बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 डिसेंबर 2018 (09:46 IST)

कॉंग्रेसची लोकसभा तयारी सुरु, लातूरच्या जागेची निवड होणार

आगामी लोकसभा निवडणुकीत लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्यास उत्सुकता दाखविलेल्या ५२ उमेदवारांची छाननी करून प्रस्तावित यादी तयार करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या सुचनेवरून प्रदेश छाननी समिती गठीत करण्यात आली आहे. या छाननी समितीची बैठक लातूर येथे येत्या ०७ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी दिली. 
 
मागच्या साडेचार वर्षापासून राज्य व केंद्रातील सरकारच्या तुघलकी कारभाराला राज्यातील जनता कंटाळली आहे. लोकनेते विलासराव देशमुख यांचा जिल्हा आणि काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यात आणि लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी राज्यमंत्री आ. बस्वराज पाटील यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने काँग्रेस पक्षाची बांधणी करण्यात आली आहे. आता येथे काँग्रेस पुन्हा भक्कमपणे उभी राहीली आहे. त्यामुळेच लातूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षामार्फत निवडणूक लढविणाऱ्या इच्छूकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 
 
यावेळी लातूर लोकसभा मतदारसंघातून तब्बल ५२ उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठी उत्सुकता दर्शविली आहे. १५ नोव्हेंबर २०१८ रोजी मुंबईतील टिळक भवन येथे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या लातूर लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत या सर्व उमेदवारांनी उपस्थिती नोंदविली होती. मोठ्या प्रमाणात मिळालेल्या या प्रतिसादामुळे जेष्ठ नेतेही अचंबित झाले होते. या उमेदवारांमधून छानणी करण्याचा व अंतिम उमेदवारांची यादी तयार करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयानूसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या सुचनेनुसार लातूर लोकसभा मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांशी चर्चा करून आणि जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली आहे.