रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

सिडको जमीन व्यवहार प्रकरणात न्यायालयीन चौकशी व्हावी - अजित पवार

नवी मुंबई सिडकोच्या जवळ असलेली २४ एकर जमीन त्याच्यालगत असणारी सिडकोची जागा १ लाख रुपये स्क्वेअर मीटरने विकली जाते, म्हणजे १० हजार रूपये स्के.फीट, म्हणजे एक एकराचे जवळपास ४५ कोटी रूपये होतात हे उघड उघड दिसत असताना मुख्यमंत्री मागे अमुक झालं तमुक झालं, असे सांगत आहेत, याबाबत विधिमंडळ पक्षनेते  अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. आमचं म्हणणं आहे की, पूर्वीचा वाद घालू नका. पूर्वीच्या सरकारने काय केलं आणि आताच्या सरकारने काय केलं यापेक्षा न्यायाधीशांच्यामार्फत याची चौकशी करा. पूर्वी चुका झाल्या असतील त्याचीही चौकशी करा आणि आताची चौकशी करा. म्हणजे दूध का दूध और पानी का पानी होऊन जाऊ दे, असे खुले आव्हान पवार यांनी सत्ताधाऱ्यांना दिले.
 
याप्रकरणी आमची स्पष्ट भूमिका आहे की आजपर्यंत कोयनाप्रकल्पग्रस्तांना ज्यांनाही ज्यांच्याही कारकीर्दीत जमिनी दिल्या गेल्या आहेत, त्या कशापध्दतीने दिल्या गेल्या, त्या शेतकऱ्यांनी किती काळाकरता स्वत:कडे ठेवल्या आणि नंतर बिल्डरला विकल्या आणि त्या विकल्या असतील तर त्या काय किमतीत विकल्या या सगळयाची चौकशी झाली पाहिजे आणि त्यातून वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सरकारची जमीन म्हणजे जनतेची जमीन असते. हा साडेअकरा कोटी जनतेच्या निगडीत असणारा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे असेही अजित पवार म्हणाले.