुढील 3-4 महिने गडचिरोलीतील काही भागांमध्ये फिरून हा कळप परत गेला.
 
ऑगस्ट 2022 मध्ये हा कळप गडचिरोलीमध्ये पुन्हा दाखल झाला. आणि तेव्हापासून हे हत्ती गडचिरोलीतच फिरताहेत. काही काळ ते गोंदिया जिल्हातसुद्धा वास्तव्यास होते.
 
जाणकारांचं म्हणणं आहे की छत्तीसगडमध्ये होणाऱ्या खाणकामाने कंटाळले हे हत्ती गडचिरोलीमध्ये विपुल प्रमाणात असणारं खाद्य, पाणी आणि समृद्ध जंगल यांकडे आकर्षित झालेले वाटतात. दुसऱ्या वर्षी परत येणे हे याचंच द्योतक असल्याचं ते म्हणतात. भौगोलिक, पर्यावरणीय आणि सांस्कृतिक पैलूंचा विचार केल्यास गडचिरोली कधीकाळी हत्तींचा अधिवास असल्याचं आढळतं.
 
उन्हाळा सुरू होताच हे हत्ती छत्तीसगडला परत जातात की गडचिरोलीलाच आपले नवीन मूलस्थान (Habitat) बनवतात हे बघणे औत्सुक्याचे असेल, असं वन्यजीव प्रेमी म्हणतात. हे गडचिरोलीतील लोकांसाठी आणि मानव-हत्ती संघर्षाच्या दृष्टीने मोठी बाब ठरणार आहे. या अनुषंगाने वनविभाग आणि स्वयंसेवी संघटनांनी पाऊलं उचलायला सुरवात केलेली आहे.
 
गडचिरोलीतील परिस्थिती
आदिवासी बहुल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अनेक लोकांची उपजीविका ही जंगलांवर अवलंबून आहे. तसंच त्यांची शेतं ही जंगलांनी वेढलेली आहे. त्यामुळे हत्ती गावाजवळ वा शेतात येण्याची चाहुल लोकांना कित्येकदा लागत नाही. पण हत्तींच्या वावराने गावकरी मात्र सतत धास्तवलेले असतात.
 
हत्ती तज्ज्ञ शागणिक सेनगुप्ता सांगतात, “गडचिरोलीतील हा कळप मानवी वस्तींना टाळतोय. पण जर गाव आणी शेतं जर त्यांच्या नैसर्गिक मार्गक्रमणाच्या मार्गामध्ये असेल तर त्यांचा नाइलाज होतोय.”
 
“कित्येक घटनांमध्ये हत्तींनी उभी पिकं न खाता शेतातून फक्त मार्गक्रमण केलेलं आहे. तुरळक घटना सोडल्यास त्यांनी गावांजवळ जाण्यास टाळलं आहे,” असंही सेनगुप्ता सांगतात.
 
सेनगुप्तांची SAGE Foundation ही संस्था पश्चिम बंगालमध्ये मानव-हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी कार्यरत आहे. त्यांनी गडचिरोलीत हत्तींच्या अचानक झालेल्या स्थानांतराने उद्भवलेल्या समस्येला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र वन विभागाच्या मदतीसाठी पश्चिम बंगालहून हत्तींना पिटाळून लावणारी ‘हुल्ला’ टीम पाठवली. ज्यामुळे सुरवातीच्या काळातच होणारा मानव-हत्ती संघर्ष टाळला गेला.
 
उपाय-योजना
हत्तींच्या हालचालींवर वनविभागाचे कर्मचारी सतत लक्ष ठेवून असतात. पण हे हत्ती जर गावाजवळ आले तर काय करायचं याबाबत ते अनभिज्ञ आहेत. हुल्ला टीमच्या सदस्यांना पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये मानव-हत्ती संघर्ष कसा टाळायचा याचं प्रशिक्षण आहे. ते वन विभाग कर्मचारी आणि गावकऱ्यांची मदत घेतात तसंच त्यांना प्रशिक्षित करतात.
 
ते विशेष प्रकारच्या मशाली वापरुन हत्तींना हाकलून लावतात वा त्यांना मार्ग बदलण्यास भाग पाडतात. यामुळेच अनेक गावांमध्ये हत्ती येण्याच्या घटना टळल्याचं गावकरी सांगतात.
 
याव्यतिरिक्त वन विभागाने टेक्नोलॉजीचा पुरेपुर वापर केलेला आहे. उपवनसंरक्षक धनंजय वायभासे म्हणाले, थर्मल ड्रोन्सच्या वापराने हत्तींच्या कळपाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
 
“आम्हाला कळपातील एकूण हत्तींची अचूक संख्या कळली. तसंच त्यांच्या खाण्याच्या, फिरण्याच्या, वागणुकीच्या अनेक नवीन बाबी कळल्या. मुख्यत: हुल्ला टीमला रात्री हत्तीं कुठे आहेत याची योग्य माहिती थर्मल ड्रोन्स मुळे मिळाली,” वायभासे सांगतात.
 
वायभासे यांची अलिकडेच गडचिरोलीतील वडसा विभागातून यवतमाळ विभागात बदली झाली आहे.
 
गावकरी आणी हत्ती
विविध गावांतील लोक सांगतात हत्तींमुळे त्यांच्या जीवनावर फार मोठे बदल झाले आहेत. ते आता रानमेवा गोळा करण्यासाठी जंगलामध्ये जाण्यास घाबरतात. हत्ती एका रात्रीत 20-25 किलोमीटर अधिक प्रवास करत असल्याने त्यांना हा हत्तींचा कळप कधीही त्यांच्या गावात येण्याची भीती लोकांना सतावत असते. त्यामुळे ते हत्ती कुठे असतील याची नियमितपणे माहिती घेत असतात.
 
कुरखेडा तालुक्यातील आंधळी गावातील दिगंबर नाकाडे सांगतात ते वन विभागाचे कर्मचारी आणि इतर गावातील परिचयातील लोकांशी हत्तींबाबत नियमितपणे बोलत असतात. नोव्हेंबर 2022 मध्ये हत्तींच्या या कळपाने त्यांच्या 5 एकर शेतातील उभ्या पिकांची नासाडी केली. गावातील इतर अनेक शेतकऱ्यांचंसुद्धा नुकसान झालं.
 
“आम्हाला वन विभागाने रात्री घराबाहेर न पडण्यास सांगितलं होतं. रात्रीचं वातावरण भितीदायक असायचं. पण आम्हाला जेव्हा हत्तीं आमच्या शेतात घुसल्याचे कळलं तेव्हा आम्ही काही शेतकरी हुल्ला टीम सोबत त्यांना हुसकावायला गेलो. पण तोपर्यंत बरेच नुकसान झालेलं होतं,” नाकोडे सांगतात.
 
या भागातील बाबुराव नागोरे, सुनील टेंभुर्णे यांच्या शेतीचं नुकसान झालंय. गडचिरोलीतील बरेच शेतकरी हे अल्पभूधारक आहेत आणि वर्षातून एकदाच पावसाळी पीक घेतात. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे खरीप पिकांचं नुकसान हा त्यांच्यासाठी फार चिंतेचा विषय आहे.
 
“माझ्याकडे फक्त सहा एकर जमीन आहे. त्यातील तीन एकरामधील कापणीसाठी तयार झालेलं भाताचं पीक हत्तींनी उध्वस्त केलं. त्यामुळे फार गंभीर स्थिती निर्माण झाली,” टेंभुर्णे सांगतात.
 
टेंभुर्णे यांनी नुकसान भरपाईसाठी निवेदनही दिलंय. पण त्यांना अजूनपर्यंत आर्थिक मदत मिळालेली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
 
नुकसान आणि भरपाई
गावकऱ्यांची तक्रार आहे की प्रशासनाकडून मागितल्या जाणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करणं फार क्लिष्ट आणि तापदायक आहे.
 
चिचखेडा गावातील बाबुराव नागोरे म्हणाले “आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 पर्यंत ठीक आहे. आम्ही सहज देऊ शकतो. पण वन विभाग आम्हाला शेतीचा नकाशा, इतर शेतकऱ्यांकडून संमतीपत्र हे सगळं मागतं जे सहजासहजी उपलब्ध होत नाही. प्रक्रिया सोपी असायला हवी. तरी पण आम्ही सगळी कागदपत्रं द्यायचा पूर्ण प्रयत्न केला.”
 
चार गावांची मिळून असलेल्या आंधळी- नवरगाव गट ग्रामपंचायत क्षेत्रात एकूण 140 शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी वन विभागाकडे निवेदन केलं आहे. ज्यातील 17 लोकांना फेब्रुवारी अखेर पैसे मिळालेले आहेत.
 
गजानन जांभुळकर यांना त्यांच्या एका एकरातील नुकसानीसाठी रू 10,000 मिळालेत. “वन विभागाने नुकसानीचा पंचनामा अगदी ताबडतोब केला आणि आज जवळपास चार महिन्याने मला भरपाई मिळाली. माझ्या नुकसान झालेल्या पिकांची किंमत तशी 25 ते 30 हजार रुपये असेल. पण 10,000 रुपये मदत पण ठीक आहे,” जांभुळकर सांगतात.
 
गावकऱ्यांच्या मते हत्तींनी केलेल्या नुकसानीची भरपाई ही तशी नेहमीच्या प्रक्रियेपेक्षा वेगवान आहे. “दोन वर्षांआधी मी जंगली डुकरांनी केलेल्या नुकसानीसाठी निवेदन केलं होतं. ती भरपाई अजूनही मिळालेली नाही. पण हत्तींच्याबाबतीतील प्रक्रिया फार जलद पार पडली,” असं जांभुळकर म्हणाले.
 
वनविभागाची कारवाई
वन विभागाने नुकसान भरपाई प्रक्रियेला हत्तींचा बंदोबस्त करण्याइतकंच महत्त्व दिलं आहे. जलद नुकसान भरपाई प्रक्रिया ही गावकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी आणि त्यांना एकंदरीत हत्ती संवर्धनामध्ये सामील करण्यासाठी गरजेची आहे, असं गडचिरोलीतील वडसा विभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल सांगतात.
 
“शासनाने नुकसान भरपाईची प्रक्रिया गतिमान केलेली आहे. आमचे कर्मचारी गावातील लोकांना सोबत घेऊन काम करतात कारण त्यांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे,” असं ते म्हणाले.
 
मागील पाच वर्षांमध्ये गडचिरोलीत वाघांची संख्या फार वेगाने वाढतेय. ज्यामुळे वन कर्मचार्‍यांना वाघ आणी हत्तीं या दोन्ही प्राण्यांमुळे होणारा संघर्ष टाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
 
वन विभागाकडे कुशल ड्रोन ऑपरेटर्सची कमी आहे. तसंच बरेच ड्रोन्स खराब झालेले आहेत.
 
“आम्हाला टेक्निकल इक्विपमेंटमध्ये सुधार करायचा आहे. वाघांमुळे हत्तींवर कधी कधी फोकस कमी राहतो. पण आमचे कर्मचारी सदैव हत्तींना मॉनिटर करत असतात आणी जवळपासच्या गावांना धोक्याचा इशारा पाठवत असतात,” सालविठ्ठल सांगतात.
 
जीवितहानी
शेतीमध्ये नुकसान करण्याव्यतिरिक्त हत्तीनी मागील दोन वर्षांत काही घरांना इजा पोहचवली आहे. तसंच दोन लोकांचा बळी घेतलेला आहे. लोकांनी हत्तींपासून सुरक्षित अंतर ठेवलेलं आहे, पण काही हौशी वर्गानं त्यांच्या जवळ जाण्याचासुद्धा प्रयत्न केला. त्यातच गोंदिया जिल्ह्यातील एक व्यक्ती हत्तींद्वारे मारला गेला.
 
तर दुसऱ्या घटनेमध्ये एका वयस्क व्यक्तीला हत्तींनी चिरडलं. ही घटना दुर्गम आणि नक्षलग्रस्त असलेल्या तलवारगडमध्ये घडली आहे. टेकडीवर असलेल्या या गावात फक्त सहा कुटुंब होती.
 
घटनेच्या दिवशी साठ-पासष्ट वर्षांचे अंशतः आंधळे असलेले धनसिंग हे एकटेच घरी होते आणि इतर गावकरी काही किलोमीटर दूर असलेल्या न्याहकल गावात आठवडी बाजारात गेले होते. संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान हत्तींच्या कळपाने गावात येऊन काही घरं उध्वस्त केली आणी धनसिंग यांना चिरडलं.
 
या दुःखद आठवणींना उजाळा देतांना याच गावातील गस्सूराम हलामी सांगतात, या घटनेनंतर संपूर्ण गाव दहशतीत होतं आणिगावकऱ्यांनी रात्र न्याहकल गावात काढली.
 
“दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा धनसिंग यांचा छिन्नविच्छिन्न झालेला मृतदेह बघितला तेव्हा आम्ही सगळे सुन्न पडलो. चार कुटुंब तेव्हापासून गाव सोडून गेलीयेत. आता आम्ही फक्त पाचजण इथे राहतो. आजही रात्री हत्ती येतील की काय याची भीती वाटते,” हलामी म्हणाले.
 
हत्तींवर अभ्यास करणारे आंगण बिस्वास सांगतात की, हत्ती शक्यतोवर आपटून मारतात आणि मृतदेह सोडून देतात.
 
“पण तलवारगडची घटना सुचवते की हत्ती तणावात होते. लोकांनी फटके फोडून पळवल्याने आणि त्यांचा मार्ग रोखल्याने ते त्रासलेले असावे. मग त्यांनी सगळा राग तलवारगडमध्ये काढला,” असं ते सांगतात. बिस्वास हे SAGE Foundation सोबत कार्यरत आहेत. ते गडचिरोलीतील हत्तींना मॉनिटर करत आहेत.
 
बलशाली गजराज व संयमी गावकरी
गरीब लोकसंख्या असलेल्या मालेवाडा तालुक्यात पुष्कळशी घरं ही मातीची आहेत. हत्तींनी धान्यासाठी किंवा मोहच्या फुलांच्या दारूसाठी काही घरांच्या भिंती पाडल्या. पण चिनेगाव गावातील लोकांना मोठा धक्का बसला जेव्हा या कळपातील टस्कराच्या (सुळे असेलेला हत्ती) धडकेत सिमेंटच्या भिंतीला तडे गेले. राजेश्वर उइके सांगतात सकाळी 4 वाजता त्यांना हत्तींच्या ओरडण्याचा आवाज आला आणि काही क्षणात घर हादरण्याचा भास झाला.
 
“मला जाणवलं की हत्तींनी आमच्या सिमेंटच्या घराच्या भिंतीला टक्कर दिली. त्यांनी गाईच्या गोठ्याची विटांची एक भिंतसुद्धा पाडली. मी पटकन गावातील लोकांना फोन केला आणी आरडाओरडा केला. गावातील लोकांनी फटाके फोडल्यानंतर हत्ती जंगलात पळाले,” उइके सांगतात.
 
भूतकाळातील ऐतिहासिक हत्ती भ्रमणाचा (Elephant Corridor) गडचिरोली हा महत्त्वाचा भाग राहिला आहे. पण मागील एका शतकात रानटी हत्तींचा इथं अधिवास असल्याचा पुरावा कागदोपत्री नाही. मात्र आदिवासी गोंड संस्कृतीमध्ये हत्तीचं अस्तिव बघायला मिळतं.
 
त्यांच्या पारंपरिक उत्सवांमध्ये तसंच जुन्या ऐतिहासिक वास्तु आणि शिल्पांमध्ये हत्तीचं रूप ठळकपणे आढळतं, असं स्थानिक आदिवासी लोकांनी सांगितलं. आदिवासी लोकांमध्ये निसर्गाशी समरूप होण्याची मानसिकता असल्यामुळे गडचिरोलीतील हत्तींच्या वावरास फार विरोध होत नाही.
 
भविष्याच्या उपाय योजना
हत्तींमुळे झालेल्या नुकसानीनंतरही गडचिरोलीमध्ये लोकांनी संयम दाखवलेला आहे. पश्चिम बंगाल आणि झारखंड सारख्या हत्तींवर दगड अथवा आगीचे गोळे फेकण्यासारख्या घटना इथं घडलेल्या नाहीत. पण अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत.
 
पुणे येथील Farmers for Forest आणि The Grasslands Trust या स्वयंसेवी संस्थेंचे कार्यकर्ते गडचिरोलीत काम करत आहेत.
 
फील्ड रिसर्चर मकरंद दातार सांगतात की, हत्तींची आतापर्यंत झालेली मूवमेंट, त्यांच्या सवयी आणि ते कशा प्रकारे प्रतिसाद देतात याची माहिती जमा केली जात आहे.
 
“उद्देश हा आहे की आतापर्यंत झालेल्या वाईट घटनांची पुनरावृत्ती होवू नये. आम्ही जमा करत असणारी माहिती वन विभागास भविष्यात मानव-हत्ती संघर्ष कमी करण्यास उपाय योजना करण्यास मदत करेल,” असं दातार सांगतात.
 
धनंजय महाडोरे, संजय वनकर, प्रणय मेश्राम आणि धनंजय कठाने हे कार्यकर्ते गावोगावी जाऊन लोकांमधे हत्तींबद्दल जागरुकता पसरवत आहेत. तसंच हत्ती गावात किंवा शेतात दिसल्यास काय करावं आणि काय करू नये याचं मार्गदर्शन करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की लोकांचा प्रतिसाद हा सकारात्मक आहे.
Published By -Smita Joshi